Monday, December 10, 2018

शब्दबोध अनेक लोककथांनी आणि त्यातील घटनांनीही आपली भाषा समृद्ध केली आहे, याचा प्रत्ययच असे शब्द वाचल्यावर येतो.

शब्दबोध

अनेक लोककथांनी आणि त्यातील घटनांनीही आपली भाषा समृद्ध केली आहे, याचा प्रत्ययच असे शब्द वाचल्यावर येतो.


डॉ. अमृता इंदुरकर
ससेमिरा
हा शब्द आपल्या ओळखीचाच. चौकशीचा ससेमिरा वगैरेसारख्या वाक्प्रचारांतून तो भेटतच असतो. तर ससेमिरा म्हणजे एखाद्या वस्तूसाठी भुणभुण लागणे, विशिष्ट प्रकारचा त्रास, मागे लागलेली कटकट इ. पण या शब्दाचे मूळ शोधायचे तर एका लोककथेकडे जावे लागेल. अनेक लोककथांनी आणि त्यातील घटनांनीही आपली भाषा समृद्ध केली आहे, याचा प्रत्ययच असे शब्द वाचल्यावर येतो. ससेमिराचा मूळ अर्थ आहे एक प्रकारचे वेड. हा शब्द बृहत्कथासार व सिंहासन बत्तीशी या लोककथांमधील द्वितीय कथेतून आलेला आहे. विजयपाल नावाच्या राजपुत्राने एका अस्वलाचा विश्वासघात केला. त्यामुळे त्या अस्वलाने रागावून चार श्लोकांमध्ये मानव जातीची निंदा केली. यातील श्लोकांची आद्याक्षरे अनुक्रमे स, से, मि, रा अशी होती. ही श्लोकमाला म्हणून अस्वलाने राजपुत्राला शाप दिला की, ‘‘तुला वेड लागेल. मी म्हटलेल्या चार श्लोकांची आद्याक्षरे तू सतत बडबडत राहशील.’’ अस्वलाने याला उ:शापही दिला. तो असा की, ‘‘या अक्षरांची फोड म्हणजे या अक्षरांपासून सुरू होणारे श्लोक जर तुला कुणी ऐकवले तर हे वेड निघूनही जाईल.’’ राजपुत्र सतत ‘ससेमिरा’ म्हणत वेडय़ासारखा भटकू लागला. त्याला एक चतुर राजकन्या भेटली. तिने ते चार श्लोक त्याला म्हणून दाखवले. तेव्हा त्याचे वेड गेले, तो शुद्धीवर आला. या कथेवरून आणि घटनेवरून वेडय़ासारखा एकच शब्द सतत उच्चारत भटकणे, या अर्थावरून एखाद्याने सतत एकच गोष्ट मागत राहणे किंवा उपद्रवी वर्तन करणे, सतत एकाच गोष्टीच्या मागे लागणे या अर्थछटांसह ससेमिरा हा नवा शब्द रूढ झाला.
ढालगज
‘अमुक ती म्हणजे अगदी ढालगज भवानी आहे हो’, असं सतत पुढे पुढे करणाऱ्या एखाद्या स्त्रीला म्हटलं जातं. हा मूळ शब्द मात्र एका विशिष्ट प्रघातावरून लोकभाषेत रूढ झाला.
पूर्वी किल्ल्यांना आणि मोठय़ा राजवाडय़ांच्या महाद्वारांना खूप लांब आणि टोकदार लोखंडी सुळे बसवलेले असत. शत्रूने हे दार सहजासहजी फोडू नये, यासाठी ही व्यवस्था होती. युद्धात ही द्वारे धडका देऊन खिळखिळी करून फोडण्यासाठी शत्रूपक्षाचे सैन्य ‘ढालगजांचा’ उपयोग करीत. गज म्हणजे हत्ती आणि या हत्तीच्या डोक्यावर भलीथोरली ढाल बांधलेली असे. हे हत्ती दरवाजांना घडका देत. ढालीमुळे त्यांना टोकदार खिळे लागत नसत आणि दरवाजांना धडकाही बसत. विशिष्ट कार्यासाठी ढाल बांधलेले गज ते ढालगज इतक्या सहजपणे कृतीनुरूप हा जोडशब्द तयार झाला. खास या कामासाठीच हे ढालगज प्रशिक्षित केले जात असत.   खरे तर संस्कृतमध्ये ‘गज’ मधला ‘ज’ हा तालव्य उच्चार असलेला आहे. पण या शब्दात मात्र पुढे त्या ‘ज’ चा दन्त्य उच्चार केला गेला आणि ढालगज असा दन्त्य ‘ज’ उच्चार रूढ झाला. अशा या ढालगजांना नेहमीच पुढे पुढे राहावे लागायचे त्यावरूनच कोणत्याही ठिकाणी सतत अग्रस्थाने मिळवण्यासाठी तोऱ्याने पुढे पुढे करणाऱ्या स्त्रीला ढालगज भवानी या विशेषणाने संबोधले गेले.
amrutaind79@gmail.com
First Published on October 6, 2018 3:47 am
Web Title: article about vocabulary words 4

No comments:

Post a Comment