Tuesday, June 25, 2019

एमपीएससी मंत्र : इतिहासाचा अभ्यास उपघटकनिहाय तयारी करताना पुढील बाबी लक्षात घ्यायला हव्यात.

एमपीएससी मंत्र : इतिहासाचा अभ्यास

उपघटकनिहाय तयारी करताना पुढील बाबी लक्षात घ्यायला हव्यात.

(संग्रहित छायाचित्र)

रोहिणी शहा
दुय्यम सेवांच्या पूर्व परीक्षेमध्ये इतिहास घटकाचा अभ्यासक्रम ‘आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास’ अशा प्रकारे विहित करण्यात आला आहे. या घटकाची तयारी कशा प्रकारे करावी, याची चर्चा या लेखामध्ये करण्यात येत आहे.
इतिहास या घटकावर साधारणपणे १२ ते १५ प्रश्न विचारले जातात. यातील उपघटकांचा विचार करता स्वातंत्र्यपूर्व कालखंडावर जास्त भर दिलेला आढळतो. स्वातंत्र्यपूर्व कालखंडामधील ब्रिटिशांचे राजकीय आणि सामाजिक धोरण, त्यांचे कायदे, सामाजिक सुधारणा चळवळी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशने व आंदोलने, राष्ट्रीय चळवळीतील महाराष्ट्राचे योगदान या बाबींवर भर देण्यात आलेला आहे. स्वातंत्र्योत्तर कालखंडातील महाराष्ट्राची स्थापना आणि केंद्र सरकारची विविध धोरणे यावर भर दिलेला आढळतो. उपघटकनिहाय तयारी करताना पुढील बाबी लक्षात घ्यायला हव्यात.
स्वातंत्र्यपूर्व इतिहास
*    राजकीय पैलू
*    यामध्ये ब्रिटिशांचे राजकीय धोरण, त्यांचे विविध नागरी व राजकीय निर्णय / कायदे, महत्त्वाचे व्हाईसरॉय / गव्हर्नर जनरल व त्यांचे ठळक निर्णय या बाबींचा अभ्यास करणे आवश्यक आहे.
*    १८५७ चा उठाव हा स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील मलाचा दगड आहे. त्यामुळे याबाबतचे सर्व मुद्दे बारकाईने अभ्यासावेत. सहभागी सामाजिक प्रवर्ग, त्यामागची कारणे, उठावाची सामाजिक-राजकीय कारणे, तात्कालिक कारणे, व्याप्ती, विविध नेते, त्यांचे कार्यक्षेत्र व उठावादरम्यान वा नंतरची त्यांची स्थिती, महत्त्वाच्या घोषणा
*    ब्रिटिशांच्या धोरणांवर भारतीयांच्या प्रतिक्रिया, राजकीय संस्था / संघटनांची स्थापना आणि काय्रे यांचा आढावा घ्यावा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना, तीन ठळक कालखंड, त्यांतील महत्त्वाची अधिवेशने व ठराव, आंदोलने, त्यांचे स्वरूप व परिणाम यांचा आढावा घ्यायला हवा.
*    सशस्त्र / क्रांतिकारी चळवळींवरही प्रश्न विचारण्यात आले आहेत. या चळवळींचे दोन कालखंड, त्यांतील महाराष्ट्र, पंजाब व बंगालमधील क्रांतिकारक, त्यांच्या संघटना, महत्त्वाच्या घडामोडी, दैनिके / नियतकालिके, पुस्तके यांविषयी सारणीपद्धतीतील टिपणे काढता येतील. यामध्ये महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळीतील वैशिष्टय़पूर्ण बाबी समजून घ्याव्यात. उदाहरणार्थ साताऱ्याचे ‘पत्री’ सरकार, नाटकांचा प्रचारासाठी उपयोग इ.
*    या कालखंडातील महाराष्ट्रातील नेते, घडामोडी, आंदोलने, राजकीय संस्था यांचा जास्त बारकाईने आढावा घ्यायला हवा. नागपूरचा झेंडा सत्याग्रह यांसारखे महाराष्ट्रातील वैशिष्टय़पूर्ण योगदान माहीत असायला हवे.
