Wednesday, December 7, 2016

करिअरमंत्र

करिअरमंत्र

भारतातही बीअर /वाइन निर्मिती उद्योगात अनेक कंपन्या यशस्वीरीत्या कार्यरत आहेत.

*   माझ्या मुलीने डी.वाय.पाटील विद्यापीठातून बायोटेक्नॉलॉजीमध्ये एम.टेक केल्यावर इंग्लंडमधून  ब्रुइंग अँड डिस्टिलिंगमध्ये मास्टर्स अभ्यासक्रम केला आहे. या विषयात करिअरच्या संधी कोणत्या आहेत?
विनायक बाहुतुले
आपल्या मुलीने वेगळ्या अशा अभ्यासक्रमाची निवड केली आहे. बीअर निर्मिती व प्रक्रिया उद्योगांना अशा विषयातील तज्ज्ञांची सतत गरज भासते. इंग्लड, ऑस्ट्रेलिया व इतर देशांमधील मोठय़ा ब्रिवरीजमध्ये संधी मिळू शकते. भारतातही बीअर /वाइन निर्मिती उद्योगात अनेक कंपन्या यशस्वीरीत्या कार्यरत आहेत. यासाठी व्यक्तिगतरीत्या प्रयत्न करावे लागतील. इंग्लंडस्थित इन्स्टिटय़ूट ऑफ ब्रुइंग  अँड डिस्टिलिंग या संस्थेचे या व्यवसायात कार्यरत असणारे ५००० सदस्य १००हून अधिक देशांमध्ये आहेत. या व्यवसायाशी संबंधित सदस्य संख्या असलेली ही जगातील सर्वात मोठी संस्था समजली जाते. या संस्थेशीही संपर्क साधता येईल. संकेतस्थळ-www.ibd.org.uk
*   मला यूपीएससी द्यायची आहे. मी अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षांत शिकत आहे. यूपीएससीसाठी फक्त तीन वर्षे संपवून परीक्षा दिली तर चालते का? मला अभियांत्रिकीचे शेवटचे वर्ष करायचे नाही. पदवी आवश्यक आहे का?
– सुमित पोळस
यूपीएससी म्हणजेच संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला पात्र ठरण्यासाठी किमान अर्हता ही कोणत्याही विषयातील पदवी आहे. त्यामुळे तुला अभियांत्रिकीची पदवी घ्यावी लागेल. अभियांत्रिकीची तीन वर्षे संपवून ही परीक्षा देता येणार नाही. अभियांत्रिकी सोडायची असल्यास आता या टप्प्यावर यूपीएससी परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी मुक्त विद्यापीठातून पदवी घेणे श्रेयस्कर ठरेल.
*    मी द्वितीय श्रेणीत बी.कॉम. उत्तीर्ण झालो आहे. मला पाच वर्षांचा कार्यानुभव आहे. गेल्या एक वर्षांपासून मी एमआयएस एक्झिक्युटिव्ह म्हणून कार्यरत आहे. एका चाचणी-परीक्षणामध्ये मला सामाजिक शास्त्रे, शैक्षणिक क्षेत्र, विधी आणि कृषी या क्रमाने करिअरमध्ये रस असल्याचे दिसून आले आहे. मला माणसांमध्ये मिसळायला अजिबात आवडत नाही. सध्या माझे वय २९ आहे. मी एमआयएसमध्ये कार्यरत राहिलो किंवा डाटासंबंधित विषयात करिअर करायचे ठरवल्यास काय संधी राहील ?
– सुबोध कसाळे
सध्या तुम्ही ज्या व्यवसायात कार्यरत आहात, त्यामध्ये तुम्ही दिलेल्या माहितीनुसार पाच वर्षांचा अनुभव आहे. या अनुभवाच्या बळावर आणि तुम्हाला या क्षेत्राची आवड निर्माण झाली असल्यास तुम्ही याच क्षेत्रात राहायला हरकत नाही. कारण या क्षेत्रातील तुमचा अनुभव व मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग करण्याची तुमची क्षमता लक्षात घेऊन तुम्हाला सध्या कार्यरत असलेल्या कंपनीमध्ये वा इतर कंपन्यांमध्ये वरिष्ठ पदे मिळू शकतात. दरम्यान तुम्ही एक्झिक्युटिव्ह एमबीए वा पार्टटाइम एमबीए करून पुढील चांगल्या संधीसाठी स्वत:ला सक्षम करू शकता. माहिती विश्लेषण (डेटा अ‍ॅनालिसिस) हे अतिशय झपाटय़ाने वाढणारे क्षेत्र आहे. दर्जेदार डेटा अ‍ॅनालिस्टची गरज सर्व मोठय़ा उद्योगांना भासू लागली आहे. या विषयाशी संबंधित अभ्यासक्रम करून तुम्ही या क्षेत्रालाही करिअरचा उत्तम पर्याय म्हणून स्वीकारू शकता.

No comments:

Post a Comment