Monday, December 10, 2018

एमपीएससी मंत्र : मराठी भाषा (प्रश्नांचे विश्लेषण) मराठी आणि इंग्रजी या भाषांचे व्याकरण ढोबळ नियमांच्या समान रचनेमध्ये दर्शवता येत असले तरी त्यांच्यामध्ये मूलभूत फरक आहे.

एमपीएससी मंत्र : मराठी भाषा (प्रश्नांचे विश्लेषण)

मराठी आणि इंग्रजी या भाषांचे व्याकरण ढोबळ नियमांच्या समान रचनेमध्ये दर्शवता येत असले तरी त्यांच्यामध्ये मूलभूत फरक आहे.


रोहिणी शहा
मागील लेखांमध्ये गट ‘क’ सेवेच्या भाषाविषयक पेपर्सची तयारी कशी करावी याबाबत चर्चा करण्यात आली. तयारीला दिशा देण्यासाठी इतर स्पर्धा परीक्षांप्रमाणेच या परीक्षेच्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण महत्त्वाचे ठरते. मात्र गट ‘क’ सेवेमध्ये समाविष्ट असलेल्या वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने परीक्षा घेण्यात येत होती. अगदी टप्पेसुद्धा वेगवेगळे होते आणि संयुक्त मुख्य परीक्षेचे हे पहिलेच वर्ष आहे. त्यामुळे प्रश्नांचे स्वरूप कसे असेल याचा अंदाज यावा म्हणून त्या त्या पदांच्या प्रश्नपत्रिकांचेच विश्लेषण करणे क्रमप्राप्त ठरते.
मराठी आणि इंग्रजी या भाषांचे व्याकरण ढोबळ नियमांच्या समान रचनेमध्ये दर्शवता येत असले तरी त्यांच्यामध्ये मूलभूत फरक आहे. किंबहुना प्रत्येक भाषेची शब्द योजना, वाक्यरचना इत्यादी बाबी इतरांपेक्षा वेगळ्याच असतात. त्यामुळे या लेखामध्ये तिन्ही पदांसाठीच्या परीक्षांमध्ये मराठी भाषेसाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नांचा आढावा व त्यांचे विश्लेषण करण्यात येत आहे. तर  त्यानंतरच्या लेखामध्ये इंग्रजी भाषेच्या प्रश्नांचे विश्लेषण.
*      प्रश्न – वक्त्याच्या भाषणात तर्कसंगती आणि संदर्भ यांचा अभाव होता. मात्र त्यांचे भाषण अतिशय आवेशपूर्ण  झाले. अध्यक्षांनी समारोप करताना यांच्या विद्वत्तेची मी काय पावती देणार? असे उद्गार काढले. यामधून त्यांनी काय सुचविले?
१)     वक्ते अतिशय विद्वान आहेत.
२)     त्यांच्या विद्वत्तेचे मोजमाप करणे कठीण आहे.
३)     भाषणातून त्यांच्या विद्वत्तेचा अभाव श्रोत्यांना कळलाच आहे.
४)     मूल्यमापन करण्यास अध्यक्ष पात्र नाहीत.
*      प्रश्न – ताबूत थंड होणे या वाक्प्रचाराला विरुद्धार्थी वाक्प्रचार ओळखा.
१) तत्त्वज्ञान लंगडे पडणे.
२) गाशा गुंडाळणे.
३) काखा वर करणे.
४) अवसान चढणे.
*      प्रश्न – संस्कृतमधील उपसर्ग असणारे मराठी शब्द ओळखा.
१) आडवळण, अदकोस, निनावी, अबोल.
२) पडताळा, फटकळा, अभाव, अवकळा.
३) निलाजरा, अवघड, पडसाद, अदपाव.
४) अभिनय, अवमान, अनुभव, अतिरेक.
*      प्रश्न – केवलप्रयोगी अव्यये ही –
१) दोन वाक्ये जोडण्याचे काम करतात.
२) आपल्या उत्कट भावना व्यक्त करतात.
३) केवलप्रयोगी अव्यये विकारी असतात.
४) शब्दाचा वाक्याशी असलेला संबंध दर्शवितात.
*      प्रश्न – शिक्षक विद्यार्थ्यांना गणित शिकवतात. या वाक्यातील प्रयोग बदलायचा असेल तर पुढीलपकी कोणता पर्याय योग्य ठरेल?
१) शिक्षक विद्यार्थ्यांना गणित शिकवतील.
