Monday, December 31, 2018

‘प्रयोग’ शाळा : वाचा आणिक लिहा, शिका! अनिता जावळे गेली १५ र्वष जि.प.शाळेमध्ये काम करतात. मार्च २००२पासून शिक्षणसेवक म्हणून त्यांनी कामाची सुरुवात केली.

‘प्रयोग’ शाळा : वाचा आणिक लिहा, शिका!

अनिता जावळे गेली १५ र्वष जि.प.शाळेमध्ये काम करतात. मार्च २००२पासून शिक्षणसेवक म्हणून त्यांनी कामाची सुरुवात केली.


स्वाती केतकर- पंडित
विद्यार्थ्यांना भाषेचे शिक्षण द्यायचे म्हणजे केवळ धडे शिकवायचे नि कविता पाठ करून घ्यायच्या नव्हेत तर तसे काही त्यांनी लिहावे, बोलावे यासाठी त्यांना उद्युक्त करायचे. हे तत्त्व अनिता जावळे या प्रयोगशील शिक्षिकेने चांगलेच मनावर घेतले आहे. म्हणूनच त्यांच्या वर्गातले विद्यार्थी केवळ भाषा शिकत नाहीत तर लेखनातून तिचा देखणा आविष्कारही घडवतात.
अनिता जावळे गेली १५ र्वष जि.प.शाळेमध्ये काम करतात. मार्च २००२पासून शिक्षणसेवक म्हणून त्यांनी कामाची सुरुवात केली. अनिताची पहिली शाळा होती, लातूर तालुक्यातील वाडी वाघुली या गावची. ही शाळा चांगली होती, पण खासगी वाहनाशिवाय वाहतुकीची काहीही व्यवस्था नव्हती. म्हणून अनेक स्त्री कर्मचारी ही शाळा नाकारत. अनिताने मात्र हिमतीने ते आव्हान स्वीकारले आणि सात पुरुष सहकाऱ्यांसोबत त्यांच्या खांद्याला खांदा लावून उत्तम काम करून दाखवले. पालकांशी, विद्यार्थ्यांशी यशस्वी संवाद साधला. त्याचेच फळ म्हणून आज त्या धनगर वस्तीतल्या अनेक मुली दहावीपर्यंत पोहोचल्या. ज्या पूर्वी पाचवी-सहावीतच शाळा सोडत.
या शाळेनंतर अनिताची बदली झाली ती लातूर तालुक्यातीलच साखरा शाळेत. त्यानंतर पदवीधर शिक्षक म्हणून त्यांना माटेफळ या शाळेमध्ये बढतीवरील बदली देण्यात आली. अनिता सांगतात, ‘इथे आल्यावर रडूच कोसळले. कारण इथे सगळ्याच गोष्टींची कमी होती. असे वाटले, काय म्हणून ही शाळा घेतली! पाचवीच्या वर्गात नऊ मुलं होती पण उपस्थित केवळ दोन-तीनच. हेच बाकीच्या वर्गाचे.’’मग सगळ्यात आधी विद्यार्थी शाळेत यावेत म्हणून अनिताने प्रयत्न सुरू केले. निरनिराळ्या उपक्रमांतून विद्यार्थ्यांना शाळेकडे वळवले. सुरुवातीला तर दररोज, दर आठवडय़ाला नवे उपक्रम घेतले. मग विद्यार्थ्यांच्या पालकांशी ओळख होण्यासाठी पाककृतीच्या स्पर्धा घेतल्या, गृहभेटी आखल्या. त्यांनी घेतलेला ‘मन की बात’ हा उपक्रम मोठा मजेदार आणि तितकाच महत्त्वाचाही होती. या ‘मन की बात’मध्ये विद्यार्थ्यांनी आजवर कुण्णालाच न सांगितलेल्या गोष्टी सांगायच्या होत्या. मुलेही हुशार त्यांनी आधी बाईंनाच आपल्या ‘मन की बात’ करायला लावली. अनितानेही आपल्या लहानपणातल्या काही खोडय़ा सांगितल्या, ज्या त्यांनी आईलाही कळू दिल्या नव्हत्या. मग हळूहळू मुले बोलती होऊ लागली. अभिषेकने सांगितले, की त्याने त्याच्या वडिलांच्या खिशातून गुपचूप १०० रुपये घेतले होते. खरे तर ही चोरीच होती. पण त्याला तितके कळत नव्हते. परंतु कधी ना कधी वडील आपल्याला त्याबद्दल विचारणार म्हणून घाबरून तो वडिलांशी फारसा बोलायचाच बंद झाला होता. अनिताने त्याला नीट समजावलं आणि ही गोष्ट वडिलांना स्वत: सांगायला लावली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच्या बाबांनी ते नीट ऐकून घेतले आणि अभिषेकच्या प्रामाणिकपणाबद्दल त्याला बक्षीसही दिले. वडिलांबद्दलची अनाठायी भीती या घटनेने कुठच्या कुठे पळून गेली. शाळेतल्या एका उपक्रमाने घरातला बाप-लेकाचा संवाद वाढला होता.
