शब्दबोध
आपले सामर्थ्य दाखवून एखाद्याचा पुरता माज उतरवणे आणि त्याला ताळ्यावर आणणे, यासाठी इंगा दाखवणे असे म्हणतात.
डॉ. अमृता इंदुरकर
इंगा दाखवणे
‘थांब तुला चांगलाच इंगा दाखवते’ किंवा ‘असा इंगा दाखवेन ना की सरळच होईल तो एकदम’. अशी वाक्ये आपण कायमच ऐकतो. खेडेगावापासून तर अगदी शहरापर्यंत मराठी लोकांच्या तोंडी आजही सहज ऐकू येणारा वाक्प्रयोग म्हणजे इंगा दाखवणे. आपले सामर्थ्य दाखवून एखाद्याचा पुरता माज उतरवणे आणि त्याला ताळ्यावर आणणे, यासाठी इंगा दाखवणे असे म्हणतात. इंगा हा शब्द नेमका आला तरी कुठून?
चामडे जेव्हा मूळ स्वरूपात असते, तेव्हा ते अत्यंत कडक, खरखरीत आणि आक्रसलेले असते. मग जेव्हा या चामडय़ाचा एखाद्या वस्तूसाठी वापर करायचा असतो, तेव्हा त्याला आधी नरम करावे लागते. ते ज्या अवजाराने मऊ करतात त्याला इंगा असं म्हणतात. आधी दोन्ही टोकांकडून चामडे ओढून धरावे लागते, मग त्यावरून ताकदीने इंगा फिरवावा लागतो. जेवढा अधिक हा इंगा चामडय़ावरून फिरेल तेवढे ते चामडे नरम पडते. यावरूनच आपले सामथ्र्य दाखवून एखाद्या माणसाचा माज उतरवल्यावर म्हणजेच त्याला नरम पाडल्यावर त्याला चांगलाच इंगा दाखवला, असं म्हणतात.
गाशा गुंडाळणे
हा वाक्प्रचारही आपण बरेचदा वापरतो. अमुक तमुक आपला गाशा गुंडाळून परत गेला वगैरे वगैरे. हा मूळ अरबी शब्द आहे. ‘घाशिया’ यावरून गाशा तयार झाला आहे. घोडय़ावरती जे खोगीर घातले जाते त्यावरील मऊ कापडाचे जे आच्छादन असते त्याला गाशा म्हणतात. जुन्या काळात युद्धाच्या वेळी घोडय़ांवरती कायमच हा गाशा टाकलेला असायचा. एक तर युद्ध संपल्यावर हा गाशा गुंडाळला जायचा नाहीतर युद्धातून पळून जायची वेळ आली तर गुंडाळला जायचा. या प्रक्रियेवरून आटोपते घेणे, संपुष्टात येणे, पळ काढणे इत्यादींसाठी हा वाक्प्रयोग रूढ झाला आहे.
amrutaind79@gmail.com
First Published on October 13, 2018 2:32 am
Web Title: article about vocabulary words 5
No comments:
Post a Comment