२) शिक्षक विद्यार्थ्यांना गणित शिकवायचे.
३) शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गणित शिकवावे.
४) शिक्षक विद्यार्थ्यांना गणित शिकवत होते.
*      प्रश्न – ग्रह या शब्दास पुढीलपकी कोणकोणते अर्थ आहेत?
१) स्वीकार, सूर्यमालेतील गोल, समजूत.
२) घर, स्वीकार, मजबूत.
३) इमारत, समजूत, पृथ्वी.
४) घर, स्वीकार, सूर्यमालेतील गोल.
*      प्रश्न – पुढील विधाने वाचा.
अ) ए – कारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्यरूप या-कारान्त होते.
ब) आ – कारान्त स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरूप ए-कारान्त होत नाही.
पर्यायी उत्तरे
१) फक्त अ बरोबर
२) फक्त ब बरोबर
३) अ  व ब दोन्ही बरोबर
४) अ व ब दोन्ही चूक
*      प्रश्न – वसंतरावांनी बँकेतली सगळी ठेव काढून दामदुपटीपेक्षा जास्तीची आश्वासने देणाऱ्या नव्या कंपनीमध्ये गुंतविली. पुढे ती कंपनीच बोगस निघाली आणि वसंतरावांचे होते नव्हते ते गेले. म्हणतात ना ———!
रिकाम्या जागी कोणती म्हण वापरता यईल?
१) असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ.
२) आधी बुद्धी जाते मग लक्ष्मी जाते.
३) जगी सर्वसुखी असा कोण आहे?
४) धर्म करता कर्म उभे राहते.
*      प्रश्न – संत म्हणतात, सप्तपदे सहवासे सख्य साधूंशी घडते. या ओळीत पुढीलपकी कोणता अलंकार आहे?
१)  यमक      २) उपमा              ३)  उत्प्रेक्षा     ४) अनुप्रास
वरील प्रातिनिधिक प्रश्नांच्या विश्लेषणातून पुढील मुद्दे समजून घेता येतील.
2     व्याकरणावरील प्रश्न हे उदाहरणे देऊन आणि प्रत्यक्ष (direct / straight forward) दोन्ही पद्धतींनी विचारण्यात आले आहेत. त्यामुळे नियमांची नेमकी माहिती असणे आणि त्यांचा वापर करता येणे दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत.
2     प्रत्येक प्रकारच्या नियमावर किमान एक तरी प्रश्न विचारण्यात आलेला आहे.
2     म्हणी आणि वाक्प्रचार यांवरील प्रश्नांची तयारी जास्तीत जास्त सराव करूनच होऊ शकणार आहे.
2     शब्दांचे अर्थ आणि मूलभूत व्याकरण नियम यांची सांगड घालणारे प्रश्नही विश्लेषणात्मक प्रश्नामध्ये समाविष्ट आहेत.
या पदांच्या विशेषत: लिपिक पदाच्या जबाबदाऱ्या पाहिल्या की, हे लक्षात येते की मसुदे टंकलिखित करणे, तपासणे, प्रकाशित करणे या जबाबदाऱ्या प्रामुख्याने त्यांच्यावर असतात. यामध्ये व्याकरणाच्या चुकांमुळे अर्थामध्ये बदल होणार नाही हे पाहणे ही जबाबदारी महत्त्वाची असते. त्यामुळे नियम, त्यांचा वापर करता येणे आणि दोन्हींच्या एकत्रित वापराचे कौशल्य असणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने भाषेचा अर्थ व व्याकरणाचे नियम समजून घेणे आणि त्यांच्या वापराचा सराव करणे ही या परीक्षेतील यशाचीच नाही तर भाषेवर मजबूत पकड निर्माण करायची गुरुकिल्ली आहे.
First Published on October 5, 2018 4:50 am
Web Title: article about marathi language analysis of questions
14
Shares

No comments:

Post a Comment