Friday, July 11, 2014

नवनीत कुतूहल: लालबुंद रक्त!

नवनीत


कुतूहल: लालबुंद रक्त!

Published: Thursday, July 3, 2014
आपल्या शरीरात 'रक्त' नावाचं एक महत्त्वाचं रसायन सतत कार्यरत असतं. अनेक घटकांनी तयार झालेलं रक्त आपल्या शरीरात विविध प्रकारची कामं करतं. त्याच्या अनेक कार्यापकी आपल्या परिचयाचं कार्य म्हणजे शरीरातल्या प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजन वाहून नेणं.
नाकावाटे हवा आपल्या फुप्फुसात जाते. तिथे हवेतील ऑक्सिजन रक्तात मिसळतो. रक्तामध्ये 'हिमोग्लोबीन' नावाचं एक लोखंडाचं संयुग असतं. या संयुगाबद्दल ऑक्सिजनला खूप आकर्षण असतं. तेव्हा फुप्फुसात आलेल्या हवेतल्या ऑक्सिजनला हे रक्तातलं संयुग दिसताच तो हवेतून थेट रक्तात जातो आणि हिमोग्लोबिनला चिकटतो. आता ही 'ऑक्सी-हिमोग्लोबीन'ची जोडगोळी शरीराच्या प्रवासाला निघते.
ऑक्सिजनचा स्वभावच मुळी जो जो जगण्याची धडपड करतो त्याला मदत करण्याचा! 'ऑक्सी-हिमोग्लोबीन'ची जोडगोळी शरीरातल्या पेशींना भेट देत पुढे पुढे सरकू लागते. ज्या पेशींमध्ये ऊर्जानिर्मितीचं काम चालू आहे, त्या त्या पेशीमध्ये हिमोग्लोबीनचा हात सोडून 'ऑक्सिजन' मदतीला धावून जातो. 'ऑक्सिजन'च्या मदतीने पेशी अन्नाचं ज्वलन करून ऊर्जा निर्माण करतात. ऊर्जा तयार होण्याच्या या प्रक्रियेत ऑक्सिजन खर्ची पडतो आणि कार्बन-डायऑक्साइड तयार होतो. आता कार्बन-डायऑक्साइड रक्ताचा आधार घेत पुन्हा फुप्फुसात येतो आणि हवेवाटे बाहेर सोडला जातो.
'ऑक्सी-हिमोग्लोबीन'ची जोडी लालबुंद रंगाची असते. त्यामुळे ऑक्सिजन असलेलं, आपल्या शरीरातलं शुद्ध रक्त लाल रंगाचं असतं. पण एकदा का ऑक्सिजन हिमोग्लोबीनची साथ सोडून पेशीत मिसळला आणि त्याच्या जागी कार्बन-डायऑक्साइड आला की रक्त थोडं निळसर लाल रंगाचं होतं, ज्याला  आपण अशुद्ध रक्त म्हणून ओळखतो. आपल्या त्वचेलगत आपल्याला काही निळ्या रंगाच्या रक्तवाहिन्या दिसतात, त्या अशाच अशुद्ध रक्तवाहिन्या असतात. पण या रक्तवाहिन्यांना धक्का लागून जर कधी रक्त शरीराबाहेर आलं, तर मात्र ते आपल्याला लालबुंदच दिसतं. कारण शरीराबाहेर आल्याबरोबर रक्ताचा हवेतल्या ऑक्सिजनशी संपर्क येतो आणि लगेच 'ऑक्सी-हिमोग्लोबीन'ची लालबुंद जोडी तयार होते.

No comments:

Post a Comment