Tuesday, June 25, 2019

यूपीएससीची तयारी : भारतीय इतिहास आणि स्वातंत्र्य चळवळ यूपीएससीने २०११पासून पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये बदल केलेला आहे.

यूपीएससीची तयारी : भारतीय इतिहास आणि स्वातंत्र्य चळवळ

यूपीएससीने २०११पासून पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये बदल केलेला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

श्रीकांत जाधव
यूपीएससीने २०११पासून पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये बदल केलेला आहे. पूर्वपरीक्षेसाठी एकूण दोन पेपर आहेत आणि प्रत्येक पेपर हा २०० गुणांसाठी असून यातील पहिल्या पेपरमध्ये १०० प्रश्न आहेत. प्रत्येक प्रश्नाला २ गुण असून चुकीचा पर्याय निवडल्यास पेनल्टी मार्क्स असतात. उदाहरणार्थ एका प्रश्नासाठी ०.३३अशा पद्धतीने एकूण मिळविलेल्या गुणांमधून पेनल्टी गुण वजा केले जातात. याचबरोबर २०१५पासून यूपीएससीने पूर्व परीक्षा उतीर्ण होण्यासाठी आणखी एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. पूर्वपरीक्षेतील पेपर दोन म्हणजे नागरी सेवा कल चाचणी (C-SAT) हा पात्रता (क्वालिफाइंग) पेपर केला आहे (एकूण ८० प्रश्न आणि प्रत्येक प्रश्न २.५ गुणांसाठी असतो) यामध्ये उतीर्ण होण्यासाठी कमीत कमी एकूण गुणांपैकी ३३% गुण प्राप्त करणे अनिवार्य आहे. या पेपरमध्येही चुकीचा पर्याय निवडल्यास एका प्रश्नासाठी ०.३३ अशा पद्धतीने एकूण मिळविलेल्या गुणांमधून पेनल्टी गुण वजा केले जातात. तसेच या पेपरचे गुण अंतिम मेरीट ठरविण्यात ग्राह्य धरले जात नाहीत. पहिल्या पेपरमध्ये प्राप्त केलेल्या गुणांवरून अंतिम मेरीट ठरविले जाते.
भारतीय इतिहास आणि स्वातंत्र्य चळवळ
प्रस्तुत लेखामध्ये आपण पूर्वपरीक्षा पेपर पहिला यामधील भारतीय इतिहास आणि स्वातंत्र्य चळवळ या घटकाची तयारी कशी करावी याची चर्चा करणार आहोत. तसेच २०११ ते २०१८ पर्यंत या घटकावर किती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत याचादेखील आपण आढावा घेणार आहोत. या घटकामध्ये प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत आणि आधुनिक भारत तसेच भारतीय कला आणि संस्कृती या अन्य घटकांचाही समावेश होतो. सर्वप्रथम आपण या घटकावर वर्षनिहाय विचारण्यात आलेल्या प्रश्नांची संख्या पाहू : २०११ (१३ प्रश्न), २०१२ (१८ प्रश्न), २०१३ (१५ प्रश्न), २०१४ (२० प्रश्न), २०१५ (१८ प्रश्न), २०१६ (१६ प्रश्न), २०१७ (१४ प्रश्न), २०१८ (२१ प्रश्न). या प्रश्नांच्या संख्येवरून आपणाला या घटकाचा अभ्यास पूर्वपरीक्षेत यशस्वी होण्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे लक्षात येते. हा घटक अभ्यासाच्या दृष्टीने पुढीलप्रमाणे विभागता येऊ शकतो ज्यामुळे आपणाला या विषयाचा परीक्षाभिमुख आवाका लक्षात येईल आणि त्यानुसार अभ्यासाचे योग्य नियोजन करता येऊ शकेल.
अ) प्राचीन भारत – प्राचीन भारताच्या इतिहासाचे महत्त्व आणि अभ्यासाची साधने, प्रागतिहासिक भारत, ताम्रापाषण कृषी संस्कृती, सिंधू संस्कृती, वैदिक संस्कृती, बौद्धयुग अथवा महाजनपदाचा कालखंड, मौर्य कालखंड, मौर्योत्तर कालखंड, गुप्त कालखंड आणि गुप्तोत्तर कालखंड इत्यादी.
ब) मध्ययुगीन भारत – प्रारंभिक मध्ययुगीन कालखंड (इ.स. ७५०-१२००), दिल्ली सल्तनत, उत्तर भारतातील प्रादेशिक देशी सत्ता, विजयनगर साम्राज्य, बहामनी राजघराणे, मुघल साम्राज्य, मराठा कालखंड आणि मध्ययुगीन भारतातील धार्मिक चळवळी इत्यादी.
क) आधुनिक भारत – युरोपियनांचे आगमन आणि ब्रिटिशसत्तेची भारतात स्थापना, ब्रिटिशसत्तेचा भारतावरील परिणाम, ब्रिटिशसत्तेच्या विरोधातील उठाव, १९व्या शतकातील सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळी, शिक्षण आणि वृतपत्रे यांची वाढ आणि विकास, भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ, क्रांतिकारी चळवळी, कामगार चळवळ, भारतातील सांप्रदायिकतेची वाढ, गव्हर्नर जनरल आणि व्हाइसरॉय, भारतातील घटनात्मक विकास, महत्त्वपूर्ण व्यक्ती इत्यादी.
ड) भारतीय कला आणि संस्कृती – भारतीय स्थापत्यकला आणि शिल्पकला, भारतीय चित्रकला, भारतीय संगीत, नृत्य आणि नाटय़, भारतीय साहित्य, भारतीय हस्तकला इत्यादी.
अभ्यासाचे नियोजन आणि संदर्भ साहित्य
यातील नेमका कोणता भाग परीक्षेच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचा आहे, याचे आकलन आपणाला मागील परीक्षांमध्ये या घटकावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांवरून लक्षात येते. या घटकाची व्याप्ती खूप मोठी आहे तसेच याचे स्वरूप पारंपरिक पद्धतीचे आहे. त्यामुळे हा घटक सर्वप्रथम सखोल पद्धतीने अभ्यासणे गरजेचे आहे. त्यानंतर या घटकावर स्वत:च्या उजळणी स्वरूपातील टिप्पणे तयार करावीत. जेणेकरून हा घटक कमीत कमी वेळेमध्ये परीक्षेच्या दृष्टीने अभ्यासता येऊ शकतो. सर्वसाधारणपणे या घटकामध्ये प्राचीन भारत, आधुनिक भारत, भारतीय कला आणि संस्कृती यावर सर्वाधिक प्रश्न विचारले जातात. तसेच मागील परीक्षांमधील प्रश्नाचे विश्लेषण केल्यास असे दिसून येते की, भारतीय कला आणि संस्कृती यावर अधिक प्रश्न विचारण्यात येऊ लागलेले आहेत. हा घटक अभ्यासताना वस्तुनिष्ठ माहितीचा अभ्यास करणे गरजेचे आहे.
या घटकाच्या तयारीसाठी एन.सी.ई.आर.टी बोर्डाची शालेय पुस्तके सर्वप्रथम वाचावीत. बाजारात या घटकासाठी अनेक गाइडस स्वरूपात पुस्तके उपलब्ध आहेत. यातील नेमकी कोणती पुस्तके या घटकाची परीक्षाभिमुख तयारी करण्यासाठी महत्त्वाची आहेत याची माहिती असणे गरजेचे आहे.
First Published on March 12, 2019 3:53 am
Web Title: tips for upsc exam preparation

No comments:

Post a Comment