Wednesday, July 30, 2014

नवनीत कुतूहल: खाद्यतेल बनवण्याची प्रक्रिया Procedure to make Edible oil

नवनीत


कुतूहल: खाद्यतेल बनवण्याची प्रक्रिया

Published: Tuesday, July 22, 2014
कुतूहल
खाद्यतेल बनवण्याची प्रक्रिया
वनस्पतिजन्य पदार्थापासून तेल मिळविण्याची पद्धत माणसाला प्राचीन काळापासून अवगत होती. सूर्याची उष्णता, भट्टी, शेकोटी यांमध्ये तेलबिया, फळे यांना तेल पाझरेपर्यंत उष्णता देत. पाझरलेले तेल गोळा करून त्याचा वापर स्वयंपाकात करीत असत. त्यानंतर तेलबिया भाजून, कुटून पाण्यात उकळवून, पाण्यावर जमा झालेले तेलाचे तवंग गोळा करीत व जमा केलेले तेल वापरीत. यांत्रिक क्रांतीनंतर चक्की किंवा जाते याचा वापर तेलबियांचे बारीक चूर्ण करण्यासाठी होऊ लागला. सुरुवातीला या जात्यांचा दांडा माणसे किंवा जनावरे ओढीत असत. नंतर पाण्याच्या दाबाचा, विद्युत शक्तीचा, स्क्रूपेसचा उपयोग करून चक्की किंवा जाते फिरविले जात असे. विद्रावकाचा उपयोग करून तेल निष्कर्षणाची पद्धती १८४३ पासून जर्मन, इंग्लंडमध्ये प्रचलित आहे. घाणीच्या पद्धतीचा वापर केल्याने २० ते ३० % तेल मिळते, निष्कासन पद्धतीत ३४ ते ३७ % तर विद्रावक निष्कासन पद्धतीत ४० ते ४५ % तेल मिळते. तेल हे वनस्पतीच्या वेगवेगळ्या भागांपासून मिळवितात, उदा. बियांपासून (सूर्यफूल, तीळ, भुईमूग, सोयाबीन, बदाम), फळातील गरापासून (खोबरेल तेल, पाम तेल, ऑलिव्ह तेल), धान्याच्या कोंबापासून, भ्रूणापासून (कॉर्न तेल)ही तेल मिळवितात.
घाणीचे तेल मिळविण्याच्या पद्धतीमध्ये उष्णता न देता सामान्य तापमानाला तेल मिळविले जाते. या तेलात मूळपदार्थाची चव व वास राहतो, परंतु रंग व काही अशुद्ध घटक शिल्लक राहतात. हे तेल स्वयंपाकात वापरण्यास योग्य असते. श्रम जास्त व उत्पादन कमी यामुळे ही पद्धती आता मागे पडली आहे. निष्कासन पद्धतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ग्राइंडर तेलबियाच्या प्रकारानुसार वापरले जातात. काढलेले तेल दोनतीन वेळा गाळून अशुद्ध घटक दूर केले जातात. उष्णतेचा वापर नसल्यामुळे रंग, वास कायम असतो. द्रावकाचा उपयोग करून यंत्राच्या सहाय्याने काढलेल्या वनस्पती तेलात पेट्रोलजन्य पदार्थ हेक्झेन मिसळले जाते. हे मिश्रण उकळवितात त्यामुळे त्यातील अशुद्ध घटक घनरूप होऊन तळाशी जातात आणि वरील तेल बाजूला करून तापविले जाते. उष्णतेमुळे हेक्झेनचे वाफेत रूपांतर होते. शिल्लक तेल रंगहीन करण्यासाठी अल्कलीचा वापर करतात. अल्कली तेलातील मेदाम्लाशी संयोग पावते व साबण तयार होतो, तो अपकेंद्री पद्धतीने वेगळा करतात. खालील तेल परत पाण्याने स्वच्छ धुऊन मुक्त कार्बन आणि ०.०१ % सायट्रिक आम्ल वापरून शिल्लक अशुद्ध घटक दूर करतात. अशा प्रकारे तयार झालेले रिफाइंड तेल पिशवीत, बाटलीत हवाबंद करून दुकानात येते.
मंगला कुलकर्णी (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२
office@mavipamumbai.org
प्रबोधन पर्व

No comments:

Post a Comment