Saturday, June 29, 2019

एमपीएससी मंत्र : भारतीय स्वातंत्र्य चळवळ भारतीय स्वातंत्र्य चळवळ

एमपीएससी मंत्र : भारतीय स्वातंत्र्य चळवळ

भारतीय स्वातंत्र्य चळवळ

(संग्रहित छायाचित्र)

श्रीकांत जाधव
आजच्या लेखामध्ये आपण भारतीय स्वातंत्र्य चळवळ या विषयाची पूर्वपरीक्षेसाठी तयारी कशी करावी याची चर्चा करणार आहोत. या विषयावर २०११ ते २०१८ दरम्यान एकूण ४७ प्रश्न विचारण्यात आले आहेत.
भारतीय स्वातंत्र्य चळवळ या विषयाची तयारी करताना प्रामुख्याने भारतीय राष्ट्रवाद आणि तिच्या उदयाची कारणे, विविध प्रादेशिक राजकीय संघटना, १८८५मधील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना आणि येथून पुढे स्वातंत्र्यप्राप्तीसाठी संघटित पद्धतीने सुरू झालेला लढा; या घटकांचा अभ्यास करावा लागतो.
राष्ट्रीय चळवळीची सर्वसाधारणपणे तीन टप्प्यांत विभागणी केली जाते – मवाळ अथवा नेमस्त कालखंड (१८८५-१९०५), जहालवादी कालखंड (१९०५-१९१९) आणि गांधी युग (१९२०-१९४७) तसेच याला समांतर असणारे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील इतर प्रवाह ज्यामध्ये कामगार चळवळ, क्रांतिकारी चळवळ इत्यादी चळवळीचा समावेश होतो. त्याचबरोबर स्वराज पार्टी, आझाद हिंद सेना, भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महिलांचे योगदान, भारतीय सांप्रदायिकतेचा उदय, मुस्लीम लीग, हिंदू महासभा, भारतीय संस्थाने व संस्थानमधील प्रजेच्या चळवळी, कनिष्ठ जातीतील चळवळी, आधुनिक भारताच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण व्यक्ती तसेच गव्हर्नर जनरल (व्हाइसरॉय) आणि भारतमंत्री यांची सखोल माहिती असणे गरजेचे आहे. तसेच १८५७ नंतर ब्रिटिश संसदेने पारित केलेले कायदे- १८५८, १८६१, १८९१, १९०९, १९१९, १९३५ व १९४७ ज्यांना आपण ब्रिटिशकालीन भारतातील राज्यघटनेचा विकास म्हणून पाहतो त्याबद्दलही विद्यार्थ्यांना माहिती असायला हवी. सायमन कमिशन, गोलमेज परिषद, ऑगस्ट ऑफर, क्रिप्प्स मिशन, वावेल प्लान, कॅबिनेट मिशन इत्यादीशी संबंधित मूलभूत माहिती असणे गरजेचे आहे.
मागील परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न व स्वरूप
*   २०१२ मध्ये
भारतीय राष्ट्रीय चळवळीमध्ये दादाभाई नौरोजींचे सर्वात महत्त्वाचे योगदान कोणते होते? या प्रश्नासाठी पुढील ३ विधाने दिली होती. त्यातून योग्य विधान/ विधाने निवडायची होती.
१) ब्रिटिशांकडून भारतीयांची होणारी आíथक पिळवणूक उघड केली.
२) प्राचीन भारतीय साहित्याचा अर्थ स्पष्ट करून भारतीयांचा आत्मविश्वास वाढविला.
३) सामाजिकदृष्टय़ा दुष्ट प्रवृत्तीचे उच्चाटन करण्याच्या गरजेवर भर दिला.
*   २०१३ मध्ये
इलबर्ट बिल कशाशी संबंधित होते? या प्रश्नासाठी पुढील चार पर्याय देऊन त्यातील योग्य पर्याय निवडायचा होता.
१) भारतीयांना शस्त्र बाळगण्यासाठी निश्चित स्वरूपाचे र्निबध लादणे.
२) भारतीय भाषांमध्ये प्रकाशित होणारी वर्तमानपत्रे आणि मासिकांवर र्निबध लादणे.
