‘प्रयोग’ शाळा : अक्षरचांदणे
आरती यांनी कामाची सुरुवात केली, जि.प. प्राथमिक शाळा सांजेगाव इथून. आरती यांचा पिंड मूळचाच बंडखोर,
जि.प.प्राथमिक शाळा वैतरणा नगर इथे भौगोलिक दृष्टय़ा पाऊस जास्त पडतो पण वर्गाच्या अवकाशात चमकतात, अक्षरचांदण्या आणि जमलेले असतात, अक्षरांचे ढग. या अक्षरआकाशाच्या शिल्पकार आहेत, त्यांच्या मेहनती शिक्षिका आरती बोराडे.
आरती यांनी कामाची सुरुवात केली, जि.प. प्राथमिक शाळा सांजेगाव इथून. आरती यांचा पिंड मूळचाच बंडखोर, काहीतरी वेगळे करून दाखवण्याचा. ही शाळा मोठी होती. पहिली ते सातवीपर्यंत असलेल्या या शाळेत विद्यार्थी अभ्यासाव्यतिरीक्त काही करताना मात्र दिसत नव्हते. स्वत: खेळाडू असलेल्या आरतीनी पहिले काम केले ते म्हणजे, मुलींना खेळाच्या मैदानावर आणण्याचे. मुलींना खेळाची गोडी लावून आरतीने त्यांच्यासाठी कबड्डी, खोखोचे संघ तयार केले. सुरुवातीला मैदानावर न फिरकणाऱ्या मुली अगदी जिल्हा पातळीवर जाऊनही बक्षीसे मिळवू लागल्या. याच खेळांच्या सरावादरम्यान आरती आणि मुली यांच्यात छान मैत्रीपूर्ण नाते तयार झाले. त्यातूनच मग पौगंडावस्थेत होणारे शारीरिक, मानसिक बदल, त्यासाठी घ्यावयाची काळजी, शारीरिक स्वच्छता अशा अनेक गोष्टींवर आरती त्यांच्याशी संवाद साधू लागल्या. त्याचीच परिणती पुढे दर शनिवारी शाळेत होणाऱ्या योगासनांच्या, कलाकार्यशाळेच्या वर्गामध्ये झाली. या सगळ्यातून आपल्याच कोशात असलेल्या अनेकजणी बोलत्या झाल्या. याचबरोबर आरतीच्या पुढाकाराने धूळ खात पडलेली वाचनालयाची इमारतही पुन्हा जागती झाली. हा सगळा बदल घडवला तो आरतींच्या विद्यार्थ्यांनीच. वाचनालय सुरु करण्यासाठी पत्रव्यवहार, पाठपुरावा, तेथील नियोजन सारे काही विद्यार्थीच पाहत असत. सलग ७ वर्षे आरतीने तिथे वाचनसमृद्धी प्रकल्प चालवला. यातून अनेक विद्यार्थी स्वत: कविता, लेख लिहू लागले. असे सगळे सुरु असतानाच आरतीची बदली झाली आणि त्या आल्या, वैतरणा नगर इथल्या शाळेत.
आरती सांगतात, ”शाळेची इमारत अगदी स्वातंत्र्यपूर्व काळातली. पण अत्यंत जीर्णशीर्ण. भिंती, छपरं कधीही पडतील असे. पटसंख्याही कमी. एका मोठय़ा शाळेतून आलेल्या मला हा धक्काच होता. पण तेव्हाच मनात कुठेतरी नोंद केली होती, असे सगळे असले तरी आपल्याला लढायचे आहे. रडायचे नाही.”
नाशिकपासून साधारण ४०-४५ किमीवर वैतरणा नगरची ही शाळा आहे. इथले विद्यार्थी सरमिसळ आहेत. कुणी ठाकर, आदिवासी तर कुणी तिथल्याच ठिकाणच्या कर्मचाऱ्यांची मुले काहीजण हिंदी भाषिक. सध्याची एकूण पटसंख्या ३६. शाळेची इमारत धोकादायक झाल्याने सुरुवातीला शाळेला जागाच नव्हती. मग आरतीनी स्वत: पुढाकार घेऊन पत्रव्यवहार करून ग्रामपंचायतीच्या व्यायामशाळेच्या २ खोल्या शाळेसाठी उपलब्ध करून घेतल्या.
