Tuesday, March 17, 2015

नवनीत [Print] [Email] कुतूहल - शरीरात वापरलेली संमिश्रे

नवनीत

कुतूहल - शरीरात वापरलेली संमिश्रे

Published: Tuesday, September 23, 2014
काही कारणानं शरीरातील हाड मोडलं असेल किंवा सांधा उखडला असेल तर ते सांधण्यासाठी धातूंच्या संमिश्रांचा वापर केला जातो. पूर्वी सोनं-तांबं हे संमिश्र संपूर्ण दातांवर आवरण देण्याकरिता वापरत. याचं मुख्य कारण सोन्याची रासायनिक अक्रियशीलता. परंतु हल्ली त्याकरिता स्टेनलेस स्टीलचा वापर करतात.
दातांमध्ये वापरल्या जाणाऱ्या संमिश्राचा रक्ताशी संबंध येत नाही. पण हाडांना आधार देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पट्टय़ा मात्र रक्ताच्या संपर्कात येतात. या संमिश्राकरिता गंज आणि रसायनरोधकतेबरोबर शरीराची त्यांना सामावून घेण्याची क्षमता हासुद्धा महत्त्वाचा मुद्दा ठरतो. शरीरात आलेल्या धातूला शरीराच्या संरक्षण यंत्रणेनं अनावश्यक किंवा अपायकारक ठरविलं तर शरीरावर विपरित परिणाम होऊ शकतात. या सर्व बाबींचा विचार करता स्टेनलेस स्टील गटातील काही संमिश्रं आणि टायटॅनिअम हा धातू आणि त्याची काही संमिश्रं हाडांना सांधण्यासाठी किंवा आधार देण्यासाठी वापरली जातात. कृत्रिम गुडघा रोपण ही आता सामान्य शस्त्रक्रिया समजली जाते. कृत्रिम गुडघ्याचा सांधा हा टायटॅनिअम या धातूचं संमिश्र आहे.
आपल्या सर्वाच्या परिचयाचं संमिश्र जे दातांसाठी वापरलं जातं ते म्हणजे चांदी-पारा (अमॅलगम) यांचं संमिश्र होय. हे वापरण्याचं मुख्य कारण म्हणजे चांदी पाऱ्यामध्ये एकजीव होते आणि एक मऊ संमिश्र तयार होतं, जे दातांमधल्या पोकळीत सहज भरता येतं. दाबून भरलेलं हे संमिश्र पोकळीचा आकार घेतं. सुरूवातीला मऊ असणारं हे संमिश्र थोडय़ाच वेळात टणक होऊ लागतं आणि चावण्याच्या क्रियेत ते घासून निघून जात नाही. शिवाय चांदीची गंजरोधकता खूपच जास्त असल्यानं अन्नातील आम्लांचा त्यावर काहीच परिणाम होत नाही. संपूर्ण दातांवर जे आवरण बसविलं जातं त्यासाठी मात्र पारा-चांदी या संमिश्राचा वापर करीत नाहीत, तर स्टेनलेस स्टील वापरतात. कारण त्याचा पत्रा बनू शकत नाही. पारा हा सामान्य तापमानाला द्रवरूप असलेला एकमेव धातू आहे. खरंतर शरीरात पारा गेल्यास अपायकारक ठरतो. त्यामुळे दातांसाठी पाऱ्याचं संमिश्र वापरण्यावर काही देशांमध्ये बंदी आहे.

No comments:

Post a Comment