Saturday, June 29, 2019

यूपीएससीची तयारी : आधुनिक भारत ०१४ मध्ये १८५८च्या राणीचा जाहीरनाम्याचा उद्देश काय होता, असा प्रश्न विचारण्यात आलेला होता.

यूपीएससीची तयारी : आधुनिक भारत

०१४ मध्ये १८५८च्या राणीचा जाहीरनाम्याचा उद्देश काय होता, असा प्रश्न विचारण्यात आलेला होता.

(संग्रहित छायाचित्र)

श्रीकांत जाधव
आजच्या लेखात आपण १८व्या शतकाची सुरुवात ते १८५७ पर्यंतचा कालखंड याविषयाची यूपीएससी पूर्वपरीक्षेसाठी तयारी कशी करावी याची चर्चा करणार आहोत. या विषयावर २०११ ते २०१८ दरम्यान, एकूण ८ प्रश्न विचारण्यात आले आहेत. पूर्वपरीक्षेमध्ये १८व्या शतकाची सुरुवात ते १८५७पर्यंतचा कालखंड यावर साधारणपणे कमी प्रश्न विचारले जातात. प्रश्नांचा कल हा संकीर्ण माहितीच्या अनुषंगाने अधिक असतो.
या घटकाचे स्वरूप व अभ्यासाचे नियोजन
या कालखंडाअंतर्गत आपणाला युरोपियनांचे आगमन आणि ब्रिटिशसत्तेची भारतात स्थापना, ब्रिटिशसत्तेचा भारतावरील परिणाम, ब्रिटिशांची प्रशासकीय रचना आणि धोरणे, ब्रिटिशसत्तेच्या विरोधातील बंड आणि उठाव, १९व्या शतकातील सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळी, शिक्षण आणि वृतपत्रे व ब्रिटिशकालीन संविधानात्मक विकास इत्यादी महत्त्वपूर्ण घडामोडींची माहिती अभ्यासावी लागणार आहे. या कालखंडाची तीन महत्त्वाची वैशिष्टय़े आहेत. यातील पहिले वैशिष्टय़ म्हणजे १८व्या शतकाच्या सुरुवातीपासून मुघल सत्तेच्या ऱ्हासाला सुरुवात झाली होती. दुसरे वैशिष्टय़ म्हणजे भारताच्या विविध भागांत प्रादेशिक देशी सत्ता उदयाला आल्या होत्या. (या सत्तांचे वर्गीकरण साधारणत: तीन प्रकारात केले जाते – मुघल साम्राज्यात कार्यरत असणाऱ्या प्रांतीय सुभेदारांनी स्थापन केलेल्या सत्ता उदा. बंगाल, अवध, हैदराबाद; मुघल साम्राज्याच्या विरोधात उठाव करून स्थापन झालेल्या सत्ता उदा. मराठे, शीख, जाठ व अफगाण आणि स्वतंत्ररीत्या स्थापन झालेल्या सत्ता उदा. म्हैसूर, राजपूत आणि केरळ; आणि तिसरे वैशिष्टय़ म्हणजे भारतात व्यापार करण्यासाठी आलेल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतातील विविध प्रांतात अस्तित्वात असणाऱ्या प्रादेशिक सत्तांमध्ये तसेच एकमेकांमध्ये असणाऱ्या संघर्षांचा फायदा घेऊन स्वत:ला एक राजकीय प्रतिस्पर्धेच्या भूमिकेत स्थापन केले होते. तसेच सर्व प्रादेशिक देशी सत्तांचा निर्णायक पराभव करून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने आपले अधिराज्य त्यांना मान्य करण्यास भाग पाडले व सबंध भारतभर आपला राजकीय अंमल प्रस्थापित केला.
