Wednesday, July 2, 2014

नवनीत कुतूहल: जैवइंधनाचे फायदे आणि तोटे

नवनीत


कुतूहल: जैवइंधनाचे फायदे आणि तोटे

Published: Wednesday, July 2, 2014
कुतूहल
जैवइंधनाचे फायदे आणि तोटे
प्रकाश संश्लेषणाद्वारे वनस्पती शर्करामय कबरेदकांची निर्मिती करतात. जैव वस्तुमानाचा उपयोग जैवइंधन म्हणून करण्याची कल्पना खूपच छान आहे. पेट्रोल व डिझेल या खनिज इंधनाच्या अतोनात वापरामुळे जीववातावरणाची अपरिमित हानी होत आहे ती यामुळे टाळता येईल, कारण वनस्पती वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण कमी करतील. त्यामुळे निसर्गात उष्मा निर्माण होणेपण कमी होईल. शिवाय इंधनाचा हा स्रोत संपणारदेखील नाही. अगदी द्रौपदीच्या थाळीप्रमाणे अव्याहत ऊर्जेचा पुरवठा होईल, कारण मागणी वाढली तर आणखी खूप साऱ्या वनस्पती लावता येतील.
पण हे तितकेसे साधेसरळ नाही, कारण ही झाडे जगवायची म्हणजे बरेच खर्चाचे काम असते. त्यांच्यासाठी जमीन, खतपाणी इत्यादीची व्यवस्था करावी व इतर धान्याच्या शेतीप्रमाणे त्याची काळजी घ्यावी लागते. परंपरागत पद्धतीप्रमाणे जैववस्तुमानाचा लाकूड म्हणून जाळण्यासाठीपण उपयोग होतोच. त्यासाठी भरभर वाढणारी झाडे लावली जातात. त्यात पोप्लार, विल्लो, निलगिरी इत्यादींचा हवामानाप्रमाणे समावेश होतो, पण ही झाडे वातावरणात आयसोप्रीन सोडतात व या आयसोप्रीनचा वातावरणातील इतर प्रदूषकांबरोबर जेव्हा सूर्यप्रकाशात संबंध येतो तेव्हा ओझोन तयार होतो व तो आणखीनच हानिकारक असतो. जैवइंधन म्हणून वापरण्यात येणारे इथेनॉल अमेरिकेत मक्यापासून, तर ब्राझीलमध्ये उसापासून बनवितात. बायोडिझेल  बनविण्यासाठी जी मेदाम्ले वापरतात ती सहसा तेलबियांपासून मिळवतात. या खाद्योपयोगी धान्याचा उपयोग जर जैवइंधन बनविण्यासाठी वाढला तर माणसास अन्नधान्य कमी पडेल. वनस्पतींची एवढी काळजी घेऊन वाढ कशासाठी करायची? अन्नधान्यासाठी की इंधन म्हणून? बायोडिझेल तयार करण्यासाठी जर खाद्योपयोगी नसणाऱ्या तेलबियांचे उत्पादन वाढविले तर माणसाच्या खाद्यतेलात त्या तेलाची भेसळ होण्याचीसुद्धा शक्यता आहे.
हे सर्व जैवइंधनाचे पर्याय खनिज तेलाइतके स्वस्त आणि मस्त नाहीत. त्यावर बरेच संशोधन होणे आवश्यक आहे, पण गरज ही शोधांची जननी आहे. आता आपल्याला ठरवायचे आहे की आपण या जगातील खनिज तेलाचा साठा संपवून मजा करायची आणि आपल्या पुढच्या पिढीला अंधारात ढकलून द्यायचे, की जैवइंधनावर भरपूर संशोधन करून त्यांचे भविष्य उजळवायचे.
डॉ. जयश्री सनिस (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२
pradeepapte1687 @gmail.com
प्रबोधन पर्व
धर्म समाजस्थैर्यासाठीच आहे
''परधर्माच्या लोकांनी आमच्या धर्माच्या लोकांस आपल्या धर्मात घेतले म्हणजे आमच्या धर्मगुरूंची छाती दु:खाने फाटून जाते! लोकांनी धर्मातर करू नये म्हणून ते गीतेतील तत्त्वज्ञान दाखवतील, वेदांतील सुरस काव्य पुढे करतील, उपनिषदांतील गहन विषय सांगतील, पण धर्माच्या नावाखाली धर्माचाच घात करणाऱ्यांची कानउघाडणी त्यांच्या हातून होणार नाही. असे तर हे धर्ममरतड! असे तर हे धर्मगुरू! आणि असे तर हे शंकराचार्य! बसल्या बसल्या नाटकाप्रमाणे वेदांचे भाषांतर केल्याने धर्माची सुधारणा होणार नाही. गावोगाव पालखीत मिरविल्याने धर्माची ग्लानी जाणार नाही. गीतेवर कितीही लंबी प्रवचने झोडल्याने धर्म जागा होणार नाही. गणपतीचा महिनोगणती उत्सव केल्याने धर्मास जोम येणार नाही. जो धर्माचा विस्तार म्हणून मानण्यात येतो त्या बहुजन समाजास धर्माच्या खऱ्या मार्गावर लावल्यानेच धर्माचे रक्षण होणार आहे..धर्म हा समाजस्थैर्यासाठीच निर्माण झाला आहे. अर्थातच समाजाचा उत्कर्ष म्हणजे धर्म असा त्याचा अर्थ ठरतो आणि जोपर्यंत धर्माचा हा अर्थ मानला जतो, तोपर्यंत समाजाचा उत्कर्षच असतो. आज जे जे समाज अध:पतन पावले आहेत, त्या त्या समाजाच्या धर्माची प्रकृति बिघडली आहे यात शंका नाही!''
 'दीनमित्र'कार मुकुंदराव पाटील यांच्या 'दीनमित्र अग्रलेख' या संकलित पुस्तकात धर्माविषयी पुढे असेही प्रतिपादन आहे -
''देवधर्म आहे पण तो स्वर्गपाताळ, देवळे, मशिदी यात नसून माणसाच्या अंत:करणात आहे. प्रत्येक मनुष्य जन्मत:च ईश्वराजवळून हा बरोबर घेऊन येतो. या अंत:करण धर्मामुळेच आज भिन्न भिन्न धर्माच्या अनुयायांत प्रेम, सहानुभूती, निष्ठा इत्यादी गुण वसत आहेत. हा अंत:करणधर्म ज्याच्यात पुरेसा चांगला नाही, ते लोक धर्मवेडे होऊन अनेक अत्याचार करतात. आज धार्मिक दंगे याच हीन अंत:करणाच्या लोकांच्या हातून होत नाहीत.. लोकसंख्येची वाढ होणे यावर धर्माचा थोरपणा नाही. लोकांना अधिक शांतता आणि प्रेम लाभणे यावर धर्माची थोरवी अवलंबून आहे.''

No comments:

Post a Comment