*    सामाजिक इतिहास – एकोणिसाव्या शतकातील प्रबोधन
*    देशातील आणि महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारकांचा अभ्यास करीत असताना पुढील पलूंचा विचार केल्यास लक्षात ठेवणे सोपे जाते – जन्म ठिकाण, मूळ ठिकाण, शिक्षण, नोकरी / व्यवसाय, स्थापन केलेल्या संस्था, वृत्तपत्रे. महत्त्वाचे लिखाण, भाषण, घोषणा. प्रबोधन कार्यासाठी दिलेले विशेष योगदान
*   सामाजिक प्रबोधनाबरोबरच धार्मिक सुधारणांचाही यामध्ये समावेश करणे आवश्यक आहे.
*    या विभागाचा अभ्यास करण्यासाठी स्टेट बोर्डाची आधुनिक भारताच्या इतिहासाची माहिती असणारी पुस्तके, आधुनिक भारताचा इतिहास हे ग्रोव्हर आणि बेल्हेकर यांचे पुस्तक तसेच, बिपिन चंद्र यांचे इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेन्डन्स हे पुस्तक अभ्यासोपयोगी आहे.
*    स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास 
*    या विभागामध्ये घटनानिर्मिती प्रक्रिया आणि त्यामध्ये महत्त्वाच्या नेत्यांची भूमिका, संस्थानांचे विलीनीकरण, त्यातील सरदार पटेल यांची भूमिका यांचा थोडक्यात आढावा घ्यायला हवा.
*    स्वतंत्र भारतातील महत्त्वाची आíथक व सामाजिक धोरणे, विज्ञान व शिक्षण क्षेत्रातील निर्णय, महत्त्वाच्या महत्त्वाकांक्षी योजना / प्रकल्प (विशेषत: महाराष्ट्रातील) यांचा आढावा घ्यायला हवा.
*    या कालखंडातील महत्त्वाच्या राजकीय चळवळी, महत्त्वाच्या राजकीय पक्षांची स्थापना, वाटचाल समजून घ्यायला हवी.
*    घटनात्मक पदांवरील वैशिष्टय़पूर्ण नेमणुका (एखाद्या पदावरील पहिली व्यक्ती, पहिली महिला, पहिली मागासवर्गीय व्यक्ती इ.) यांचा आढावा घ्यायला हवा.
*    पंडित नेहरू आणि त्यांचे अलिप्ततावादी धोरण, इंदिरा गांधी आणि त्यांचे परराष्ट्र धोरण, आणीबाणी या बाबींचा आढावा घ्यावा.
*    त्याचबरोबर इतिहासाचा अभ्यास करताना ज्या घटनांना शतक, द्विशतक, पंच्याहत्तरी, पन्नाशी पूर्ण झाली आहे अशा घटना, गेल्या वर्षभरात सकारात्मक किंवा नकारात्मक कारणाने चच्रेत आलेल्या ऐतिहासिक घटना व त्यांचे परिणाम यांची यादी करून त्यांचा विशेष अभ्यास करावा.
*    स्वातंत्रोत्तर महाराष्ट्राचा अभ्यास करताना मराठवाडा मुक्ती संग्राम व संयुक्त महाराष्ट्र चळवळ या चळवळी महत्त्वाच्या ठरतात.
*    मराठी साहित्य संमेलने, भाषावार प्रांत रचनेची मागणी, संयुक्त महाराष्ट्र सभा, महाराष्ट्र एकीकरण परिषद, संयुक्त महाराष्ट्र परिषद यांची स्थापना, नेते, मागण्या, उपक्रम, संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी प्रयत्नशील वृत्तपत्रे, राष्ट्रीय नेते, कामगार, शाहीर यांची माहिती असायला हवी. त्यानंतर नागपूर करार, स्वतंत्र विदर्भाबाबतच्या घडामोडी यांचाही आढावा आवश्यक आहे.
First Published on March 7, 2019 12:03 am
Web Title: article about history study

No comments:

Post a Comment