Tuesday, June 25, 2019

भूगोलाची तयारी एमपीएससी मंत्र

भूगोलाची तयारी

एमपीएससी मंत्र

|| फारुक नाईकवाडे
मागील लेखामध्ये दुय्यम सेवा पूर्व परीक्षेच्या इतिहास घटकाची तयारी कशी करावी, याबाबत चर्चा करण्यात आली. या लेखामध्ये दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षेच्या भूगोल घटकाच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येत आहे.
या घटकाचा अभ्यासक्रम ‘भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह)- पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी’ असा विहीत करण्यात आला आहे. अभ्यासक्रमामध्ये दिलेले उपघटक हे तयारीचा मूळ गाभा असायला हवेतच पण ‘इत्यादी’ शब्दप्रयोगामुळे काही अनुल्लिखित बाबी तयारीमध्ये समाविष्ट करणे आवश्यक ठरणार आहे. सन २०१७ पासून संयुक्त पूर्व परीक्षा सुरू झाली असली तरी सहायक कक्ष अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक आणि विक्रीकर निरीक्षक या तीन पदांच्या स्वतंत्र पूर्वपरीक्षा आणि संयुक्त पूर्व परीक्षेच्या मागील दोन वर्षांच्या प्रश्नपत्रिका यांवरून भूगोलाचे कोणते उपघटक तयारीमध्ये समाविष्ट करावे लागतील त्यांचा अंदाज बांधता येतो. या प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणावरून ‘आर्थिक भूगोलातील नसर्गिक साधनसंपत्ती – खनिजे, ऊर्जा स्रोत, पायाभूत सुविधा, भारताचा प्राकृतिक भूगोल, मानवी भूगोल आणि राजकीय भूगोल’ हे मुद्दे अभ्यासामध्ये
समाविष्ट असणे आवश्यक असल्याचे दिसते.
उपघटकनिहाय तयारी कशी करावी ते पाहू.
  • पृथ्वी, अक्षांश-रेखांश, जगातील विभाग यांचा अभ्यास एकत्रितपणे करायला हवा. पृथ्वीची रचना, पृथ्वीचा आस आणि त्याचे कलणे, अक्षांश, रेखांश, पृथ्वीच्या परिवलनामुळे निर्माण झालेल्या पृथ्वीच्या विशिष्ट स्थिती (संपात दिन, आयन दिन), वातावरण, हवामानाचे घटक, मान्सूनची निर्मिती, मान्सूनवर परिणाम करणारे घटक, वाऱ्यांची निर्मिती, भूरूप निर्मिती, भूकंप, वादळांची निर्मिती, प्रमाण वेळ अशा पायाभूत संकल्पनांचा अभ्यास आवश्यक आहे. या घटकांचा दिलेल्या क्रमाने समजून घेत अभ्यास करणे फायद्याचे ठरेल. या संकल्पना समजल्या की त्यावरील विश्लेषणात्मक, बहुविधानी प्रश्न तसेच चालू घडामोडींवर आधारित प्रश्न सोडविणे सोपे होते.
  • या संकल्पना समजून घेतानाच जगातील त्या त्या उदाहरणांचा आढावा सारणी पद्धतीमध्ये घ्या. ज्वालामुखी, सागरी प्रवाह, पर्वतरांगा तसेच नदी, वारा, समुद्रलाटा, हिमनद्या यांच्याद्वारे निर्मित भूरूपे या बाबी नीट समजून घ्याव्यात आणि त्यांचे आकार, जागतिक स्तरावरील तसेच देश व त्यातील उदाहरणे लक्षात ठेवावीत.