३) युरोपियन लोकांवर खटला चालविण्यासाठी भारतीयांवर लादलेली अपात्रता काढून टाकणे.
४) आयात केलेल्या सुती कपडय़ावरील कर रद्द करणे.
*   २०१४ मध्ये
१९२९चे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन भारतीय इतिहासामध्ये का महत्त्वपूर्ण मानले जाते? हा प्रश्न होता. त्यासाठी खालील पर्यायांमधून योग्य पर्याय निवडायचा होता.
१) स्व-सरकार मिळविणे हे काँग्रेसचे उद्दिष्ट आहे ही घोषणा केली.
२) पूर्णस्वराज मिळविणे हा काँग्रेसचा उद्देश आहे याची घोषणा केली.
३) असहकार चळवळ सुरू करण्यात आली.
४) लंडनमध्ये होणाऱ्या गोलमेज परिषदेत सहभाग घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
*   २०१५मध्ये
खालीलपकी कोणत्या चळवळीमुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विभाजन होऊन मवाळवादी आणि जहालवादी गटांचा उदय झाला? हा प्रश्न होता. त्यासाठी, स्वदेशी चळवळ, चलेजाव चळवळ, असहकार चळवळ आणि सविनय कायदेभंग चळवळ  हे चार पर्याय देण्यात आलेले होते व यातून योग्य पर्याय निवडायचा होता.
*   २०१६ मध्ये
माँटेग्यू – चेम्सफोर्ड प्रस्ताव कशाशी संबंधित होता? या प्रश्नासाठी पुढीलपैकी योग्य पर्याय निवडायचा होता.
सामजिक सुधारणा, शैक्षणिक सुधारणा, पोलीस प्रशासनातील सुधारणा, घटनात्मक सुधारणा.
*   २०१७मध्ये
बट्लर समिती, १९२९चा ट्रेड डिस्प्युट कायदा, १८८१ चा फॅक्टरी कायदा, तसेच द्विदलशासन पद्धती (Dyarchy) इत्यादीवर प्रश्न विचारण्यात आलेले होते.
*   २०१८ मध्ये
१९३५ चा भारत सरकार कायदा, हिंद मजदूर सभा आदींवर प्रश्न विचारले गेले होते. तसेच कोणत्या संघटनेचे नाव बदलून स्वराज्य सभा ठेवण्यात आलेले होते? हाही प्रश्न विचारला होता.
वरीलप्रमाणे प्रश्न पाहताना आणि विषयाचा अभ्यास करताना आपणाला वस्तुनिष्ठ माहितीचे संकलन, तसेच व्यक्तिविशेष माहिती, विविध चळवळी आणि संबंधित घडामोडी इत्यादी पलूंच्या आधारे या विषयाचे आकलन करणे गरजेचे आहे. हा विषय पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टीने तयार करावा लागतो. त्यामुळे या विषयाच्या सखोल आणि व्यापक पलूंचा विचार करून तयारी करावी लागते. या विषयाची मूलभूत माहिती अभ्यासण्यासाठी बिपिन चंद्र लिखित आधुनिक भारतावरील एनसीईआरटीची जुनी पुस्तके अभ्यासावीत.  त्यानंतर या विषयाचा अधिक सखोल अभ्यास करण्यासाठी बिपिन चंद्र लिखित ‘आयडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स’; बी. एल. ग्रोवर आणि एस. ग्रोवर लिखित ‘आधुनिक भारताचा इतिहास’, सुमित सरकार लिखित ‘आधुनिक भारत’ इत्यादी संदर्भग्रंथ वाचावेत. महत्त्वाचे म्हणजे या संदर्भग्रंथांवर आधारित स्वतची टिप्पणे काढावीत. जेणेकरून हा विषय कमीतकमी वेळेमध्ये अभ्यासला जाऊ शकेल.
First Published on March 28, 2019 12:08 am
Web Title: article on indian freedom movement

No comments:

Post a Comment