एमपीएससी मंत्र : दुय्यम सेवा – नागरिकशास्त्र
अभ्यासक्रमातील तीन उपघटकांची तयारी कशी करावी याबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.
संग्रहित छायाचित्र
सहायक कक्ष अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक या दुय्यम सेवांच्या पूर्वपरीक्षेसाठी राज्यव्यवस्था घटकाचा अभ्यासक्रम ‘नागरिकशास्त्र – भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन), ग्राम व्यवस्थापन (प्रशासन)’ निश्चित करण्यात आला आहे. अभ्यासक्रमातील तीन उपघटकांची तयारी कशी करावी याबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.
* भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास
* राज्यघटनेच्या निर्मितीची प्रक्रिया, तिच्यावरील वेगवेगळ्या विचारसरणींचा व कायदे तसेच राज्यघटनांचा प्रभाव यांचा आढावा घ्यायला हवा.
* घटना समितीबाबत उपसमित्या, त्यांचे विषय, अध्यक्ष, महिला सदस्या, निर्णयांचे महत्त्वाचे टप्पे, महत्त्वाच्या बठका यांचा आढावा घ्यायला हवा.
* घटनेच्या सरनाम्यातील तत्त्वज्ञान, हेतू समजावून घ्यावे.
* घटनेतील सगळ्या कलमांचा अभ्यास आवश्यक नाही. घटनेच्या भाग ४ मधील मूलभूत हक्क, राज्याची नीतिनिर्देशक तत्त्वे, मूलभूत कर्तव्ये याबाबतची सर्व कलमे बारकाईने अभ्यासावीत.
* सर्वोच्च न्यायालयाचे, घटनेचा अर्थ विशद करणारे तसेच मूलभूत हक्कांबाबतचे महत्त्वाचे निर्णय माहीत असणे आवश्यक आहे.
* उच्च व सर्वोच्च न्यायालयांविषयीची महत्त्वाची कलमे, न्यायाधीशांच्या नेमणुका, पदावरून दूर करणे, अधिकार, कार्यपद्धती इत्यादी बाबींचा आढावा घ्यावा.
* घटनात्मक पदे, आयोग अभ्यासताना संबंधित कलम, कार्ये, अधिकार, नेमणुकीची पद्धत, पदावरून काढण्याची पद्धत, सध्या त्या पदावरील व्यक्तीचे नाव हे मुद्दे पाहावेत.
* केंद्रीय लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोग याबाबतची कलमे, त्यांची रचना, कार्ये, सध्याचे सदस्य व अध्यक्ष याबाबत प्रश्न विचारले जाऊ शकतात. याबाबत नेमण्यात आलेल्या आयोगांच्या शिफारशी या चालू घडामोडींचा भाग आहेत. प्रशासकीय सुधारणा आयोगांच्या ठळक शिफारशींचा आढावाही उपयुक्त ठरू शकेल.
* राज्य व्यवस्थापन (प्रशासन)
* केंद्र व राज्य शासनाचे अधिकार, कार्ये, जबाबदाऱ्या या बाबी यामध्ये समाविष्ट होतात. मात्र याबाबत राज्य शासनावर विशेषत: महाराष्ट्राचा संदर्भ घेऊन भर देणे आवश्यक आहे.
* प्रशासकीय, आर्थिक, न्यायिक व इतर बाबतीत केंद्र शासन व राज्य शासन यांच्यामध्ये अधिकारांची विभागणी कशा प्रकारे झाली आहे त्याबाबतची कलमे नीट समजून घ्यायला हवी. याबाबत घटनेच्या सातव्या अनुसूचीचा संदर्भ घ्यावा. विशेषत: चालू घडामोडींच्या संदर्भात या बाबी महत्त्वाच्या आहेत.
* महाराष्ट्राचे राज्यपाल, त्यांची नियुक्ती, अधिकाऱ्यांची बारकाईने माहिती असायला हवी. महाराष्ट्राबाबत विशेष तरतूद करणारे घटनेतील कलम, त्याअन्वये स्थापन वैधानिक महामंडळे यांचा आढावा घ्यावा.
* मंत्रिमंडळ, मुख्यमंत्री, विधानसभा व विधान परिषद यांबाबत घटनेतील तरतुदी समजून घ्याव्यात.
* विधान मंडळ कामकाज, कायदा निर्मिती प्रक्रिया, कामकाजाशी संबंधित काही महत्त्वाच्या संज्ञा आणि संकल्पना समजून घ्याव्यात.
* ग्राम व्यवस्थापन (प्रशासन)
* स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत ७३वी व ७४वी घटनादुरुस्ती यांमधील महत्त्वाच्या तरतुदी विशेषत: घटकराज्यांना दिलेले अधिकार तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांना सोपविण्यात आलेले विषय व्यवस्थित समजावून घ्याव्यात.
* राज्य निवडणूक आयोग व राज्य वित्त आयोग याबाबत घटनेतील कलमे, रचना, कार्यपद्धती, अधिकार, जबाबदाऱ्या लक्षात घ्याव्यात.
* स्थानिक स्वराज्य संस्थांची रचना, कार्ये, जबाबदाऱ्या, अधिकार, उत्पन्नाची साधने, त्यांचे लेखा परीक्षण करण्याचे अधिकार याबाबतच्या तरतुदी समजून घ्याव्यात.
* स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, त्यांच्या निवडणुकांबाबतच्या तरतुदी, त्याबाबतच्या चालू घडामोडी माहीत असायला हव्यात.
* स्थानिक स्वराज्य संस्थांची प्रशासकीय उतरंड, प्रत्येक स्तरावरील अधिकारी, त्याचा स्तर, नेमणुकीची पद्धत व नेमणुकीचे अधिकार, राजीनामा, बडतर्फ करण्याची पद्धत या बाबतच्या तरतुदी सारणीमध्ये टिपणे काढून तयार करता येतील.
* स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत स्थापन करण्यात आलेल्या महत्त्वाच्या समित्या आणि त्यांच्या ठळक शिफारसी यांचा आढावा घेणे आवश्यक आहे.
* नागरी स्थानिक शासनातील महानगरपालिका, नगर परिषद व घटक मंडळे यांचे स्वरूप, रचना, कार्ये, अधिकार व जबाबदाऱ्या या अनुषंगाने अभ्यास करावा. नागरी स्थानिक शासन प्रकारासाठीचे निकष समजून घ्यायला हवेत.
* चालू घडामोडी
* शासकीय योजना आणि धोरणे यांचा आढावा हासुद्धा या विषयाच्या अभ्यासातील महत्त्वाचा मुद्दा आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विशेष प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या योजनांचा अपेक्षित यादीमध्ये समावेश करावा.
* आंतरराष्ट्रीय संबंध हा या अभ्यासक्रमाचा भाग नसला तरी याबाबतच्या चालू घडामोडींचा आढावा घेणे फायदेशीर ठरते. भारताला महत्त्वाच्या संघटनांचे सदस्यत्व, आंतरराष्ट्रीय संस्थांमधील भारतीयांची नियुक्ती, संयुक्त युद्धाभ्यास, शेजारी देशांशी झालेले महत्त्वाचे करार किंवा विवाद या बाबींवर प्रश्न विचारले जाऊ शकतात.
First Published on March 6, 2019 4:04 am
Web Title: mission mpsc mpsc mantra useful tips for mpsc exam
No comments:
Post a Comment