Saturday, June 29, 2019

‘प्रयोग’ शाळा : विज्ञानाची जादू प्रवीण शिंदे गेल्या १० वर्षांपासून सेवेत आहेत. सुरुवातीला ते शिरूर (कासार) तालुक्यातील भडकेल या गावच्या शाळेत कार्यरत होते.

‘प्रयोग’ शाळा : विज्ञानाची जादू

प्रवीण शिंदे गेल्या १० वर्षांपासून सेवेत आहेत. सुरुवातीला ते शिरूर (कासार) तालुक्यातील भडकेल या गावच्या शाळेत कार्यरत होते.

(संग्रहित छायाचित्र)

जि.प. प्राथमिक शाळा जरेवाडी, ता. पाटोदा,
जि. बीड या शाळेतला रोजचा परिपाठ मोठा मजेशीर असतो. कारण त्यात रोज पाहायला मिळते विज्ञानाची एक जादू अर्थात वैज्ञानिक प्रयोग. पुस्तकातले विज्ञान विद्यार्थ्यांच्या रोजच्या जगण्यात आणण्यासाठी त्यांचे शिक्षक प्रवीण शिंदे सतत कार्यरत असतात.
प्रवीण शिंदे गेल्या १० वर्षांपासून सेवेत आहेत. सुरुवातीला ते शिरूर (कासार) तालुक्यातील भडकेल या गावच्या शाळेत कार्यरत होते. त्यानंतर २०१२-२३ मध्ये त्यांची बदली झाली, जि.प. प्राथमिक शाळा जरेवाडी, ता. पाटोदा, जि. बीड या शाळेमध्ये. ही शाळा जिल्ह्य़ातील पहिली आयएसओप्राप्त शाळा. इथे शिक्षणाचा दर्जा उत्तम होताच आणि प्रवीणसरांसारखे शिक्षक तो अधिक उत्तम करण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रवीण म्हणतात, ‘‘संदीप पवारसरांनी शाळेसाठी जवळपास २०-२२ वर्षे अथक मेहनत घेतली आहे. त्यांचा आम्हा सर्व शिक्षकांना खूप पाठिंबा असतो. विद्यार्थ्यांना मुळात शिकण्याची आवड असल्याने आम्हालाही अधिकाधिक प्रयोग करावेसे वाटतात.’’
प्रवीण शिंदे यांना शिक्षकच व्हायचे होते त्यामुळे बारावीनंतर ते थेट दाखल झाले ते डीएड कॉलेजलाच. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना जाणवले की, आपल्याला विज्ञानविषयक वाचन, माहिती अधिक आवडते. मग या विषयातील अधिकाधिक पुस्तके वाचताना त्यांच्या लक्षात आले की, विज्ञान शिका असे आपण सारेच म्हणतो पण खरी गरज आहे, विज्ञान जगण्याची. हा मुद्दा विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी मग त्यांनी अनेक उपक्रम राबवण्यासाठी सुरुवात केली.
जरेवाडीच्या शाळेमध्ये विज्ञानविषयक अनेक उपक्रम चालतात. त्यातील सर्वात महत्त्वाचा म्हणजे जिओ सायन्स क्लब. जिओ (जिओग्राफी) म्हणजे भूगोल तर सायन्स म्हणजे विज्ञान. हे दोन्ही विषय विद्यार्थ्यांच्या परिसरातले आणि समजण्यासाठी गरजेचेच. जिओ सायन्स क्लबचे सदस्य आहेत, सहावी ते आठवीतले विद्यार्थी. जवळपास १४-१५ विद्यार्थी मिळून या क्लबचे काम पाहतात. या क्लबमार्फत अनेक उपक्रम राबवण्यात येतात. विज्ञानविषयक माहितीचे भित्तिपत्रक विद्यार्थ्यांकडून तयार केले जाते. विज्ञानाशी संबंधित मासिकांचे, पुस्तकांचे नियमित वाचन होते.
शाळेमध्ये वर्गाना केवळ सहावीचा किंवा आठवीचा वर्ग न म्हणता एक वेगळी वैज्ञानिक ओळख आहे. प्रत्येक वर्गाला एकेका शास्त्रज्ञाचे नाव दिलेले आहे. त्या त्या शास्त्रज्ञाची माहिती त्या त्या वर्गाच्या दारावर लिहिलेली असते. जिओसायन्स क्लबमध्ये विज्ञानविषयक चित्रपटांचे किंवा माहितीपटांचेही प्रदर्शन होत असते.
