तेलुगू भाषेतील शिक्षणस्रोत – आंध्र विद्यापीठ
जवळपास ४२२ एकरांच्या परिसरामध्ये या विद्यापीठाचे मुख्य संकुल वसले आहे.
|| योगेश बोराटे
संस्थेची ओळख
तेलुगू भाषिकांसाठी निर्माण झालेले एक स्वतंत्र शैक्षणिक केंद्र म्हणून विशाखापट्टणम् येथील आंध्र विद्यापीठाचा सुरुवातीपासूनच विचार केला जातो. स्वतंत्र तेलुगू भाषिक विद्यापीठाची गरज लक्षात घेत, तत्कालीन मद्रास इलाख्यामध्ये १९२६च्या कायद्यानुसार या विद्यापीठाची स्थापना झाली. त्यामुळेच की काय, या विद्यापीठाच्या शैक्षणिक कार्यविस्ताराला एक भावनिक किनारही आहे. निवासी सुविधांसह पदव्युत्तर पातळीवरील शैक्षणिक सुविधा पुरविणारे केंद्र आणि त्याच वेळी महाविद्यालयांना संलग्नताही देऊ शकणारी एक सुरुवातीची संस्था म्हणून देशभरात आंध्र विद्यापीठाची जुनी ओळख आहे. आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम् येथे या विद्यापीठाचे मुख्य संकुल आहे. सध्या विशाखापट्टणम, पूर्व गोदावरी, पश्चिम गोदावरी, विजयनगर आणि श्रीकाकुलम या पाच जिल्ह्य़ांमध्ये या विद्यापीठाचे कार्य चालते. गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच या परिसरातील सामाजिक प्रश्नांवर उत्तरे शोधण्याचे काम या विद्यापीठाने सातत्याने केले आहे. विद्यापीठाला २००६ साली गुणवत्ता व्यवस्थापन यंत्रणेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘आयएसओ ९००१: २०००’ प्रमाणपत्राने गौरविण्यात आले. असे प्रमाणपत्र मिळविणारे आंध्र विद्यापीठ हे देशातील पहिले विद्यापीठ ठरले. यंदाच्या ‘एनआयआरएफ’च्या रँकिंगमध्ये हे विद्यापीठ देशात बाविसाव्या स्थानी आहे.
संकुले आणि सुविधा
जवळपास ४२२ एकरांच्या परिसरामध्ये या विद्यापीठाचे मुख्य संकुल वसले आहे. त्यामध्ये असलेल्या १२१ इमारतींमधून विद्यापीठाचे प्रशासकीय आणि शैक्षणिक कार्य चालते. विद्यापीठाच्या मुख्य संकुलाव्यतिरिक्त चार प्रादेशिक संकुलेही आहेत. गोदावरी जिल्ह्यातील काकीनाड आणि विजयनगर येथील विद्यापीठ संकुलांमध्ये प्रत्येकी पाच विभागांचे कामकाज चालते. श्रीकाकुलम संकुलामध्ये अकरा, तर तडेपल्ली गुडेम येथील संकुलामध्ये चार शैक्षणिक विभागांमधून विद्यार्थ्यांसाठीच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी एकूण २३, तर विद्याíथनींसाठीची एकूण १० वसतिगृहे उभारली आहेत. त्यामध्ये जवळपास पाच हजारांवर विद्यार्थी- विद्याíथनींना रहिवासी सुविधा पुरविल्या जात आहेत. परदेशी विद्यार्थ्यांसाठीची दोन स्वतंत्र वसतिगृहेही विद्यापीठाने उभारली आहेत. विद्यापीठाने १९२७ पासून विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालयाच्या सुविधा पुरविण्यास सुरुवात केली. विद्यापीठाचे माजी कुलगुरू व्ही. एस. कृष्णा यांच्या स्मरणार्थ १९६८पासून त्यांच्याच नावाने विद्यापीठाच्या ग्रंथालयाला डॉ. व्ही. एस. कृष्णा ग्रंथालय अशी नवी ओळख देण्यात आली. या ग्रंथालयाच्या काम दोन शाखांमध्ये चालते. मुख्य संकुलातील लॉ कॉलेजमध्ये एक, तर इंजिनीअिरग कॉलेजमध्ये दुसरी असून त्याद्वारे विद्यार्थ्यांसाठी. पाच लाखांहून अधिक पुस्तकांचा संग्रह उपलब्ध करून देण्यात आला आहे.
