Friday, October 16, 2015

कृषी तंत्र वस्त्रे – १ कृषी क्षेत्रामध्ये विशेष करून जी वस्त्रे बनविली जातात त्यांना कृषी तंत्र वस्त्रे असे म्हणतात.

कृषी तंत्र वस्त्रे  – १

कृषी क्षेत्रामध्ये विशेष करून जी वस्त्रे बनविली जातात त्यांना कृषी तंत्र वस्त्रे असे म्हणतात.

मुंबई | October 15, 2015 00:29 am

तांत्रिक वस्त्रांमध्ये कृषी तंत्र वस्त्रे हे एक महत्त्वाचे क्षेत्र आहे.

कृषी क्षेत्रामध्ये उपयोगात आणण्यासाठी विशेष करून जी वस्त्रे बनविली जातात त्यांना कृषी तंत्र वस्त्रे असे म्हणतात. तांत्रिक वस्त्रांमध्ये कृषी तंत्र वस्त्रे हे एक महत्त्वाचे क्षेत्र आहे. तांत्रिक वस्त्रांच्या एकूण उत्पादनापकी कृषी तंत्र वस्त्रांचा वाटा जरी कमी असला तरी या वस्त्रांनी कृषी क्षेत्रामध्ये एक मोठी क्रांतीच केली आहे. जगाच्या सातत्याने वाढत्या लोकसंख्येमुळे कृषी क्षेत्रातील उत्पादन व दर्जा वाढवणे गरजेचे बनले आहे. पण हे काम पारंपरिक पद्धतीच्या शेतीमध्ये शक्य होणार नाही. यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करणे गरजेचे आहे. या नवीन तंत्रज्ञानामध्ये कृषी तंत्र वस्त्रे अतिशय महत्त्वाची भूमिका पार पडत आहेत. कृषी तंत्र वस्त्रांचा उपयोग धान्य शेती, फुलशेती व फळशेती आणि पशुपालन या तिन्ही क्षेत्रांत केला जातो. कृषी तंत्र वस्त्रांच्या वापरामुळे शेतीमध्ये उत्पादन वाढविणे, उत्पादनाचा दर्जा वाढविणे आणि उत्पादनखर्च कमी करणे हे शक्य झाले आहे.
कृषी क्षेत्रामध्ये वस्त्रांचा उपयोग प्रामुख्याने पिकांसाठी नियंत्रित वातावरण तयार करण्यासाठी, तसेच पिकांचे जंतू, किडे किंवा पक्षी यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी केला जातो. कृषी तंत्र वस्त्रे ही उघडय़ावर, ऊन-पावसात तसेच जमिनीलगत वापरली जात असल्यामुळे ती तयार करण्यासाठी लागणाऱ्या तंतूमध्ये काही विशिष्ट गुणधर्म असावे लागतात. या वस्त्रांसाठी नसíगक तंतूंपेक्षा संश्लेषित तंतूंचा प्राधान्याने वापर केला जातो. कमी किंमत, वाहतुकीमधील सहजता, साठविण्यासाठी लागणारी कमी जागा, दीर्घकाळ टिकाऊपणा, विविध प्रकारच्या वातावरणामध्ये टिकण्याची उत्तम क्षमता आणि जंतुरोधकता अशा गुणधर्मामुळे संश्लेषित तंतूंची निवड प्राधान्याने केली जाते.
आपण जी हरितगृहे (ग्रीन हाऊस) पाहतो तिथे या वस्त्रांचा वापर केला जातो. या हरितगृहामध्ये त्या त्या मोसमात उघडय़ावर उत्पादन करता न येणाऱ्या भाज्यांचे उत्पादन केले जाते. अर्थात हरितगृहात तापमान आणि आद्र्रता आवश्यकतेनुसार ठेवून हे उत्पादन घेतले गेल्यामुळे ऊर्जा आणि पाणी यांचा जास्तीचा खर्च होतो. त्या अनुषंगाने त्या मोसमात उघडय़ावर पिकवता न येणारी भाजी बाजारात जास्त दराने उपलब्ध असते. त्याचे कारण वरीलप्रमाणे आहे हे आपल्याला पटेल.
– चं. द. काणे  (इचलकरंजी)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२
office@mavipamumbai.org

No comments:

Post a Comment