Friday, June 27, 2014

नवनीत कुतूहल - फळे पिकविणारी रसायने

नवनीत


कुतूहल - फळे पिकविणारी रसायने

Published: Tuesday, June 24, 2014
झाडावरचे फळ पक्व होते तेव्हा त्यातील काबरेहायड्रेट अन्नाचे शर्करेत रूपांतर होते व आपल्याला गोड-मधुर फळे चाखायला मिळतात. काही फळे ही विशिष्ट हंगामातच मिळतात. पक्व झालेल्या फळात इथिलिन नावाचे रासायनिक द्रव्य तयार होते व ते फळ पिकविण्यास हातभार लावते. एखादे पक्व  झालेले फळ तयार फळांच्या सान्निध्यात ठेवले की इतर फळे तुलनेत लवकर पिकतात. कारण पक्व फळातील इथिलिन वायू त्यांच्या पिकण्याच्या प्रक्रियेस हातभार लावतो. कित्येकदा एखाद्या फळाच्या हंगामाच्या आधी आपणास ती फळे बाजारात दिसू लागतात. ती दिसायला आकर्षक असतात, पण चव योग्य नसते. कारण ती कृत्रिमरित्या पिकविलेली असतात. निसर्गत: पिकलेली फळे फारशी टिकत नाहीत, पण कृत्रिमरित्या पिकविलेली फळे बराच काळ टिकतात. त्यांचे रंग आकर्षक असतात. ती टवतवीत वाटतात. ही सारी त्यांच्यावर प्रयोग केलेल्या रसायनांची किमया असते. फळे पेटीत ठेवून त्यांच्यावर इथिलिन वायूचा फवारा दिला की ती जलद पिकतात. काही वेळा असिटिलीनचा वापर करतात. केळी, आंबे ही फळे खोलीत बंद करून या रासायनिक वायूचा मारा केला की, ती अपरिपक्व फळे पिकल्यासारखी होतात. त्यांचा रंग पिवळाधमक किंवा लालभडक होतो. ती दिसायला आकर्षक होतात. त्यामुळे, गिऱ्हाईकांच्या तोंडाला पाणी सुटते खरे, पण चवीच्या बाबतीत ती निराश करतात. कारण ती चवीला गोड नसतात. फळे पिकविण्यासाठी कॅल्शिअम कार्बाइड या रसायनाचा देखील वापर होतो. ते फळावर लावले असताना हवेतील बाष्प शोषते व रासायनिक क्रिया होऊन असिटिलीन वायू मुक्त होतो. हा वायू फळांना पिकवतो. फळे व भाज्यांना रंग देण्यासाठी सुदानरेड, मेथॅनॉल, यलो लेड क्रोमेट या रंगीत रसायनांचा सर्रास वापर होतो. फळांना त्यांची इंजेक्शने टोचली जातात. ही इंजेक्शने फळे आणि भाज्या आकर्षक दिसल्या तरी पक्व नसतात. त्यात नसíगकरित्या शर्करा तयार झालेली नसते.
जोसेफ तुस्कानो (वसई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

No comments:

Post a Comment