जागेचा प्रश्न तर सुटला आता लक्ष्य होते, अभ्यासाकडे. जवळपास बहुसंख्य विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा श्रीगणेशा पहिलीत आल्यावरच झालेला! आधीची पाटी कोरी. त्यावर काही लिहायचे तर सर्वप्रथम भाषा विकसन व्हायला हवे. त्यासाठी शब्द डोळ्यासमोर हवेत. वृत्तपत्रांतून अनेक शब्द मुलांच्या भेटीला येत असतात मग या वृत्तपत्रांनीच वर्ग सजवला तर? असा विचार आरतींच्या मनात आला आणि त्यांनी मदतनीस ताईंच्या मदतीने संपूर्ण वर्गाला वर्तमानपत्रांचे कागद चिकटवले. मोठ्ठी रंगीत चित्र असलेले, ठसठशीत शब्द असलेली पाने निवडून आरतीने ती चिकटवली होती. दुसऱ्या दिवशी मुले वर्गात आल्यावर त्यांना वर्गाचे बदललेले स्वरुप पाहून गंमतच वाटली शिवाय वृत्तपत्रांतून अनेक नवे शब्दही भेटले. मग फावल्या वेळात नवे शब्द शोधणे, बाईंना विचारणे, ते वापरून पाहणे असे खेळ सुरु झाले. या खेळांतून शिक्षणही झाले आणि वर्तमानपत्रांची सोबतही. दर २-३ महिन्यांनी आरती नवे वर्तमानपत्र चिकटवत असत.
भाषेच्या अभ्यासासाठी आणखी एक सुंदर उपक्रम आरतीनी राबवला तो म्हणजे अक्षरचांदणे. आईस्क्रीमच्या काडय़ांपासून आरतीने चांदण्या बनवल्या. त्या रंगवल्या. आणि वर्गात दोऱ्या बांधून त्यावर टांगल्या. याचबरोबर कार्डबोर्डपासून अक्षरेही तयार केली. वर्गात एखादे अक्षर शिकवल्यानंतर ते अक्षर या चांदणीत जाऊन बसे. त्यामुळे उठता बसता ते विद्यार्थ्यांना दिसत राही. अक्षरओळख पक्की करत राही. यानंतर पुढे जात आरतीने शब्दांचे ढगही बनवले. शब्दांची वाक्ये तयार करून त्यांचा ढग बनत असे. यानंतर आरतीनी विद्यार्थ्यांंचे भाषेचे गट केले. या गटांमध्ये दररोज नवीन चिठ्ठी येत असे. या चिठ्ठीत अनेक छोटे छोटे विषय असत, ते घेऊन विद्यार्थी नाटुकली बसवत, कविता करत असत. यातून विद्यार्थ्यांची संवादकौशल्ये आणि भाषाकौशल्ये विकसीत झाली. आरतीचे विद्यार्थी आता मुलाखतसुद्धा छान घेतात. कुणाला प्रश्न विचारायला घाबरत नाहीत. आणि त्यांची इयत्ता ऐकली तर आश्चर्यच वाटेल. हे विद्यार्थी आहेत, पहिली-दुसरीचे.
विद्यार्थ्यांची मराठी सुधारण्याआधी आरतीनी काय केले असेल तर आदिवासी, हिंदी बोलीतले त्यांचे शब्द स्वीकारले मगच त्यांच्यावर मराठीचे संस्कार केले. यातलाच एक उपक्रम म्हणजे पुस्तक झुला. चित्ररुप गोष्टींची पुस्तके दररोज शाळेत वाचली जायची. आणि आठवडाभर ती वर्गातच दोरीच्या झुल्यावर लटकत असायची. ज्याला जेव्हा वेळ असेल त्याने तेव्हा ती वाचायची.
मराठी भाषेसोबतच गणित आणि इंग्रजीच्या अभ्यासासाठीही आरतीचे कल्पक प्रयोग सुरु असतात. इंग्रजीसाठी त्यांनी फोनिक्स पद्धत वापरली आहे. इंग्रजीला वर्गात बंदिस्त न ठेवता ती वर्गाबाहेर नेण्यासाठी आरती प्रयत्नशील असतात. कारण आरती म्हणतात, इंग्रजी ही वापरण्याची भाषा आहे. ती बोलत राहिलो तरच सुधारेल म्हणून आमचे तास वर्गाच्या बाहेर भरतात आणि विद्यार्थी शिकताना सतत बोलत असतात. मात्र इंग्रजीमधून. यातून त्यांची इंग्रजीची भीतीही गेली आहे. शिवाय संभाषणकौशल्यही वाढले आहे.
विद्यार्थ्यांबरोबर आरती हे सगळे उपक्रम घेतातच पण पालकांशीही सुसंवाद साधून असतात. त्यांना चांगल्या योजनांची माहिती देणे, महिलांसाठी आरोग्याविषयक उपक्रम राबवणे, अशी शासकीय सेवेपलिकडची अनेक कामे उत्साहाने करतात.
यासोबतच आरती भाषा फाऊंडेशनसाठी अभ्यासतज्ज्ञ म्हणून काम करतात, ऑलिम्पियाड प्रश्नसंच निर्मितीमध्ये सहभाग घेतात, महाराष्ट्र महिला आरोग्य हक्क परिषदेत कार्यरत आहेत आणि ललितलेखन, कविता लेखन अशा अनेक माध्यमांतून स्वत:ला घडवतही आहेत.
swati.pandit@expressindia.com
First Published on October 10, 2018 3:26 am
Web Title: article about teacher arati borade work
No comments:
Post a Comment