विद्यापीठ विश्व : हिरवाईने नटलेले विद्यापीठ
प्रिन्स्टन विद्यापीठ, अमेरिका
प्रिन्स्टन विद्यापीठ, अमेरिका
प्रथमेश आडविलकर itsprathamesh@gmail.com
विद्यापीठाची ओळख – प्रिन्स्टन खुर्च्या किंवा प्रिन्स्टन या नावाने सर्वत्र परिचित असलेले विद्यापीठ अमेरिकेतील न्यू जर्सीमधील प्रमुख विद्यापीठ आहे. प्रिन्स्टनमध्ये स्थित असलेले हे जागतिक दर्जाचे विद्यापीठ आयव्ही लीग विद्यापीठांपैकी एक आहे.
प्रिन्स्टन विद्यापीठ क्यूएस वर्ल्ड खुर्च्या रँकिंगनुसार जगातले तेराव्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे. या विद्यापीठाची स्थापना अमेरिकन क्रांतीच्याही अगोदर म्हणजे १७४६ साली एलिझाबेथमध्ये कॉलेज ऑफ न्यू जर्सी या नावाने झालेली होती. प्रिन्स्टन विद्यापीठ हे अमेरिकेतील चौथ्या क्रमांकाचे जुने विद्यापीठ आहे. प्रिन्स्टन विद्यापीठ हे खासगी संशोधन विद्यापीठ आहे.
प्रिन्स्टन विद्यापीठ एकूण पाचशे एकरच्या कॅम्पसमध्ये पसरलेले आहे. प्रिन्स्टनचा मुख्य कॅम्पस हिरव्यागार निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. कॅम्पसमध्ये सर्व मिळून १८० इमारती असून लुईस लायब्ररीसारख्या अनेक इमारती त्यांच्या स्थापत्यशास्त्रीय वैविध्यासाठीदेखील प्रसिद्ध आहेत. आज प्रिन्स्टनमध्ये एक हजारपेक्षाही अधिक प्राध्यापक-संशोधक आपले अध्यापन-संशोधनाचे कार्य करत आहेत. तर जवळपास आठ हजारांहून अधिक पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी येथे त्यांचे शिक्षण पूर्ण करत आहेत.
अभ्यासक्रम – प्रिन्स्टन विद्यापीठातील पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचे असून पदव्युत्तर अभ्यासक्रम वेगवेगळ्या कालावधींचे आहेत. विद्यापीठामध्ये साहित्य, समाजशास्त्र, गणित, अभियांत्रिकी, कायदा, अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान, उद्योजकता, साहित्यिक टीका कला आणि विज्ञान या प्रमुख विभागांसहित एकूण ४२ विभाग (स्कूल्स) कार्यरत आहेत.
पारंपरिक विषयांशिवाय वेगळ्या शैक्षणिक विषयांना विद्यार्थ्यांकडून प्राधान्य दिले जाते. विद्यापीठातील या सर्व स्कूल्सच्या अंतर्गत सर्व पदवी, पदव्युत्तर व संशोधन विभाग चालतात. प्रिन्स्टनमधील या स्कूल्सच्या माध्यमातून, विद्यापीठ सर्व मेजर्स आणि मायनर्स म्हणजेच पदवी अभ्यासक्रम, पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि व्यावसायिक अभ्यासक्रम चालवते. या सर्व विभागांमधून विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडी वा संशोधन पातळीवरील शेकडो अभ्यासक्रमांचे सर्टििफकेट, ऑनलाइन व ऑफलाइन पर्याय विद्यापीठाने उपलब्ध करून दिले आहेत. विद्यापीठामार्फत चालणाऱ्या या सर्व अभ्यासक्रमांना त्या त्या क्षेत्रातील विविध संस्थांची मान्यता मिळालेली आहे. विद्यापीठातील ऑफलाइन अभ्यासक्रम हे फॉल आणि स्प्रिंग या दोन सत्रांमध्ये चालतात तर ऑनलाइन अभ्यासक्रम वर्षभर उपलब्ध असतात. विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविण्यासाठी त्या त्या पदवी वा पदव्युत्तर स्तरासाठी आवश्यक असलेली प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे.
सुविधा – प्रिन्स्टन विद्यापीठातील शिक्षण जरी अतिशय महाग असले तरी पात्रतेच्या निकषांनुसार विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्क, शैक्षणिक कर्ज, निवास व भोजन आदी सुविधा दिलेल्या आहेत. प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून शिष्यवृत्ती दिली जाते. तसेच, आवश्यकतेनुसार विद्यापीठाच्या आवारात विवाहित व अविवाहित विद्यार्थ्यांना निवासाची सुविधा बहाल करण्यात येते. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर यासाठी असलेली अर्जप्रक्रिया व इतर बाबींबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. प्रिन्स्टन एक महत्त्वाची आयव्ही लीग संस्था असल्याने पदवीच्या चार वर्षांच्या कालावधीदरम्यान सर्व पदवीधर विद्यार्थ्यांना त्यांच्या निवासाच्या सोयीची हमी विद्यापीठाकडून दिली जाते. विद्यापीठाशी संलग्न काही निवासी महाविद्यालये असून ती विद्यार्थ्यांना शैक्षणिक वातावरणाबरोबरच उत्कृष्ट सामाजिक व सांस्कृतिक वातावरण प्रदान करतात.
वैशिष्टय़ – प्रिन्स्टन विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक अभ्यासाच्या पलीकडे हितसंबंध ठेवण्यासाठी संधी दिली जाते. यामध्ये मग एखाद्या साहित्यिक प्रकाशनासाठी लेखन करणे, मधमाश्या पाळण्याचे शास्त्र शिकणे, किंवा कॅपेला गटांमध्ये गायन करणे आदी बाबींचा समावेश होतो. प्रिन्स्टनच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये अनेक दिग्गजांचा समावेश आहे. यामध्ये, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष व्रुडो विल्सन व जेम्स मॅडिसन, तसेच अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांचा समावेश आहे. अमेरिकेच्या माजी ‘फर्स्ट लेडी’ मिशेल ओबामा यादेखील याच विद्यापीठाच्या विद्यार्थी आहेत. ऑक्टोबर २०१८पर्यंतच्या सांख्यिकीनुसार, आतापर्यंतचे एकूण ६५ नोबेल पारितोषिक विजेते आणि तेरा टय़ुरिंग पुरस्कार विजेते या विद्यापीठाचे विद्यार्थी वा प्राध्यापक होते/आहेत.
संकेतस्थळ – https://www.princeton.edu/
First Published on March 26, 2019 2:46 am
Web Title: university world princeton university usa
No comments:
Post a Comment