Friday, June 28, 2019

शब्दबोध : बुंथ रात्र काळी घागर काळी ही सोळाव्या शतकातील विष्णुदास नामा नावाच्या संत कवीची रचना

शब्दबोध : बुंथ

रात्र काळी घागर काळी ही सोळाव्या शतकातील विष्णुदास नामा नावाच्या संत कवीची रचना

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. उमेश करंबेळकर
गोविंद पोवळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गायलेलं ‘रात्र काळी घागर काळी’ हे गाणे अनेकदा ऐकलेले असते. ‘रात्र काळी घागर काळी’ या नावाची चिं.त्र्यं.खानोलकरांची कादंबरीही बरीच गाजली होती. तर या गाण्यामध्ये भेटतो, ‘बुंथ’ हा शब्द.
रात्र काळी घागर काळी ही सोळाव्या शतकातील विष्णुदास नामा नावाच्या संत कवीची रचना. रात्र काळी, घागर काळी, यमुनेचे जळ काळे, बुंथ काळी, बिलवर काळी, गळ्यातील मोत्याची एकावळी काळी, काचोळी काळी हे सर्व परिधान केलेली नायिका नखशिखांत काळी आणि तिचा एकलेपणा घालवणारी कृष्णमूर्तीही काळी.
काळा रंग हा आपली दृक्-संवेदना शून्यावर आणतो. जणू काही कृष्णविवर. या गाण्यातील कृष्णभक्तीचे आकर्षण कृष्णविवरासारखे आहे. त्यात शिरले की बाहेर पडणे अशक्य अगदी प्रकाशदेखील. अशी ही सुंदर रचना. त्यातील बुंथ हा शब्द नवखा.
त्याचा अर्थ शब्दकोशात शोधला. बुंथ म्हणजे डोक्यावरून सर्व शरीरभर आच्छादनासाठी घेतलेले वस्त्र, ओढणी, खोळ. तसेच बुरखा किंवा घुंगट. तसेच रूप किंवा वेश या अर्थानेही बुंथ हा शब्द वापरलेला आढळतो.(होतों दाशरथी तुम्ही वसुमती घ्या वानराच्या बुंथी)
विशेष म्हणजे बुंथ हा शब्द ज्ञानेश्वरीतही आच्छादन या अर्थाने आलेला आहे.
सहाव्या अध्यायातील
जैसी आभाळाची बुंथी
करूनि राहे गभस्ती
मग फिटलिया दीप्ति धरूं नये  २५१
किंवा त्याच अध्यायातील
नातरी कर्दळीचा गाभा
बुंथी सांडोनी उभा
कां होता चमत्कार पिंडजनी   २९५
या ओव्यांत बुंथ हा शब्द ‘आच्छादन’ या अर्थाने वापरला आहे. एकंदरीत विष्णुदास नामा यांच्या अजरामर काव्यामुळे बुंथ शब्द विस्मरणात जाण्यापासून वाचला असे म्हणता येईल.
या ठिकाणी या काव्यरचनेच्या दुसऱ्या एका वैशिष्टय़ाकडे आपले लक्ष वेधायचे आहे. ‘ळ’ हे अक्षर मराठी भाषेचे वैशिष्टय़ म्हणून ओळखले जाते. मराठीतील अनेक शब्द संस्कृतोद्भव असले किंवा संस्कृत ही मराठीप्रमाणे सर्व भारतीय भाषांची जननी म्हणून ओळखली जात असली तरी ‘ळ’ हे अक्षर संस्कृतमध्ये नाही. तसेच हिंदीमध्येही नाही. अशा या वैशिष्टय़पूर्ण ‘ळ’ अक्षराचा मराठी काव्यात फारसा वापर केलेला आढळत नाही. या संदर्भातील गदिमांचा किस्सा अनेकांना  माहीत असतो. तो असा, एकदा पुलंनी गदिमांजवळ अशी तक्रार केली की ‘ळ’  हे अक्षर मराठी काव्यात फारसे आढळत नाही, कारण त्याचा वापर काव्यात करणे अवघड आहे. तेव्हा गदिमांनी तेथल्या तेथे ‘ळ’चा मुक्त वापर केलेले काव्य रचले आणि ते म्हणजे ‘घननिळा लडिवाळा झुलवू नको हिंदोळा.’ गंमत म्हणजे विष्णुदास नाम्याच्या या रचनेतही ‘ळ’ अक्षराचा असाच मुक्त वापर केलेला आहे.
काळी, जळी, गळा मोती, एकावळी, काचोळी, सावळी असे अंती ‘ळ’ अक्षर असलेले शब्द या रचनेत आहेत. गदिमांचाही संत वाङ्मयाचा गाढा अभ्यास होता. त्यांची काव्यशैली सुबोध, सुगम आणि अर्थवाही असण्यामागे या अभ्यासाचाही मोठा वाटा होता.
First Published on March 22, 2019 12:01 am
Web Title: word sense article

No comments:

Post a Comment