‘माय सायन्स लॅब’ या उपक्रमांतर्गत अगदी साध्या गोष्टींतून, वस्तूंतून विज्ञान प्रयोग केले जातात. सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबवला जातो. प्रयोगशाळेत नेहमीच सगळ्यांना सगळी उपकरणे हाताळायला मिळतात, प्रयोग करायला मिळतात असे नसते. त्यामुळेच ‘माय सायन्स लॅब’ ही कमीतकमी खर्चातली प्रत्येकाची प्रयोगशाळा सजते. एका साध्या खोक्यात चुंबक, पट्टी, दोरा, मेणबत्ती, आरसा, काच, बशी, रबर, लाकडी ठोकळा, लोकर इ. वस्तूंच्या साहाय्याने विज्ञानातील अनेक संज्ञा प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे विद्यार्थ्यांना समजावल्या जातात.
रोजचा परिपाठ हासुद्धा विज्ञानमय व्हावा यासाठी ‘विज्ञान अध्ययन समृद्धी’ कार्यक्रम राबवला जातो. त्याअंतर्गत संपूर्ण आठवडय़ाचा वैज्ञानिक कार्यक्रमच नक्की केलेला आहे. वैज्ञानिक शब्दकोडे, प्रश्नमंजूषा, आपले पर्यावरण, गंमत विज्ञानाची, शास्त्रज्ञ आणि आपले आरोग्य अशाप्रकारे सहा दिवसांसाठी सहा उपक्रम राबवले जातात. परिपाठात या सर्व उपक्रमांचे सादरीकरण होते.
विद्यार्थ्यांनी नवनवी माहिती शोधावी, यासाठी प्रवीण आणि सहकारी अनेक उपक्रम राबवत असतात. त्यातीलच एक म्हणजे, ‘धिस फ्रेम माय फ्रेंड’. विद्यार्थ्यांनी शोधलेली नवनवी माहिती नव्या नव्या आठवडय़ात या फ्रेममध्ये झळकते. त्यासाठीचे पोस्टरही विद्यार्थीच बनवतात. पुस्तकातलेच विज्ञान आपल्या जगण्यात आहे, हे दाखवून देण्यासाठी प्रवीण शिंदे ‘कर के देखो’ हा उपक्रम घेतात. त्यामध्ये परिसरातल्या वस्तू घेऊन परिपाठात सोपे प्रयोग करून दाखवले जातात. ही शाळा सेमी इंग्रजी माध्यमातील आहे. पाचवीपर्यंत मराठीतून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सहावीत आल्यावर इंग्रजीमधून विज्ञान शिकणे काहीसे अवघड जाऊ शकते. अशा वेळी या विद्यार्थ्यांच्या मदतीला येतात, वरच्या वर्गातले विद्यार्थी. ‘इच मी टीच मी’ उपक्रमांतर्गत दररोज मधल्या सुट्टीच्या वेळात मोठे विद्यार्थी छोटय़ा विद्यार्थ्यांना शिकवतात. यातून दोन गोष्टी होतात. मोठय़ांचा अभ्यास पक्का होतो तर लहान विद्यार्थ्यांना आपल्याच मित्राकडून दडपणाविना विज्ञान शिकताना ते अधिक जवळचे वाटू लागते.
जसे विज्ञान महत्त्वाचे तसेच भूगोलही. पाटोदा तालुका हा मोरांकरता प्रसिद्ध. पण कमी पाऊस, दुष्काळसदृश परिस्थिती यामुळे मोरांची संख्या कमी होत आहे. म्हणूनच ‘मूठभर धान्य पक्ष्यांसाठी’ या उपक्रमांतर्गत तालुक्यातील शाळांकडून पक्ष्यांसाठी जमेल त्याप्रमाणे धान्य गोळा केले जाते. त्याचेही बरेचसे काम विद्यार्थीच पाहतात. हे जमलेले धान्य पक्ष्यांच्या पाणवठय़ाच्या आसपासच्या जागांवर विखरून टाकण्यात येते. हा उपक्रम सुरू झाल्यापासून अनेक विद्यार्थीही आपल्या घरांजवळ पक्ष्यांसाठी दाणा-पाणी ठेवू लागले आहेत. याचबरोबर शाळेत राबवला जाणारा आणखीन एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे रद्दीतून ग्रंथनिर्मिती. रद्दी पेपर हे टाकाऊ पण त्यातूनही चांगल्या माहितीची कात्रणे काढून त्याची चिकटवही तयार केली जाते. अशाप्रकारे या रद्दीतून एकप्रकारे नवनिर्मिती होत असते.
या साऱ्यासोबत विज्ञान प्रदर्शने, निबंध स्पर्धा, चित्र प्रदर्शन, विज्ञान नाटय़ोत्सव, बालविज्ञान परिषद अशा उपक्रमांमध्ये जरेवाडीचे विद्यार्थी सक्रिय सहभाग घेतच असतात शिवाय पारितोषिकेही मिळवतात. एकूणच प्रवीण शिंदे यांच्या कल्पक उपक्रमांमुळे आणि प्रयत्नांमुळे जरेवाडीचे विद्यार्थी विज्ञान फक्त पुस्तकामध्ये शिकत नाहीत तर जगायचाही प्रयत्न करत आहेत.
First Published on April 4, 2019 11:59 pm
Web Title: prayogshala article by swati pandit 2

No comments:

Post a Comment