Wednesday, December 21, 2016

वेगळय़ा वाटा : संगीतमय संधी

वेगळय़ा वाटा : संगीतमय संधी

हजारो वर्षांपासून भारतात रुजलेल्या 'संगीत' या कलेचा कालपरत्वे विस्तार होत गेला.

  

 

हजारो वर्षांपासून भारतात रुजलेल्या ‘संगीत’ या कलेचा कालपरत्वे विस्तार होत गेला. नवनवीन संगीतप्रकार उदयाला आले, सादरीकरणाच्या पद्धतीत अनेक बदल होत गेले. जिथे संगीताचा वापर होतो अशी वेगवेगळी माध्यमे, व्यासपीठे निर्माण झाली आणि अनुषंगाने संगीतात करिअर करण्याची विविध दालने खुली झाली.


*   सादरकर्ते –
गायक, वादक, संगीतकार, संगीत संयोजक म्हणून काम करणे हे ‘परफॉर्मिग आर्ट्स’ या प्रकारात मोडणारे करिअरचे पर्याय आहेत. मनुष्याच्या गळ्यातला ‘स्वर’ ही नैसर्गिक देणगी आहे. सांगीतिक भाषेत सांगायचे झाले तर कदाचित एखादा माणूस रूढार्थाने ‘सुरेल’ नसेल परंतु ‘त्याच्या परीने’ गाणे त्याला सहज शक्य असते आणि म्हणूनच ‘आपणही गाण्यात करिअर करू शकतो’ असे वाटणाऱ्यांची संख्या बरीच असते. त्यामुळे या क्षेत्रात करिअर करण्यासाठी आपली क्षमता अतिशय तटस्थ राहून ओळखायला हवी. त्यानंतर हे पॅशन कायम असेच टिकेल का, याचा विचार झाला पाहिजे.
शास्त्रीय संगीत शिकवणारी आणि परीक्षा घेणारी गांधर्व महाविद्यालयाची ३८४ केंद्रे महाराष्ट्रात कार्यरत आहेत. दरवर्षी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या मुख्य केंद्रांवर विद्यार्थी परीक्षा देऊ  शकतात आणि महाराष्ट्रात इतर ठिकाणी वेगवेगळ्या गुरूंकडून शिक्षण घेऊन या संस्थेच्या तेथील केंद्रांवर परीक्षा देऊ  शकतात. मुंबई विद्यापीठ, ललित कला केंद्र, पुणे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांसारख्या विद्यापीठांमध्ये शास्त्रीय संगीत शिकवले जाते. ट्रिनिटी कॉलेज, लंडन यांच्या १०० शाखा भारतात आहेत. त्यापैकी मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक महाराष्ट्रातील ४ केंद्रांवर पाश्चात्त्य संगीत शिकता येईल. तसेच शास्त्रीय संगीत, सुगम संगीत आणि पाश्चात्त्य संगीताच्या क्षेत्रातील ज्येष्ठ गायक इच्छुकांना वैयक्तिक मार्गदर्शन करतात. त्याचप्रमाणे ऑनलाइन प्रशिक्षण घेण्याचाही पर्याय आता उपलब्ध आहे. गायन किंवा वादन शिकण्यासाठी योग्य गुरूची निवड करणे अतिशय महत्त्वाचे आहे.
‘संगीतकार’ आणि ‘संगीत संयोजक’ यांच्यातला फरक सांगताना ज्येष्ठ संगीत संयोजक आप्पा वढावकर म्हणाले होते की, ‘संगीतकार’ हा जणू घर बांधतो आणि ‘संगीत संयोजक’ हा इंटेरियर डेकोरेटर असतो. त्याप्रमाणे संगीतकार गाण्याची चाल बांधतो आणि संगीत संयोजक गाण्याला साज चढवतो. त्यामुळे याबाबत आपली समज, कल आणि आपली क्षमता ओळखून त्याबद्दल अधिक शिक्षण घ्यावे. संगीतकार आणि संगीत संयोजक यांना हार्मोनियम वाजवता येत असल्यास उत्तम. मुंबई विद्यापीठ, ट्र स्कूल ऑफ म्यूझिक या ठिकाणी संगीत रचनेचे लहान अभ्यासक्रम घेतले जातात. वेगवेगळ्या प्रकारचे संगीत  ऐकणे, वेगवेगळे साउंड्स तयार करणे याबरोबरच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठल्या गीताला कुठल्या प्रकारची चाल लावली पाहिजे याची समज संगीतकाराला असणे आवश्यक आहे.
