Tuesday, March 17, 2015

नवनीत [Print] [Email] रसगंध रसायनांमुळेच शक्य

नवनीत

रसगंध रसायनांमुळेच शक्य

Published: Friday, November 7, 2014
ही दुनिया जितकी रंगांनी सजलेली आहे, तेवढीच गंधाने भरलेली आहे. वेगवेगळ्या पदार्थाना लाभलेले गंध कळत नकळत आपल्याला काही संदेश देत असतात आणि आपला मेंदू हे संदेश वाचत, आपण काय करावं याच्या सूचना देत असतो. गमतीची गोष्ट म्हणजे बहुतेक वेळा, ज्या वस्तूंचा किंवा पदार्थाचा संपर्क आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहेत, त्या पदार्थामध्ये अशी काही रासायनिक प्रक्रिया होते की त्यातून निर्माण होणाऱ्या पदार्थाना घाणेरडा किंवा उग्र वास येतो. साहजिकच आपण अशा वासांपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो. रस्त्यावर असलेल्या केर-कुंडीजवळून जाताना किंवा सार्वजनिक मुताऱ्यांजवळून जाताना आपली चालण्याची गती वाढते, तर एखाद्या दुकानावरून जाताना आपली पावलं काही क्षण रेंगाळतात. कधी काही वास आपल्याला संभाव्य धोक्याची सूचना देतात. गळणाऱ्या गॅसचा वास हा अशातलाच एक! किंवा काहीतरी जळल्याचा वास आला की आपण घरातली विजेची उपकरणं तपासतो.
गंध आणि तो निर्माण करणारे पदार्थ किंवा रसायनं म्हणजे रोजच्या जीवनाचा एक अविभाज्य भागच जणू! सकाळी उठल्यावर चहा उकळताना येणारा वास, आपल्याला चहा पिण्याआधीच चहा प्यायला मिळणार असल्याचा आनंद देतो. पावभाजी किंवा बटाटावडय़ाच्या गाडीशेजारून जाताना नुसत्या वासानेच आपली भूक चाळवते. आंघोळ करताना, साबणाचा सुवास आपल्याला आल्हाददायी वाटतो. देवपूजा करताना लावलेल्या उदबत्तीचा सुगंध साऱ्या घराचं वातावरण प्रसन्न करतो. आपल्या अंगाला दिवसभर चांगला वास येत राहावा म्हणून घराबाहेर पडताना तर आपल्यापकी बरेच जण आवर्जून परफ्यूम वापरतात. बाथरूम्स, टॉयलेट्स किंवा कपाटं यांमध्ये मंद सुगंध हवेत सोडणाऱ्या फ्रेशनर्सच्या वडय़ा टांगलेल्या असतात. लादी पुसण्यासाठी तर वेगवेगळे गंध असलेली रसायनं सध्या बाजारात मिळताहेत. सौदर्यप्रसाधनं आणि सुगंध यांचंही अतूट नातं आहे. थोडक्यात काय तर गंधांचा रसायनांशी घनिष्ट संबंध आहे म्हणून गंध आहेत आणि रसायनशास्त्र आहे म्हणूनच गंधाचा उपयोग आपण पुरेपूर करून घेऊ शकतो, हेच खरं!

No comments:

Post a Comment