Tuesday, March 17, 2015

नवनीत [Print] [Email] चांदीचा वर्ख

नवनीत

चांदीचा वर्ख

Published: Friday, September 26, 2014
मिठाईच्या कोणत्याही दुकानात चांदीचा वर्ख लावलेली मिठाई हमखास आढळते, पण ती खाण्यास योग्य आहे का, असा प्रश्न हमखास प्रत्येकाच्या मनात येतो. याचबरोबर फक्त चांदीचाच वर्ख बनवता येतो का, की इतर मूलद्रव्यांचाही वर्ख बनवता येतो?
लाटता येण्यासारख्या कोणत्याही धातूपासून वर्ख बनविता येतो. मात्र वर्ख बनविण्यासाठी तन्य व प्रसरणशील धातू सोयीचा असतो. धातू जेवढा अधिक तन्य व वर्धनशील असतो तेवढा अधिक पातळ वर्ख तयार करता येतो. उदा. सर्वात तन्य असलेल्या सोन्याचा ०.०००००७५ सेंमी. जाडीचा वर्ख बनविता येतो. वर्खासाठी धातुशुद्धताही असावी लागते. कारण अशुद्ध घटकांमुळे धातूची तन्यता कमी होते. वर्ख सामान्यपणे ०.००५ सेंमी. वा त्याहून पातळ असतो.
सोन्याचांदीचे वर्ख सर्वसाधारणपणे घरगुती पातळीवर व मुख्यत्वे लाकडी हातोडय़ाने ठोकून तयार करतात. याकरिता अतिशुद्ध सोन्याच्या वा चांदीच्या पत्र्याचे छोटे तुकडे घेतात. त्यांच्यामध्ये चिवट कागदाचे वा श्ॉमॉय चामडय़ाचे तुकडे घालून एकावर एक रचतात. नंतर या चवडीवर लाकडी हातोडय़ाने ठोके देऊन वर्ख तयार करतात. प्रत्येक ठोक्यानंतर चवड फिरवितात. यामुळे पुढील ठोका दुसऱ्या जागी बसून पत्रा प्रसरण पावत जातो. या पद्धतीने दीर्घ काळाने हळूहळू प्रसरण पावत जाऊन पत्र्यापासून अतिशय पातळ असे वर्खाचे मोठे तुकडे तयार होतात.
चांदीचा वर्ख पानांचे विडे, मेवामिठाई आणि अन्य खाद्यपदार्थ सजविण्यासाठी, तसेच दंतवैद्यकात व विद्युत विलेपनातही वापरतात. वर्ख म्हणून खाण्याच्या पदार्थात या मूलद्रव्यांचा वर्ख वापरला जातो, पण यासाठी ही मूलद्रव्ये शुद्ध स्वरूपात असावी लागतात. वर्ख स्वरूपात चांदी, सोने ही मूलद्रव्ये निष्क्रिय असतात. चांदीच्या वर्खासाठी चांदी ९९.९% इतकी शुद्ध असणे आवश्यक आहे. एका किलोमागे चांदीचा वर्ख हा १ मि.ग्रॅमपेक्षा कमी असावा, जर जास्त प्रमाणात चांदी शरीरात गेल्यास अर्जयिा हा आजार उद्भवतो.
हल्ली खूपदा चांदीच्या वर्खाऐवजी अॅल्युमिनिअमचा वर्ख वापरला जातो. आरोग्याच्या दृष्टीने ते घातक आहे. शरीरात अॅल्युमिनिअमचं प्रमाण वाढल्यास चेतासंस्थेवर व मेंदूवर वाईट परिणाम होतो.

No comments:

Post a Comment