Wednesday, July 16, 2014

नवनीत कुतूहल - खतनिर्मितीत फॉस्फरस

नवनीत


कुतूहल - खतनिर्मितीत फॉस्फरस

Published: Wednesday, July 16, 2014
रासायनिक उद्योगांत अकार्बनी कच्च्या मालांमध्ये फॉस्फरसचा वापर होतो. फॉस्फरस हा क्रियाशील असल्यामुळे निसर्गामध्ये मूलद्रव्य रूपात आढळत नाही. भूकवचामध्ये १३ टक्के इतक्या प्रमाणात निरनिराळ्या संयुगांमध्ये हा अनेक ठिकाणी आढळून येतो व भूकवचातील विपुलतेच्या दृष्टीनं त्याचा अकरावा क्रमांक आहे. फॉस्फरसची महत्त्वाची अशी दोन बहुरूपं आहेत. एक पांढरा अथवा पिवळा फॉस्फरस व दुसरा तांबडा फॉस्फरस. निसर्गात फॉस्फरस हा अधातू खनिज फॉस्फेट (रॉक फॉस्फेट)च्या स्वरूपात आढळतो. खनिज फॉस्फेटमध्ये मुख्यत: ट्रायकॅल्शिअम डायफॉस्फेट असतं. काही लोहखनिजांमध्ये फॉस्फरस असतो.
वनस्पती आणि प्राणी जीवनामध्ये फॉस्फरसला फार महत्त्वाचं स्थान आहे. वनस्पतींना फॉस्फरस हे मूलद्रव्य खतांच्या माध्यमातून पुरविलं जातं, तर प्राण्यांना फॉस्फरस हे वनस्पतींपासून मिळतं. प्राण्यांच्या हाडांमध्येही डाय आणि ट्रायकॅल्शिअम फॉस्फेट असतं. खनिज फॉस्फेटपासून सुपरफॉस्फेट, अमोनिअम फॉस्फेट इत्यादी फॉस्फरसयुक्त खतं बनविली जातात. प्राण्यांच्या हाडांच्या भुकटीचाही फॉस्फरस खत म्हणून वापर होतो.
अंधारात पांढरा फॉस्फरस हवेत उघडा ठेवला तर तो हिरवट रंगानं चकाकतो व त्या वेळी त्याचं सावकाश ऑक्सिजनशी संयोग होऊन फॉस्फरस ट्रायऑक्साइड (P4O6) मिळतं. ह्य़ाच चकाकण्याला स्फुरण असं म्हणतात; परंतु हा जर हवेत तापविला, तर पांढऱ्या ज्योतीनं जळतो व फॉस्फरस पेंटॉक्साइडचा (P4O10) पांढरा ढग तयार होतो. संहत सल्फ्युरिक आम्ल किंवा संहत नायट्रिक आम्ल या ऑक्सिडीकारक आम्लांनी फॉस्फरसचं ऑक्सिडीकरण होऊन फॉस्फोरिक आम्ल मिळतं. फॉस्फरस क्षपणकारक आहे. तो नायट्रिक आम्लाचं क्षपण करतो व नायट्रोजन डायऑक्साइड मिळतं. तांबे, चांदी व सोने यांच्या क्षारांच्या द्रावणांत फॉस्फरस घातल्यास त्यांचं क्षपण होऊन ते ते धातू मिळतात. कॉस्टिक सोडय़ाच्या विद्रावात पांढऱ्या फॉस्फरसाचे तुकडे घालून ते तापविल्यास फॉस्फीन (PH3) वायू मिळतो. तांबडय़ा फॉस्फरसवर कॉस्टिक सोडय़ाची क्रिया होत नाही. पांढरा फॉस्फरस क्लोरिनमध्ये ताबडतोब पेटतो. तांबडा फॉस्फरस क्लोरिनमध्ये तापविल्याशिवाय पेट घेत नाही. गंधकाबरोबर याची क्रिया होते व सल्फाइडं मिळतात. निरनिराळ्या धातूंबरोबर हा तापविल्यास त्या त्या धातूंची फॉस्फाइडं मिळतात.
शुभदा वक्टे (मुंबई) , मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

No comments:

Post a Comment