Thursday, October 22, 2015

प्रत्यक्ष मुलाखत मुलाखत कक्षात प्रवेश केल्यानंतरच्या सुरुवातीच्या दोन-चार मिनिटांतील तुमच्या हालचालींवरून, हावभावातून, तुमच्या देहबोलीतून मुलाखत मंडळाला

प्रत्यक्ष मुलाखत

मुलाखत कक्षात प्रवेश केल्यानंतरच्या सुरुवातीच्या दोन-चार मिनिटांतील तुमच्या हालचालींवरून, हावभावातून, तुमच्या देहबोलीतून मुलाखत मंडळाला

फारूक नाईकवाडे | October 18, 2015 13:11 pm

मुलाखत कक्षात प्रवेश केल्यानंतरच्या सुरुवातीच्या दोन-चार मिनिटांतील तुमच्या हालचालींवरून, हावभावातून, तुमच्या देहबोलीतून मुलाखत मंडळाला तुमच्या मन:स्थितीविषयीचा पूर्ण अंदाज आलेला असतो. तुम्ही तणावात आहात, तुमच्यात आत्मविश्वास आहे, तुम्ही शांत आहात की घाबरलेल्या- गोंधळलेल्या मन:स्थितीत आहात याचा संदेश तुमच्या देहबोलीद्वारे समोरच्या मंडळींपर्यंत पोहोचत असतो.
केंद्र आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांतील मुलाखतींना सामोरे गेलेल्या आमच्या अनेक विद्यार्थ्यांचा अनुभव असा आहे की, उमेदवार घाबरलेला किंवा तणावात दिसला की मुलाखत मंडळ उमेदवाराला सहकार्य करते. ‘तुम्ही शांतपणे आणि आरामात बसा. घाबरू नका. चहा, कॉफी, किंवा थंड पाणी घ्याल का?’ असे उमेदवाराला विचारले जाते. सुरुवातीपासूनच त्याच्यावर प्रश्नांचा भडिमार न करता, उमेदवाराला रिलॅक्स करण्यासाठी नाव, गाव, शैक्षणिक पात्रता अशा वैयक्तिक माहितीवर आधारित साध्या, सोप्या प्रश्नांपासून मुलाखतीला सुरुवात होते. मुलाखत मंडळाकडून चहा किंवा पाण्याची ऑफर झालीच तर सकारात्मकपणे स्वीकारावी. अशा वेळी पाणी हळूहळू घोट- घोट प्यावे.  घाईघाईत घटाघट संपवण्याचा प्रयत्न करू नये. मात्र मंडळासमोर बसून चहा/कॉफी घेताना अवघडलेपणा येईल असे वाटत असेल तर नम्रपणे ऑफर नाकारली तरीही हरकत नाही. कधी कधी मुलाखतीची १०-१५ मिनिटे झाल्यानंतर उमेदवाराला तहान लागू शकते. अशा वेळी सरळ समोरचा ग्लास उचलून पाणी प्यायला सुरुवात करू नये. मुलाखत मंडळाची ‘सर, मी पाणी पिऊ शकतो का / शकते का?’ अशा शब्दांत परवानगी घ्यावी. परवानगी मिळाल्यावर त्यांना धन्यवाद देऊन पाणी घ्यावे.
मुलाखत मंडळाकडून विचारले जाणारे प्रश्न लक्षपूर्वक ऐकावेत. प्रश्न विचारणाऱ्या सदस्याकडे पाहून उत्तर द्यावे. एखादा प्रश्न विचारला जात असताना पूर्णपणे ऐकून न घेता, मध्येच बोलू नये. पूर्ण प्रश्न ऐकल्यानंतरच उत्तराला सुरुवात करावी. सहमतीदर्शक प्रश्न विचारला गेल्यास, ‘होय सर! मी या मताशी सहमत आहे’ किंवा असहमती दर्शविताना नम्रपणे आपली असहमती नोंदवावी. लक्षात ठेवा, मुलाखतीतील प्रश्नांची उत्तरे चूक किंवा बरोबर अशी नसतात. तेव्हा प्रामाणिकपणे व पारदर्शीपणे उत्तर द्यावे. तुमची उत्तरे व्यवहार्य व तुमची स्वत:ची असावीत. त्यातून फाजील आत्मविश्वास दिसता कामा नये. उत्तरात धीटपणा असावा, पण अहंभाव किंवा अविचार असू नये.