भारत सरकार संस्कृती मंत्रालय, ITC SRA, CCRT,, नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिग आर्ट्स (एनसीपीए) अशा संस्थांतर्फे संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. मुंबईतील ‘एनसीपीए’तर्फे दर महिन्याला ‘उमंग’ या कार्यक्रमाअंतर्गत शास्त्रीय संगीत क्षेत्रातील दोन नवोदित गायक आणि वादकांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. रसिकांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य असतो. तसेच विविध संस्थांतर्फे सादर केले जाणारे कार्यक्रम किंवा चित्रपट, नाटक, जाहिराती यांसाठी गायक, वादक, संगीतकार, संगीत संयोजक यांना फ्रीलान्सिंग करता येते. संगीताविषयीचे रिअ‍ॅलिटी शो गायकांना घरोघरी पोहोचवतात. शाळा, महाविद्यालये, संस्था या ठिकाणी ‘संगीत शिक्षक’ या पदावरही काम करता येते.
*  आयोजक, व्यवस्थापक –
संगीताच्या क्षेत्रात ‘प्रोग्रॅम ऑर्गनायझर्स’ म्हणूनही काम करता येऊ शकते. नवनवीन संकल्पनांवर आधारित कार्यक्रम सादर करणे, आयोजक हा स्वत: प्रायोजक नसेल तर कार्यक्रमासाठी प्रायोजक शोधणे, गायक आणि वादकांचा चमू तयार करणे, कार्यक्रम स्थळी आवश्यक अशा परवानग्या घेणे अशी अनेक कामे आयोजकाच्या भूमिकेशी जोडलेली आहेत. त्याचप्रमाणे बरेच गायक, संगीतकार आपल्या कामांचे व्यवस्थापन करण्यासाठी व्यवस्थापक नेमतात. कलाकारांच्या मीटिंग्स, कॉल्स, मेल्स याचे व्यवस्थापन करणे आणि आयोजक व तो कलाकार यांच्यातला दुवा होणे ही दोन मुख्य कामे व्यवस्थापकांना पार पाडावी लागतात. वक्तशीरपणा, उत्तम नियोजनक्षमता आणि स्मार्टनेस अशा काही वैयक्तिक क्षमतांच्या जोरावर ‘आयोजक’ किंवा ‘व्यवस्थापक’ म्हणून करिअर करता येते. त्याला ‘इव्हेंट मॅनेजमेंट’च्या शिक्षणाची जोड मिळाल्यास अधिक मदत होईल. कलाकारांना सोशल मीडिया, संकेतस्थळे यांचा योग्य तो उपयोग करून आपली कला लोकांपर्यंत पोहोचवता येते. या स्पर्धेच्या युगात ‘फ्री-लान्सर’ म्हणून काम करताना सर्वानाच पी.आर. – मार्केटिंग करणे, संपर्क प्रस्थापित करणे, नवे बदल स्वीकारणे त्याप्रमाणे स्वतला बदलणे या गोष्टी अनिवार्य आहेत. पण हे करत असताना ज्याच्या जिवावर कलाकार मान आणि धन कमावतो त्या ‘रियाजा’कडे दुर्लक्ष होता कामा नये. कारण सिर सलामत तो पगडी पचास!

No comments:

Post a Comment