Monday, December 10, 2018

नवसंशोधक घडविण्यासाठी.. होमी भाभा नॅशनल इन्स्टिटय़ूट, मुंबई

नवसंशोधक घडविण्यासाठी..

होमी भाभा नॅशनल इन्स्टिटय़ूट, मुंबई


|| योगेश बोराटे
होमी भाभा नॅशनल इन्स्टिटय़ूट, मुंबई
संस्थेची ओळख
देशामध्ये अणुऊर्जा व त्याच्याशी संबंधित मूलभूत संशोधनासाठी १९५४ मध्ये केंद्रीय अणुऊर्जा विभागाची स्थापना झाली. या विभागाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी देशभरात काही मोजक्या, मात्र तितक्याच महत्त्वाच्या शैक्षणिक आणि संशोधन संस्थांचीही कालांतराने सुरुवात झाली. मुंबईमधील अणुशक्तीनगरमध्ये मुख्य शैक्षणिक संकुल असलेली ‘होमी भाभा नॅशनल इन्स्टिटय़ूट’ ही संस्था अशा महत्त्वाच्या संस्थांचे प्रतिनिधित्व करणारी तितकीच महत्त्वाची संस्था ठरते. या संस्थेमध्ये अणुऊर्जेच्या क्षेत्रातील संशोधनांच्याच जोडीने अणुविज्ञान आणि अभियांत्रिकीशी निगडित अभ्यासक्रमांवरही भर दिला जातो. नवसंशोधक घडविण्यासोबतच अणुऊर्जेच्या क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावू शकेल, असे दर्जेदार मनुष्यबळ निर्माण करण्याचे कार्य या संस्थेच्या माध्यमातून चालते. सुरुवातीच्या टप्प्यातील विद्यापीठ स्थापनेबाबतच्या औपचारिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, ३ जून, २००५ पासून या संस्थेला केंद्र सरकारकडून अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाला. केंद्रीय अणुऊर्जा विभागाकडून थेट अनुदान मिळणारी आणि अभिमत विद्यापीठ असा दर्जा असणारी संस्था म्हणून सध्या ‘एचबीएनआय’ ओळखली जाते. केंद्रीय अणुऊर्जा विभागाशी निगडित असलेल्या देशभरातील अकरा संस्था आता या विद्यापीठांतर्गत असलेल्या घटक संस्था म्हणून विचारात घेतल्या जातात. केंद्रीय मनुष्यबळविकास विभागाने अभिमत विद्यापीठांसाठी केलेल्या तीन श्रेणींनुसार, हे विद्यापीठ अव्वल, ‘ए’ श्रेणीत आहे. ‘एनआयआरएफ’च्या २०१८च्या मूल्यांकनामध्ये ही संस्था देशात २६व्या स्थानी आहे.
संकुले 
या विद्यापीठाच्या घटक संस्थांमध्ये भाभा अणू संशोधन केंद्र, मुंबई (बीएआरसी), इंदिरा गांधी अणू संशोधन केंद्र, कल्पक्कम (आयजीसीएआर), राजा रामण्णा प्रगत तंत्रज्ञान केंद्र, इंदोर (आरआरसीएटी), भौतिकशास्त्र संस्था, भुबनेश्वर (आयओपी), हरीश- चंद्रा संशोधन संस्था, अलाहाबाद (एचआरआय), इन्स्टिटय़ूट ऑफ मॅथेमेटिकल सायन्स, चेन्नई (आयएमएससी), टाटा मेमोरिअल सेंटर, मुंबई (टीएमसी),  व्हेरिएबल एनर्जी सायक्लोट्रॉन सेंटर, कोलकाता (व्हीईसीसी), साहा अणू भौतिकशास्त्र संस्था, कोलकाता (एसआयएनपी), इन्स्टिटय़ूट ऑफ प्लाझ्मा रिसर्च, गांधीनगर (आयपीआर) यांचा समावेश होतो.
मुंबईमध्ये १९४१ मध्ये सुरू झालेले टाटा मेमोरिअल सेंटर हे सध्या या विद्यापीठांतर्गत येत असलेले, मात्र इतर संस्थांच्या तुलनेमध्ये सर्वात जुने ठरणारे केंद्र आहे. कोलकात्याच्या ‘एसआयएनपी’ची स्थापना १९५० साली झाली. १९५७ मध्ये स्थापन झालेल्या ‘बीएआरसी’ मुंबईसह कल्पक्कम, तारापूर आणि म्हैसूर येथे संकुले आहेत. साठच्या दशकामध्ये चेन्नईच्या आयएमएससी आणि अलाहाबादच्या एचआरआय या संस्थांची स्थापना झाली. तद्नंतरच्या काळामध्ये देशभरात हळूहळू या विद्यापीठाच्या घटक संस्थांची स्थापना होत गेली. भुवनेश्वरमध्ये २००६ साली सुरू झालेले नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर सायन्स एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च (एनआयएसईआर) ही संस्थादेखील याच विद्यापीठाचा भाग असलेल्या इन्स्टिटय़ूट ऑफ फिजिक्सचा एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणून चालते. ‘एनआयएसईआर’ ही संस्था या विद्यापीठामधील सर्वात अलीकडच्या काळात स्थापन झालेली घटक संस्था म्हणून विचारात घेतली जाते.