विचारलेला प्रश्न नीट कळला नसेल तर नम्रपणे तसे सांगून अधिक तपशील विचारावा. असे केल्याने तुमचे मार्क्‍स कमी होत नाहीत, उलट तुमचा प्रामाणिकपणा दिसून येतो. कधी कधी विचारलेल्या प्रश्नाचे नेमके उत्तर उमेदवाराला ठाऊक नसते. अशा वेळी प्रश्नार्थक चेहऱ्याने हात हातावर चोळणे, वर पाहणे, डोके खाजवणे अशा कोणत्याही नकारात्मक भावमुद्रेचे प्रदर्शन करू नये. माहीत नसलेल्या उत्तराविषयी नम्रतापूर्वक  मला याबाबत फारशी माहिती नाही, असे सांगावे.
आपण अनभिज्ञ असलेल्या विषयावर तर्क बांधून, ओढूनताणून उत्तर देण्याचा प्रयत्न अजिबात करू नये. त्याऐवजी ‘मला याविषयी माहीत नाही,’ हे प्रांजळपणे कबूल केलेले उत्तम. कोणताही उमेदवार सर्वज्ञ नसतो, हे मुलाखत मंडळाला ठाऊक असते. त्यामुळे पारदर्शी असण्यातून उमेदवाराचा स्पष्टपणा व लवचीकता दिसून येते.
मुलाखत जशी ज्ञानाची परीक्षा आहे तशी तुमच्या व्यक्तिमत्त्वाचीही परीक्षा आहे. चांगल्या उत्तराची स्तुती किंवा उत्तर न देता येणारी स्थिती तुम्ही कशी हाताळता, कशा पद्धतीने सामोरे जाता, ही तुमच्या व्यक्तिमत्त्वाची परीक्षा आहे. मुलाखत मंडळाकडून तुमच्या दृष्टीने चांगल्या असलेल्या उत्तराबाबत प्रतिक्रियेची अपेक्षा करू नका. तुमच्या चांगल्या-वाईट कुठल्याही उत्तराबाबतची तुमची मन:स्थिती तुमच्या देहबोलीतून सामोरी येऊ देऊ नका.
मुलाखतीदरम्यान आपल्या कामगिरीबाबत विचार करायला सुरुवात करू नये.  मुलाखत सुरू असतानाच, तुमच्या दृष्टीने चांगली कामगिरी झाली असेल तर चांगले गुण मिळणार किंवा तुमच्या दृष्टीने वाईट कामगिरी झाली असेल तर कमी गुण मिळणार अशा विचारांमध्ये गुरफटून गेल्यास अशा विचारांचा आपल्याही नकळत आपल्या देहबोलीवर परिणाम होत असतो.
केंद्रीय लोकसेवा आयोगाची मुलाखत सर्वसाधारणपणे २५ ते ३५ मिनिटे तर राज्य लोकसेवा आयोगाची मुलाखत २० ते ३० मिनिटे चालते. उमेदवाराच्या कामगिरीनुसार हा वेळ वाढतो किंवा कमीसुद्धा होऊ शकतो. अशा वेळी संयम ठेवावा. मनगटावरील घडय़ाळात वेळ पाहण्यासारखा आततायीपणा तर अजिबात करू नये.
मुलाखत पूर्ण झाल्यानंतर उमेदवार कक्षाबाहेर येण्याची वेळ येते. पण अशा वेळी मुलाखत मंडळाने उमेदवाराला ‘मुलाखत संपली, तुम्ही आता बाहेर जाऊ शकता,’ असे सांगितल्याशिवाय उमेदवाराने आपल्या आसनावरून उठू नये किंवा समोर ठेवलेली कागदपत्रांची फाइल आवरायला घेऊ नये. मुलाखत मंडळाकडून सांगितल्यानंतर शांतपणे, कागदपत्रांचा जास्त आवाज न होऊ देता फाइल घ्यावी व सहजतेने आसन सोडावे. खुर्चीवरून उठल्यानंतर खुर्ची पूर्ववत ठेवावी. व्यवस्थित उभे राहून मुलाखत मंडळाचे अध्यक्ष व सदस्यांना प्रसन्नतापूर्वक अभिवादन करावे. धन्यवाद / थँक यू म्हणायला विसरू नये. मुलाखत कक्षातून बाहेर येताना चालण्याचा, दरवाजा उघडण्याचा आवाज येणार नाही याची काळजी घ्यावी. बाहेर पडताना मागे वळून सदस्यांकडे पाहणे टाळावे. असे बारीकसारीक वर्तणुकीचे संकेत पाळले की मुलाखतीचा अनुभव चांगलाच ठरतो.
First Published on October 19, 2015 1:07 am
Web Title: mpsc interview

No comments:

Post a Comment