१७५७ च्या प्लासीच्या लढाईपासून आपणाला ब्रिटिश गव्हर्नर आणि गव्हर्नर जनरल यांच्याविषयीची माहिती, त्यांनी केलेली युद्धे, त्यांच्याद्वारे राबविण्यात आलेली सामाजिक आणि आर्थिक तसेच प्रशासकीय धोरणे आणि या धोरणांचा भारतीयांवर झालेला परिणाम, याला भारतीयांनी दिलेला प्रतिसाद ज्यात ब्रिटिशसत्तेच्या विरोधातील बंड आणि उठाव, प्रबोधनपर्वाला झालेली सुरुवात आणि परिणामस्वरूप सुरू झालेल्या सामाजिक आणि धार्मिक चळवळी व या चळवळींचा भारतीयांवर झालेला परिणाम तसेच शिक्षण आणि वर्तमानपत्रे यांची जनजागृती करणामध्ये असलेली निर्णायक भूमिका इत्यादी घडामोडींची माहिती घ्यावी लागेल. तसेच १७७२च्या रेग्युलेटिंग कायद्यापासून ब्रिटिश संसदेने पारित केलेले कायदे व त्यातील तरतुदी, ज्याला आपण ब्रिटिशकालीन संविधानाचा विकास म्हणून पाहतो इत्यादीशी संबंधित मूलभूत माहिती सर्वप्रथम अभ्यासावी लागणार आहे. त्यामुळे या विषयाचे व्यापक आणि परीक्षाभिमुख आकलन करणे अधिक सुलभ होऊ शकेल.
मागील परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न व स्वरूप
* २०१२मध्ये रयतवारी पद्धती संदर्भात प्रश्न विचारण्यात आलेला होता.
ज्यामध्ये
१)शेतकऱ्यामार्फत थेट शेतसारा सरकारला दिला जात असे. २)रयतेला सरकारने पट्टा दिलेला होता. ३)महसूल लावण्याअगोदर जमिनीचे सर्वेक्षण आणि मोजमाप केले जात असे. अशा प्रकारची तीन विधाने दिलेली होती आणि यातील योग्य विधाने निवडायची होती.
* तसेच २०१२ मध्ये ब्राह्मो समाजावर आणि २०१६ मध्ये सत्यशोधक समाजावर प्रश्न विचारण्यात आलेला होता.
* २०१४ मध्ये १८५८च्या राणीचा जाहीरनाम्याचा उद्देश काय होता, असा प्रश्न विचारण्यात आलेला होता.
* २०१७ मध्ये ब्रिटिश सत्तेच्या काळात भारतात रयतवारी पद्धतीची सुरुवात करण्याशी खालीलपैकी कोण संबंधित होते, हा प्रश्न विचारला होता. त्यासाठी लॉर्ड कॉर्नवॉलिस, अलेक्झांडर रीड, थॉमस मुनरो हे पर्याय देण्यात आलेले होते.
* २०१८मध्ये खालीलपैकी कोणामुळे भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात झाली, हा प्रश्न विचारण्यात आला होता. यासाठी १८१३ चा सनदी कायदा, १८२३ची जनरल कमिटी ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन, प्राच्य-अंग्लो वादविवाद. – हे पर्याय देण्यात आलेले होते.
तसेच याव्यतिरिक्त संस्कृत कॉलेज, कलकत्ता मदरसा, फोर्ट विलियम अर्थर कॉलेज याची स्थापना कोणी केली, यावर प्रश्न विचारण्यात आलेला होता.
वरील प्रश्नांवरून लक्षात येते की, या घटकाचा अभ्यास करताना संकीर्ण माहितीसह विश्लेषणात्मक पद्धतीचाही आधार घ्यावा लागतो. या घटकावर कमी प्रश्न विचारण्यात आलेले असले तरी हा घटक मुख्य परीक्षेलाही आहे. त्यामुळे या घटकाचे सखोल आकलन असणे अपरिहार्य आहे. या विषयावर बाजारामध्ये अनेक संदर्भ ग्रंथ उपलब्ध आहेत पण सर्वप्रथम या विषयाची मूलभूत माहिती अभ्यासण्यासाठी बिपिन चंद्र लिखित आधुनिक भारतावरील जुने एनसीईआरटीचे पुस्तक अभ्यासावे. त्यानंतर या विषयाचा अधिक सखोल अभ्यास करण्यासाठी बी. एल. ग्रोवर आणि एस. ग्रोवर लिखित ‘आधुनिक भारताचा इतिहास’ हे पुस्तक वाचावे.
First Published on March 26, 2019 2:50 am
Web Title: upsc exam 2019 upsc preparation tips ias 2019 exam

No comments:

Post a Comment