Friday, July 11, 2014

नवनीत कुतूहल: 'फायब्रिन'चे जाळे! curiosity: Fibrin, non-globular protein

नवनीत


कुतूहल: 'फायब्रिन'चे जाळे!

Published: Friday, July 4, 2014
रक्ताच्या एका लहानशा थेंबात लक्षावधी पेशी असतात. कधी जखम झाली तर रक्त वाहून वाया जाऊ नये म्हणून रक्त गोठण्याची एक संरक्षण यंत्रणा आपल्या शरीरात निसर्गत:च असते. जखमेतून वाहणारे रक्त काही वेळातच जेलीसारखे घट्ट व्हायला लागते. सर्वप्रथम त्यात धागे तयार व्हायला लागतात. मग त्या धाग्यांचे जाळे तयार होते. त्यात रक्तातल्या पेशी आणि इतर घटक अडकायला लागतात. रक्ताची गुठळी तयार व्हायला लागते किंवा रक्त गोठायला लागते. त्या गुठळीमध्ये हळूहळू रक्तातले जीवद्रव्यही अडकते. रक्ताची गुठळी अधिकाधिक घट्ट होत जाते आणि रक्त वाहायचे थांबते. वरवरची जखम असेल तर ही प्रक्रिया १ ते ५ मिनिटांत पूर्ण होते. जखम खोल असली तर मात्र या प्रक्रियेला वेळ लागतो.
    रक्ताची गुठळी होण्यासाठी आधी जी धाग्यांची जाळी बांधली जाते, ती 'फायब्रिन' या रसायनामुळे! पण हे रसायन आपल्या रक्तात अगदी तयार स्वरूपात नसते, कारण तसे जर ते रक्तात असेल तर शरीरांतर्गत सतत रक्ताच्या गुठळ्या होतील आणि रक्त व्यवस्थित वाहूच शकणार नाही. रक्तामधील फायब्रिनोजेन आणि थ्रोम्बिन हे दोन पदार्थ एकत्र आले की फायब्रिन तयार होते. रक्तातल्या जीवद्रव्यात फायब्रिनोजेन असते, तसेच प्रोथ्रोम्बिन नावाचे एक रसायन असते. प्रोथ्रोम्बिनपासून थ्रोम्बिन तयार होते, पण तेही काही ठरावीक परिस्थितीतच!
    शरीराच्या ज्या भागाला जखम झाली असेल त्या ठिकाणच्या जखमी ऊती, रक्ताच्या गुठळी होण्याच्या प्रक्रियेला उद्युक्त करणारे 'थ्रोम्बोकीनेस' नावाचे रसायन रक्तात सोडतात. रक्तातल्या कॅल्शियमच्या उपस्थितीत 'थ्रोम्बोकीनेस' कार्यरत होते आणि प्रोथ्रोम्बिनपासून थ्रोम्बिन तयार करते. या ठरावीक परिस्थितीत तयार झालेल्या थ्रोम्बिनची फायब्रिनोजेनबरोबर रासायनिक अभिक्रिया होते आणि फायब्रिनचे धागे तयार व्हायला लागतात. अशा प्रकारे अनेक रासायनिक अभिक्रिया होत, जखमेच्या ठिकाणी रक्त गोठण्याची प्रक्रिया पार पडते.
पण मग आपल्याला जेव्हा डास चावतो तेव्हा त्याने आपल्या त्वचेला केलेल्या सूक्ष्म अशा जखमेच्या ठिकाणी रक्ताची गुठळी होऊन, डासाला आपले रक्त शोषण्यापासून आपोआपच प्रतिबंध का नाही होत?

No comments:

Post a Comment