  • मृदा, हवामान, वने, बंदरे, स्थानिक वारे, विविध आखाते, सामुद्रधुनी आणि महासागर, हवामान प्रदेश, नद्या, वाळवंटे, पर्वतरांगा, पठारे या घटकांचा नकाशा समोर ठेवून अभ्यास करावा. त्यामुळे फोटोग्राफिक मेमरीचा वापर होऊन तो व्यवस्थित लक्षात राहतो. या बाबींच्या ठळक उदाहरणांची टिप्पणे सारणी पद्धतीत काढणे शक्य आणि तयारीच्या दृष्टीने व्यवहार्य आहे.
  • मानवी भूगोलामध्ये वेगवेगळ्या जागतिक प्रदेशांमधील महत्त्वाच्या जमातींचा सारणी पद्धतीत टिप्पणे काढून अभ्यास करावा. तसेच महाराष्ट्रातील आदीम जमाती, देशातील महत्त्वाच्या आदीम जमाती व त्यांचे भूप्रदेश, त्यांच्या शेतीचे प्रकार, चच्रेत असल्यास त्यांच्याबाबतचे महत्त्वपूर्ण मुद्दे यांचा आढावाही घेणे आवश्यक आहे.
  • भारतातील व महाराष्ट्रातील हवामान, पर्जन्यमान म्हणजेच भारतीय मान्सून आणि भारताचा प्राकृतिक भूगोल यांचा अभ्यास एकत्रित करायला हवा. यातील भारताच्या प्राकृतिक भूगोलामध्ये नदीप्रणाली, पर्वतप्रणाली, हवामान प्रदेश, वनांचे प्रकार, खडकांचे व मृदेचे प्रकार यांचा आढावा नकाशाच्या आधारे घ्यायला हवा.
  • नदीप्रणाली, पर्वतप्रणाली यांचा उत्तर-दक्षिण व पूर्व-पश्चिम क्रम लक्षात ठेवावा. विशेषत: महाराष्ट्रातील नदी खोरी व पर्वतरांगा यांचा एकत्रित अभ्यास करावा. महाराष्ट्राच्या पश्चिम वाहिनी नद्यांचा क्रम, घाटांचा क्रम लक्षात ठेवावा. पश्चिम वाहिनी नद्यांच्या महत्त्वाच्या खाडय़ांची नावे माहीत असायला हवीत.
  • पायाभूत सुविधांचा आढावा घेताना महत्त्वाचे महामार्ग, विकसित बंदरे, व्यापारी बंदरे, लोहमार्ग यांचा आढावा घ्यायला हवा.
  • आर्थिक भूगोलामध्ये महत्त्वाची खनिजे व त्यांचे स्रोत खडक आणि मुख्य उत्पादक जिल्हे/ राज्ये, महत्त्वाची पर्यटनस्थळे, धबधबे, धार्मिक स्थळे, जिल्ह्य़ाची मुख्य केंद्रे, उद्योगांची मुख्य स्थाने, महत्त्वाच्या शहरांची वैशिष्टय़े व त्यांची टोपणनावे, ती नदीकिनारी असल्यास संबंधित नद्या यांची सारणी पद्घतीत टिप्पणे काढल्यास त्याचा खूप उपयोग होतो. विशेषत: जोडय़ा जुळवा प्रकारातील प्रश्न सोडविताना खूप फायदा होतो.
  • पशुधन, कृषीचे प्रकार, मासेमारी, वने, प्रमुख पिके – नगदी व अन्नधान्य – त्यांचे वितरण, कृषी क्षेत्रातील विविध क्रांती याचा अभ्यासक्रमामध्ये उल्लेख नसला तरीही त्यावर प्रश्न विचारण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांचा भारत आणि महाराष्ट्र यांच्या पीक हवामान प्रदेशानुसार अभ्यास करणे आवश्यक आहे.
  • भारताचा व महाराष्ट्राचा राजकीय भूगोल पाहताना जिल्ह्य़ांचे आकार, राज्यांचे आकार, भूवेष्टित, किनारी राज्ये/ जिल्हे, सीमारेषेवरील राज्ये/ जिल्हे यांचा नकाशा समोर ठेवून अभ्यास करावा.
First Published on March 8, 2019 12:32 am
Web Title: geography preparation for mpsc

No comments:

Post a Comment