Friday, October 16, 2015

मज्जासंस्थेवर परिणाम शरीरातल्या ज्या काही पेशींमध्ये ग्लुकोज जाण्यासाठी इन्शुलीन आवश्यक नसतं त्यापकी मज्जातंतू एक आहे.

मज्जासंस्थेवर परिणाम

शरीरातल्या ज्या काही पेशींमध्ये ग्लुकोज जाण्यासाठी इन्शुलीन आवश्यक नसतं त्यापकी मज्जातंतू एक आहे.

September 26, 2015 07:45 am
मधुमेहात मज्जातंतू खराब होतात याचे कारण काय? हे बदल कुठे दिसतात?
शरीरातल्या ज्या काही पेशींमध्ये ग्लुकोज जाण्यासाठी इन्शुलीन आवश्यक नसतं त्यापकी मज्जातंतू एक आहे. इन्शुलीनची आवश्यकता नसल्यानं जेवढी ग्लुकोज रक्तात आहे तितकीच ग्लुकोज मज्जातंतूमध्ये उतरते. या अधिक ग्लुकोजचं रूपांतर अल्कोहोलशी साधम्र्य असलेल्या रसायनांमध्ये होतं आणि ती रसायनं मज्जातंतूचं नुकसान करतात. मज्जातंतू स्निग्ध पदार्थाचे बनलेले असतात आणि स्निग्ध पदार्थ अल्कोहोलमध्ये विरघळतात हे त्यामागचं कारण. तसे कुठलेही मज्जारज्जू खराब होऊ शकतात, परंतु साधारणत लांबीनं जास्त असलेल्या पायाच्या मज्जारज्जूचं सर्वात आधी नुकसान होतं.
सर्व मधुमेही रुग्णांमध्ये असं होऊ शकतं का?
साधारणत दहा ते वीस टक्के मधुमेहींमध्ये मज्जारज्जूचे प्रश्न निर्माण होतात. उंची जास्त असणं, मधुमेह बराच काळ अनियंत्रित असणं, मधुमेहासोबत दारू पिण्याची सवय असणं, वजन खूप कमी असणं, धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये ही शक्यता जास्त असते एवढे नक्की. स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये याचं प्रमाण अधिक असतं. त्याचं नेमकं उत्तर मात्र अजून कोणालाही माहीत नाही.
फक्त पायाच्या मज्जारज्जूंनाच त्रास होतो की आणखी काही ठिकाणी प्रश्न निर्माण होतो?
फक्त पायांना नाही इतर अनेक ठिकाणीही याचा उपद्रव होऊ शकतो. अर्थात सर्व रुग्णांमध्ये एकसारखा त्रास नसतो. किंवा सगळ्यांमध्ये सर्वच मज्जातंतू खराब होतात असंही नाही. काही लोकांमध्ये पाय जळजळतात, काहींमध्ये विशिष्ट ठिकाणी अतोनात कळा येतात. ( याला अ‍ॅलोडायनिआ म्हणतात )या कळा एवढय़ा जबरदस्त असतात की साध्या अंगावरच्या कपडय़ांचा स्पर्शदेखील माणूस सहन करू शकत नाही. बहुधा या कळा मांडीच्या वरच्या भागात असतात. तळव्याखाली काहीतरी गादी ठेवल्यासारखं वाटतं. शिवाय हातापायाला मुंग्या येणं वगरे चालूच असतं. ही झाली स्पर्शज्ञान वाहून नेणाऱ्या मज्जारज्जूंना इजा झाल्यावर दिसणारी लक्षणं. यांची परिणती शेवटी संवेदना पूर्णत संपण्यात होते. याला इनसेन्सेट फूट असं म्हणतात. अशा पायांना इजा झालेली कळून येत नाही. इजा होऊन त्यात इन्फेक्शन झाल्यावर समजते. तोपर्यंत इतका उशीर झालेला असतो की पाय कापावा लागतो.
स्नायूंना मेंदूकडून आलेले संदेश पुरवणाऱ्या मज्जारज्जूंना इजा झाल्यास ते स्नायू कमकुवत होतात. प्रसंगी डोळ्यांना तिरळेपणा येतो. हाताच्या स्नायूंना लकवा होऊ शकतो. आतडय़ांचे मज्जारज्जू कमकुवत झाल्यास पोटफुगी होऊ शकते. परंतु सगळ्यात जास्त भीती असते ती हृदयाची.
हृदयाला काय होतं?
शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे मज्जारज्जू असतात. जसं संवेदना वाहून नेणाऱ्या आणि स्नायूंची हालचाल घडवून आणणाऱ्या मज्जारज्जूचं जाळं शरीरभर पसरलेलं असतं तसंच शरीरातल्या इंद्रियांच्या कारभारावर आवश्यकतेनुसार नियंत्रण ठेवणारे मज्जारज्जू असतात. मज्जासंस्थेच्या या भागाला स्वयंचलित मज्जासंस्था म्हणतात. असेच मज्जारज्जू हृदयालाही असतात. मधुमेहात ते खराब होऊ शकतात. अशा व्यक्तींना कुठलीही वेदना न होता हृदयविकार होण्याची शक्यता असते. हे धोकादायक आहे कारण माणसं छातीत दुखायला लागलं की सावध होतात. डॉक्टरांकडे धाव घेतात. छातीतच दुखलं नाही तर काही कळायच्या आत जीव जायचा.
मग हे समजायचं कसं?
आपला रक्तदाब अथवा नाडीचे ठोके शरीराच्या गरजेप्रमाणं कमी-जास्त करणारे मज्जारज्जू देखील याच जातकुळीतले असतात. हृदयावर मधुमेहाचा परिणाम होत असताना तो त्यांच्यावरही होतोच की. अशा माणसांची गरजेनुसार नाडी कमी-अधिक होत नाही आणि उभं राहिल्यावर त्यांचा रक्तदाब नॉर्मल लोकांसारखा स्थिर राहत नाही. अचानक उभं राहिलं की त्यांचा रक्तदाब कमी होतो व त्यांना घेरी येते. काही जणांना जेवल्यावर कमरेच्या वरच्या भागात दरदरून घाम येतो. ज्यांना कित्येक र्वष मधुमेह आहे त्यांना ही लक्षणं दिसायला लागली म्हणजे त्यांनी डॉक्टरना भेटावं हे उत्तम. मधुमेहात ज्यांना लैंगिक समस्या निर्माण होतात त्यांना न्युरोपथी असण्याची शक्यता असते. एकदा न्युरोपथी सुरू झाली की होणारा त्रास कमी करणं इतकंच आपल्या हातात उरतं. मज्जारज्जूचं पुनरुज्जीवन शक्य नसतं. अर्थात मधुमेह काबूत राखण्यानं थोडा तरी फायदा होतोच.
First Published on September 26, 2015 7:45 am
Web Title: impact on the nervous system

No comments:

Post a Comment