अभ्यासक्रम
या विद्यापीठांतर्गत येणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून केमिकल सायन्सेस, हेल्थ सायन्सेस, लाइफ सायन्सेस, इंजिनीअिरग सायन्सेस, मॅथेमेटिकल सायन्सेस, फिजिकल सायन्सेस, स्ट्रॅटेजिक स्टडीज या विषयांशी निगडित अभ्यासक्रम चालतात. ही संस्था केंद्रीय अणुऊर्जा विभागाने स्थापन केलेली एक महत्त्वाची संस्था असल्याने स्वाभाविकपणे या अभ्यासक्रमांमधून अणुविज्ञान आणि अभियांत्रिकीशी निगडित विषयांवर दिला जाणारा भर आपण अनुभवू शकतो. विद्यापीठाच्या माध्यमातून पदवी, पदव्युत्तर पदवी, पदविका, सुपर स्पेशालिटी आणि संशोधन या प्रकारांमधील अभ्यासक्रम चालतात. विद्यापीठाच्या सर्वच घटक संस्थांमधून पदव्युत्तर पदवी आणि पीएच.डी.चे अभ्यासक्रम चालविले जातात. विद्यापीठाने न्युक्लिअर लॉ, इकोनॉमिक्स ऑफ न्युक्लिअर पॉवर, न्युक्लिअर सिक्युरिटी, न्युक्लिअर प्रॉलिफरेशन, इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राइट्स या विषयांमधील प्रभावी अभ्यास आणि मनुष्यबळनिर्मितीसाठी स्ट्रॅटेजिक स्टडीजमधील विशेष अभ्यासक्रमही सुरू केले आहेत. ‘एचआरआय’ आणि ‘आयएमएससी’मध्ये इंटिग्रेटेड पीएच.डी. अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्याद्वारे संशोधक विद्यार्थ्यांना एम. एस्सी. आणि पीएच.डी. एकत्रितपणे करणे शक्य आहे. विद्यापीठामार्फत इंजिनीअिरग सायन्सेस, तसेच फिजिकल सायन्सेस, केमिकल सायन्सेस आणि लाइफ सायन्सेस या विषयांमध्ये एम. टेक्. अभ्यासक्रम चालविले जातात. दोन वष्रे कालावधीच्या या अभ्यासक्रमांमध्ये एक वर्षांचे प्रकल्पाधारित अध्ययन समाविष्ट आहे. ज्यांना अशा प्रकल्पाधारित अध्ययनामध्ये रुची नसते, अशांसाठी त्याच विषयामधील पदविका देण्याची सुविधाही या विद्यापीठात मिळते. विद्यापीठांतर्गत चालणाऱ्या एम. एस्सी. (इंजिनीअिरग) गटातील अभ्यासक्रमांमध्ये एम. टेक्. अभ्यासक्रमाच्या तुलनेमध्ये संशोधनावर अधिक भर दिला जातो. भुवनेश्वर येथील ‘एनआयएसईआर’मध्ये पाच वष्रे कालावधीचे इंटिग्रेटेड एम. एस्सी. अभ्यासक्रम चालतात.
टीएमसी, मुंबईमध्ये उपलब्ध अभ्यासक्रमांमध्ये मेडिकल आँकोलॉजी, पेडियाट्रिक आँकोलॉजी, गॅस्ट्रोएंटरोलॉजी, क्रिटिकल केअर या विषयांमधील ‘डी. एम.’, तर सर्जकिल आँकोलॉजी, गायनॅकोलॉजिकल आँकोलॉजी या विषयांमधील ‘एम. सीएच.’ हे सुपर स्पेशलिटी अभ्यासक्रम चालतात. विद्यार्थ्यांना एम. एस्सी. क्लिनिकल रिसर्च आणि एम. एस्सी. नर्सिंग या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठीही या केंद्राचा विचार करता येतो.
पॅथोलॉजी, अ‍ॅनेस्थेशिऑलॉजी, रेडिओ डायग्नोसिस, रेडिओथेरपी, मायक्रोबायोलॉजी आदी विषयांमधील एम. डी.चे अभ्यासक्रमही येथे चालविले जातात. त्याशिवाय बीएआरसी, मुंबई येथे डिप्लोमा इन रेडिएशन मेडिसिन, डिप्लोमा इन रेडिओलॉजिकल फिजिक्स, डिप्लोमा इन मेडिकल रेडिओ आयसोटोप टेक्निक्स हे अभ्यासक्रम चालतात.
borateys@gmail.com
First Published on October 9, 2018 2:45 am
Web Title: homi bhabha national institute

No comments:

Post a Comment