विभाग आणि अभ्यासक्रम
विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ आर्ट्सची सुरुवात १ जुल, १९३१ रोजी झाली. त्यापाठोपाठ कॉलेज ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीची सुरुवात झाली. सध्या विद्यापीठांतर्गत कला, वाणिज्य, व्यवस्थापन, विज्ञान आणि तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, कायदा, औषधनिर्माण, शिक्षणशास्त्राशी निगडित एकूण ३१३ अभ्यासक्रम चालतात. सध्या विद्यापीठामध्ये कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स हे सर्वात मोठे महाविद्यालय म्हणून ओळखले जाते. या महाविद्यालयामध्ये एकूण २६ विभाग असून, त्यामध्ये पदवी, पदविका आणि पदव्युत्तर पदवीचे एकूण ४२ अभ्यासक्रम चालतात. कॉलेज ऑफ सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजीमध्ये २१ शैक्षणिक विभाग आहेत. त्या आधारे विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी, पदविका अभ्यासक्रमांसह एकूण ६३ अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. कॉलेज ऑफ इंजिनीअिरगमधील १५ विभागांमधून पदवी, पदव्युत्तर पदवी आणि संशोधनाचे अभ्यासक्रम चालतात. विद्यापीठाच्या विधी महाविद्यालयाला (कॉलेज ऑफ लॉ) विद्यापीठ अनुदान आयोगाने कायदेविषयक प्रगत अध्ययन केंद्राचा दर्जा दिला आहे. कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये पदवी अभ्यासक्रमासह, सहा विषयांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि पीएचडीसाठीचे संशोधन अभ्यासक्रम चालतात. दक्षिण भारतामध्ये अशी सुविधा पुरविणारे हे पहिले महाविद्यालय आणि पर्यायाने विद्यापीठही ठरते. विद्यापीठामध्ये उपलब्ध वेगवेगळ्या अभ्यासक्रमांमध्ये संस्कृत, तेलुगु, अप्लाइड इकॉनॉमिक्स, क्वांटिटेटिव्ह इकॉनॉमिक्स या विषयांमधील एम. ए.चे अभ्यासक्रम विचारात घेतले जातात. त्याशिवाय, एम. एड. स्पेशल एज्युकेशन, एम. फिल. (क्लिनिकल सायकॉलॉजी), बॅचलर ऑफ परफॉìमग आर्ट्स इन थिएटर आर्ट्स, पाच वष्रे कालावधीचा इंटिग्रेटेड एलएलबी अभ्यासक्रम, पाच वष्रे कालावधीचाच इंटिग्रेटेड एम. एस. इकॉनॉमिक्स हा अभ्यासक्रमही विद्यापीठामध्ये उपलब्ध आहेत. कोऑपरेशन अँड रुरल स्टडिज, इंग्लिश लँग्वेज अँड लिंग्विस्टिक्स, रिटेल मॅनेजमेंट, फायनान्शिअल सíव्हसेस, क्रिमिनल जस्टिस या विषयांमधील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम शिकण्याची संधी विद्यापीठाने उपलब्ध करून दिली आहे. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रासाठी मरिन इंजिनीअिरग, नेव्हल आíकटेक्चरविषयक बी.ई, जिओ- इन्फम्रेटिक्स, सिरॅमिक टेक्नोलॉजीविषयक बी. टेक., इन्व्हायर्न्मेंटल इंजिनीअिरग अँड मॅनेजमेंट, सॉइल मेकॅनिक्स अँड फाऊंडेशन इंजिनीअिरग, हिट ट्रान्स्फर इन एनर्जी सिस्टिम, टेक्नॉलॉजी फोरकास्टिंग, मरिन इंजिनीअिरग अँड मेकॅनिकल हँडिलग, मिनरल प्रोसेसिंग इंजिनीअिरग, जिओ-इंजिनीअिरगविषयक एम.ई.चे अभ्यासक्रम हे या विद्यापीठाचे वेगळेपण ठरते. अॅप्लाइड मॅथेमॅटिक्स, फिजिकल ओशनोग्राफी, मरिन जिओफिजिक्स, हायड्रोलॉजी, हॉर्टकिल्चर अँड लँडस्केप मॅनेजमेंट, मरिन बायोलॉजी अँड फिशरिज, कोस्टल अॅक्वाकल्चर अँड मरिन बायोटेक्नॉलॉजी, मोलेक्युलर जेनेटिक्स, मरिन जिओलॉजी अशा वेगळ्या विषयांमधील एम. एस्सीचे अभ्यासक्रम या विद्यापीठाने उपलब्ध करून दिले आहेत. एम. एस्सी. टेक (जिओफिजिक्स) हा तीन वष्रे कालावधीचा अभ्यासक्रम, तसेच एम. टेक. (ओशिअनिक सायन्स) हे अभ्यासक्रमही या वेगळेपणाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात. विद्यापीठाने १९७२पासून दूरशिक्षण केंद्राचीही सुरुवात केली. त्याआधारे विद्यापीठाने प्रमाणपत्र अभ्यासक्रमापासून ते व्यावसायिक अभ्यासक्रमांपर्यंतचे विविध अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले आहेत. विद्यापीठाने दूरशिक्षणाचा विस्तार वाढविण्यासाठी राज्यभरात ३५ अभ्यास केंद्रांची निर्मितीही केली आहे.
borateys@gmail.com
First Published on October 2, 2018 3:19 am
Web Title: andhra university
No comments:
Post a Comment