इमरान नावाचा एक मुलगा दोन र्वष फक्त शाळेच्या आवाराजवळ यायचा पण कधीही वर्गात येत नसे. बोलावलं तर पळून जाई. घरचेही त्याच्यासमोर थकले होते. त्यांना तर त्याने धमकीच दिली होती, ‘साळंत पाटवलं तर फाशीच लाऊन घ्येतो.’ असा हा इमरान. अनिताने ठरवले, याला शाळेत आणायचेच. त्याची आई अंगणवाडीत येत असे. तिथे त्यालाही घेऊन यायला सांगितले. इमरान अंगणवाडीत आल्यावर अनिताने त्याच्याशी काहीही न बोलता आपला मोबाइल त्याला दाखवला. त्यावरची गाणी, कविता, चित्र दाखवल्या. शाळा म्हणजे केवळ कठोर अभ्यासच नव्हे तर अशीही गंमत असते, हे इमरानला हळूहळू पटू लागले. त्या मोबाइलच्या माध्यमातून अनिताने त्याच्या मनातली शाळेची भीती घालवली आणि इमरान शाळेत रुळला. पहिल्यांदा केवळ अनिताच्या वर्गात बसण्याचा हट्ट धरणारा इमरान हळूहळू शाळेमध्ये रमला. विद्यार्थ्यांची होणारी प्रगती पाहून पालकांनाही शाळेबद्दल आस्था वाटू लागली आणि वर्गखोल्याही व्यवस्थित नसणाऱ्या शाळेच्या इमारतीची डागडुजी झाली. मैदानाच्या बाजूला खड्डे खणून झाडे लावली. लोकसहभागातून शाळा डिजिटलही करण्यात आली. त्याचबरोबर माटेफळ शाळेमध्ये अनिताने विद्यार्थ्यांसाठी भाषादालनह्ण हा महत्त्वाचा उपक्रम घेतला. भाषा शिक्षणात अनुभव आणि अभिव्यक्ती या दोन्हीला फार महत्त्व असते. मुलांची अभिव्यक्ती सुधारावी, या प्रेरणेने अनिताने हा उपक्रम घेतला. भाषादालनामध्ये भाषा विषयावर अनेक प्रकारचे साहित्य आहे, पुस्तके आहेत, अक्षरांचे खेळ आहेत. विद्यार्थी भाषेचा तास असताना या दालनात येतात आणि शिकतात. मनसोक्त पुस्तकं वाचतात. यातूनच अनिताने विद्यार्थ्यांना लिहायला शिकवले. आपल्याला आलेला अनुभव लिहून काढणे, या एका साध्याशा स्वाध्यायातून विद्यार्थ्यांची लेखन मुशाफिरी सुरू झाली. अनेक विद्यार्थ्यांनी सुंदर कथा लिहिल्या. त्याची पुस्तकंही प्रकाशित झाली. ती पाहिल्यावर आपल्याच मुलांनी हे लिहिले आहे, यावर पालकांचा विश्वास बसेना, इतक्या सुंदर कथा होत्या त्या! शिवाय महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांनी कुणाचीच कॉपी केली नव्हती.
यानंतर त्यांची बदली झाली, जि.प. शाळा बोरगाव काळेमध्ये. या शाळेमध्येसुद्धा अनिताने विद्यार्थ्यांसाठी अनेक सुंदर उपक्रम राबवले. इथेही भाषादालनाचा उपक्रम आहेच. परंतु महत्त्वाचे म्हणजे या भाषादालनामध्ये विद्यार्थ्यांनी स्वत: रंगवलेली चित्रे आहेत. शाळेतल्या इतर भिंतींवरही विद्यार्थ्यांनी चित्रं काढलेली आहेत. परंतु या चित्रांमध्ये विद्यार्थ्यांसाठी अनिताने एक अट घातली होती ती म्हणजे प्रत्येक चित्राची काही तरी गोष्ट हवी. त्यामुळेच चित्रातली झाडे बोलतात, ढग हसतात. फुले नाचतात. पाने डोलतात.. आणि शाळेच्या भिंती बोलू लागतात. या सगळ्या अनुभवाचे विद्यार्थ्यांनी सुंदर शब्दचित्रणही केले आहे. या भाषादालनातील उपक्रमाअंतर्गत विद्यार्थी बातम्या लिहितात, लेखकांना भेटतात. वार्ताहरांना भेटतात. त्यांच्याशी गप्पा मारतात. त्यांच्या मुलाखती घेतात. भाषेच्या उपक्रमामध्येच अनिताने इथे भित्तिपत्रक म्हणून उपक्रम घेतला आहे. प्रत्येक महिन्याच्या भित्तिचित्रासाठी त्या एक विषय देतात. त्यावर कथा, कविता, संवाद, बातमी, स्फुट, चारोळी असे काहीही साहित्य विद्यार्थी देऊ शकतात. या उपक्रमालाही जोरदार प्रतिसाद लाभतोय. याचबरोबर स्वयंपाकासारखे काम फक्त बाईचे नाही, हे विद्यार्थ्यांच्या मनात ठसवण्यासाठी अनिता महिन्यातून दोन शनिवारी खाऊचा उपक्रम घेतात. या दिवशी विद्यार्थीच आपला खाऊ तयार करतात. अगदी भाज्या चिरण्यापासून ते तो पदार्थ तयार करून वाढेपर्यंत सगळे मिळून करतात. यासाठी विद्यार्थ्यांचे छोटे गट केलेले असतात. अशा उपक्रमातून स्त्री-पुरुष समानतेचे धडे नकळतच मिळतात.
आपल्या अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या अनिताचे स्वत:चेही उपक्रम सुरूच असतात. माटेफळ शाळेतील अनुभवांच्या आधारे त्यांनी ‘लखलखणारी शाळा’ हे पुस्तक लिहिले. त्याचबरोबर लहान मुलांसाठीची त्यांची आणखीही काही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. सध्या त्यांनी लातूर जिल्ह्य़ातील इतर धडपडय़ा, प्रयोगशील मैत्रिणींना हाताशी घेत, अखिल मराठवाडा बहुजन महिला साहित्य संमेलनाचा मानस केला आहे. सतत काही तरी शिकण्याचे आपले व्रत अनिताने अशा प्रकारे चालूच ठेवले आहे.
swati.pandit@expressindia.com
First Published on October 24, 2018 3:14 am
Web Title: article about experiment school

No comments:

Post a Comment