Wednesday, October 14, 2015

स्वदेशी फॅशन साधेपणाचं प्रतीक असली तरी खादी हल्ली फॅशन जगतात आपला ठसा उमटवताना दिसतेय.

स्वदेशी फॅशन

साधेपणाचं प्रतीक असली तरी खादी हल्ली फॅशन जगतात आपला ठसा उमटवताना दिसतेय.

प्राची परांजपे | October 1, 2015 22:39 pm
vv04प्रजासत्ताक दिन किंवा स्वातंत्र्य दिन असो वा गांधी जयंती.. या दिवसांना हटकून पांढरे कुर्ते आणि खादी हमखास कपाटातून बाहेर येत, पण खादी आता फक्त तेवढय़ापुरतीच मर्यादित राहिलेली नाही. साधेपणाचं प्रतीक असली तरी खादी हल्ली फॅशन जगतात आपला ठसा उमटवताना दिसतेय. ही खादी खरं तर भारतीय हवामानाला साजेशी, तरीही खादी आपल्या नेहमीच्या फॅशनेबल वॉर्डरोबमधून अगदी हद्दपार झालेली दिसते. पण सध्या टिपिकल कुर्ता-पायजमा किंवा साडी याव्यतिरिक्त खादीवर वेगवेगळे यशस्वी प्रयोग भारतीय डिझायनर्स करीत आहेत. त्यात आघाडीचं नाव आहे प्रसिद्ध डिझायनर श्रुती संचेती यांचं. खादी नेहमीच्या वापरात कशी आणावी यासंबंधी डिझायनर श्रुती यांच्याशी ‘व्हिवा’ने संवाद साधला.
श्रुती संचेती सांगतात, खादी हा भारतीयांचा खरा वारसा आहे. पूर्वीच्या काळात ब्रिटिश सरकारनं भारतातून कच्चा माल त्यांच्या देशात नेऊन जास्त किमतीत तयार झालेले कपडे भारतात विकण्यास सुरुवात केल. त्यात खादीचे कपडेही होते. तेव्हा ही खादी फक्त बडय़ा मंडळींना परवडणारी होती आणि त्यामुळे खादी ही बडय़ा मंडळींची असेच मानले जात होते. त्यानंतर गांधीजींनी स्वदेशीचा नारा देत सूतकताई करीत देशी कपडय़ाला चालना दिली. तेव्हा खादी सामान्यांच्या आवाक्यात आली. देशाला स्वातंत्र्य मिळालं तसं ‘खादी’ वापरामागचा राष्ट्रवाद कमी झाला. खादीविषयी फॅशन वर्तुळांमध्ये अनेक गैरसमज होते. खादी हे जाड फॅब्रिक आहे आणि त्यामुळे त्यात जाडसर दिसायला होईल. रंग अतिशय सटल आहेत. तेच तेच आहेत. अशा गैरसमजांमुळे खादी वापरली जात नव्हती. पण नंतर अनेक डिझायनर्सनी पुढे येऊन खादी वापरायला सुरुवात केली. अलीकडेच गेल्या पाच-दहा वर्षांत खादीला खूप चांगले दिवस आले आहेत. अनेक सुप्रसिद्ध फॅशन इव्हेंट्समध्ये ‘टेक्स्टाइल डे’ च्या माध्यमातून खादीसाठी वेगळा दिवस, वेगळा सेक्शन राखून ठेवला जातो.. आणि आता डिझायनर्ससुद्धा वेस्टर्न डिझाइन्स किंवा वेस्टर्न कापडावर डोळे झाकून विश्वास ठेवत नाहीत.’
खादीचे प्रयोग
पूर्वी ज्या प्रमाणात आणि ज्या प्रकारे खादी वापरली जात होती त्याप्रमाणे ती आता वापरणे शक्य नाही. खादी आजच्या तरुणाईला आपलंसं करू शकते का, याविषयी बोलताना श्रुती म्हणाल्या,  ‘खादीला प्रेझेंट करताना आजच्या काळातली ग्लोबल लाइफ स्टाइल, लोकांच्या आवडीनिवडी हे लक्षात घेतले पाहिजे. आम्ही डिझायनर्स म्हणून खादीला अजून चांगली ट्रीटमेंट देऊन प्रेझेंट करतो. थ्रेड काउंट वाढवणे, रंगांमध्ये प्रयोग करणे, प्लेन खादीऐवजी वेगवेगळ्या प्रिंट्स किंवा वेगळ्या पद्धतीचे फॅब्रिक कट आणि ड्रेप करून आजच्या तरुणाईला आपलेसे करता येईल. आम्हीदेखील तेच करतोय.’ श्रुती यांच्या स्वदेशी या ब्रॅण्डच्या माध्यमातून खादीवर वेगवेगळे प्रयोग केले जातात. ‘माझ्या ‘स्वदेशी’ या कलेक्शनमध्ये मी काहीसं इंडो- ब्रिटिश कल्चरचं मिश्रण केलंय. पूर्वी ज्याप्रमाणे आपल्या डिझाइन्सवर ब्रिटिशांची छाप होती तसंच काहीसं मी माझ्या डिझाइन्समध्ये वापरलं आहे. कापड मात्र प्युअर खादीचं. चेक्स, कॉलर असलेले ब्लाऊझेस किंवा ज्याप्रमाणे पूर्वी इंग्लिश स्त्रिया लांब जॅकेट्ससारखे ब्लाऊजेस वापरायच्या त्या पद्धतीने मी माझे डिझाइन्स केले आहेत.  त्याचबरोबर सध्याच्या काळात अपील होणारी कंटेम्पररी कलर कॉम्बिनेशन्स वापरली आहेत. माझ्या कलेक्शनची छटा जरी वेस्टर्न असली तरी त्याचा आत्मा मात्र पूर्ण भारतीय आहे,’ त्या म्हणाल्या.
गुजरातच्या खादी- ग्रामोद्योग मंडळाने खादीच्या प्रसारासाठी आयोजित केलेल्या फॅशन शो मध्ये नामवंत डिझायनर रोहित बाल, अनामिका आणि प्रताप यांचं खादी कलेक्शन सादर करताना अभिनेत्री सोनम कपूर.
खादी वापरायची कशी?
स्वातंत्र्य चळवळीचा भाग म्हणून सुरुवात झालेली खादी आता एक फॅशन स्टेटमेंट म्हणून ओळखली जाऊ  लागली आहे. खादी सिल्क तर एलिट फॅशनमध्ये आघाडीवर आहेच. पण नेहमीची कॉटन खादीदेखील तरुणाईला आपलंसं करतेय.
खादी कशी वापरायची, याविषयी डिझायनर श्रुती संचेती यांनी काही टिप्स दिल्या. त्या म्हणाल्या, ‘खादीचा मेंटेनन्स करणं तितकंच महत्त्वाचं असतं. खादीचं कापड धुतल्यावर थोडं आक्रसतं. ते लवकर चुरगळतं. प्रत्येक वेळी स्टार्चची गरज नसते. पण हल्ली त्यासाठी त्यातल्या त्यात कमी चुरगळेल अशा पद्धतीने आम्ही खादीचं स्वरूप ठेवतो, पण तरीही नैसर्गिक फॅब्रिक असल्याने ते चुरगळतंच. पण तेच या फॅब्रिकचं सौंदर्य आहे, असं मी म्हणीन.’ स्त्रियांच्या साडय़ा आणि पुरुषांच्या कुर्ता-पायजम्यापर्यंत मर्यादित असलेली खादी पुरुषांनी वापरायचं फॅब्रिक राहिलेलं नाहीये. डिझायनर्स आपले इनपुट्स घालून  त्याला एक छान स्वरूप देऊन, ट्रेण्डी कलर्स वापरून, भरतकाम करून नाजूक डिझाइन्स वापरून स्त्रियांसाठीसुद्धा असंख्य कॉस्च्युम्स खादीतून बनवत आहेत.
vv06हल्ली खादीमध्ये वेगवेगळे प्रयोग होत आहेत. गदी लग्नकार्यासाठी आणि फेस्टिव्ह सीझनसाठीदेखील खादीचे कपडे बनवले जात आहेत. लग्नासाठी खादी घागरा, खादी गाऊन्स, सलवार कमीज, अनारकली तसंच स्मार्ट आउटिंगसाठी खादीचे शॉर्ट ड्रेसेस, शॉर्ट्स अशा प्रकारचे पाश्चिमात्य ढंगाचे कपडेदेखील बनवले जात आहेत. जॅकेट्स, दुपट्टा, स्टोल अशा फॉर्म्समध्ये खादी वापरायला तरुणाईची पसंती आहे.

खादीला प्रेझेंट करताना आजच्या  काळातली ग्लोबल लाइफस्टाइल, लोकांच्या आवडीनिवडी हे लक्षात घेतले पाहिजे. आम्ही डिझायनर्स म्हणून खादीला अजून चांगली ट्रीटमेंट देऊन प्रेझेंट करीत आहोत. – श्रुती संचेती

प्राची परांजपे – viva.loksatta@gmail.com 
First Published on October 2, 2015 1:13 am
Web Title: indian fashion khadi

No comments:

Post a Comment