Tuesday, June 25, 2019

एमपीएससी मंत्र : दुय्यम सेवा पूर्व परीक्षा (बुद्धिमत्ता चाचणी) एकदा या प्रश्नांसाठीची सूत्रे, युक्त्या आणि क्लृप्त्या समजल्या की त्या सरावाने लक्षात ठेवणेही सोपे होते.

एमपीएससी मंत्र : दुय्यम सेवा पूर्व परीक्षा (बुद्धिमत्ता चाचणी)

एकदा या प्रश्नांसाठीची सूत्रे, युक्त्या आणि क्लृप्त्या समजल्या की त्या सरावाने लक्षात ठेवणेही सोपे होते.

(संग्रहित छायाचित्र)


रोहिणी शहा
सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक या दुय्यम सेवांसाठीच्या पूर्व परीक्षेमध्ये बुद्धिमत्ता चाचणी हा घटक १०० पकी १५ गुणांसाठी विचारण्यात येतो. या घटकामध्ये अंकगणित, मासिके, तर्कक्षमता आणि बुद्धिमत्ता असे उपघटक विचारात घ्यावे लागतील. या उपघटकांमधील प्रश्नांचे पुन्हा खूप वेगवेगळे प्रकार आहेत.
या वैविध्यामुळे आणि काही प्रश्न सोडविण्यासाठी लागणारा वेळ पाहता हा घटक काही अंशी आव्हानात्मक वाटतो. पण यातील जास्तीत जास्त व शक्य असल्यास सगळ्याच प्रकारचे प्रश्न सोडविण्याचा सराव करत राहिल्यास आपोआप रस वाटू लागतो. एकदा या प्रश्नांसाठीची सूत्रे, युक्त्या आणि क्लृप्त्या समजल्या की त्या सरावाने लक्षात ठेवणेही सोपे होते.
मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण पाहिले तर पुढील मुद्दे लक्षात घ्यायला हवेत.
*      तर्कक्षमतेमध्ये विधानांवर आधारित निष्कर्ष पद्धती, नातेसंबंध, बठकव्यवस्था हे मुद्दे समाविष्ट होतात. प्रथमदर्शनी क्लिष्ट वाटणाऱ्या या प्रश्नांचा सराव केल्यास आणि त्यांच्यामागचे नेमके तर्क समजून घेतल्यास हेही प्रश्न वेळेच्या मर्यादेत सोडविणे शक्य होते.
*   निष्कर्ष पद्धतीमध्ये दिलेली विधाने खरी मानून ती वेन आकृत्यांमध्ये मांडून प्रश्न सोडवावेत.
*  नातेसंबंधांवरील प्रश्नांसाठी त्यातील एका पात्राच्या जागी स्वत:ला कल्पून ते प्रश्न सोडवावेत.
*  बठक व्यवस्थेचे प्रश्न सोडविताना डावी आणि उजवी बाजू कटाक्षाने लक्षात घ्यावी.
*   बुद्धिमत्ता चाचणी या घटकामध्ये आकृती मालिका, अक्षर मालिका, व्यक्तींचा क्रम, छंद, व्यवसाय यांच्या संयोजनावरील प्रश्न, सांकेतिक भाषा, इनपूट आऊटपूट या महत्त्वाच्या घटकांचा समावेश होतो. घडय़ाळ, दिनदर्शिका यांवरील प्रश्नही या विभागात समाविष्ट होतात.
* आकृती मालिकांवरील प्रश्न सोडविताना निरीक्षणशक्ती आणि विश्लेषण क्षमता यांचा वापर आवश्यक ठरतो.
* अक्षरमालिका सोडविण्यासाठी इंग्रजी वर्णमाला एकाखाली एक सरळ आणि उलटय़ा क्रमाने लिहावी आणि त्यांना त्याच क्रमाने आकडे द्यावेत. या आधारे अक्षरमालिका आणि आकृतीमधील अक्षरांचे प्रश्न सोडवावेत.
*  संयोजनावरील प्रश्न सोडविण्यासाठी दिलेली माहिती सारणीमध्ये भरत गेल्यास अचूक उत्तरापर्यंत पोचता येते.
*  सांकेतिक भाषेवरील प्रश्नांसाठी एलिमिनेशन पद्धतीने शब्द व त्यांचे संकेत शोधावेत.
*   इनपुट-आऊटपुट प्रश्नांसाठी दिलेल्या शब्द / संख्यांना क्रमांक देऊन त्यांचे क्रम कशा प्रकारे बदलत जातात त्यांचे नियम शोधावेत.
*  शेकडेवारी, व्याज, नफा तोटा, भागीदारी, गुणोत्तर प्रमाण, समीकरणे, काळ काम वेग अंतर, माहिती विश्लेषण आणि संभाव्यता हे घटक विशेष महत्त्वाचे आहेत. यामध्ये पहिले पाच घटक एकत्रितपणे अभ्यासावेत.
*  भूमितीमधील घनफळ, क्षेत्रफळ, परिमिती याबाबतची सूत्रे माहीत असणे व त्यांचा विश्लेषणात्मक वापर करता येणे आवश्यक आहे.
*   पायाभूत गणिती सूत्रे आणि १ ते ३० पर्यंत पाढे पाठ असतील तर ही गणिते कमी वेळेत आणि आत्मविश्वासाने सोडविता येतात.
*  संख्यामालिका सोडविण्यासाठी १ ते ३० पर्यंतचे पाढे, १ ते २० पर्यंतचे वर्ग आणि १ ते १५ पर्यंतचे घन पाठ असतील तर सर्वसाधारण गणिती प्रक्रिया करून हे प्रश्न सोडविण्यातही आत्मविश्वास मिळवता येतो. या मूलभूत गोष्टींबरोबर अंकाक्षर मालिकाही विचारण्यात येत आहेत.
*  नफ्याचे गुणोत्तर किंवा टक्केवारी, व्याजातील फरकाचे प्रमाण अशा प्रकारे यांच्या एकत्रित उपयोजनाचे प्रश्न विचारण्यावर आयोगाचा भर दिसतो. सूत्रे पाठ असावीतच पण हे घटक सोडविताना का आणि कसे हे नेमकेपणाने समजून घेऊन सराव केल्यास कशाही प्रकारे प्रश्न विचारला तरी नेमकी कोणती प्रक्रिया करायला हवी हे लक्षात येते.
* डेटा सफिशिएन्सीचे उपयोजन करण्यासारखे प्रश्नही विचारण्यात येतात. त्यामुळे सूत्रांचा योग्य वापर करणे आणि त्याचबरोबर नेमक्या कोणत्या बाबींचे उपयोजन आवश्यक आहे त्याची समज विकसित करणे आवश्यक आहे.
जे उमेदवार या घटकांमध्ये किमान नऊ ते अकरा प्रश्न सोडवितात ते नक्कीच चांगले गुण मिळवून उत्तीर्ण होतात हे गुणांच्या विश्लेषणवरून लक्षात येते. त्यामुळे या मुद्दय़ांचा बारकाईने अभ्यास व सराव केल्यास चांगले गुण मिळण्याची खात्री वाढते. आणि सराव, युक्त्या लक्षात ठेवणे ही असे प्रश्न सोडविण्याची गुरुकिल्ली आहे. या प्रश्नांच्या सरावासाठी चौथी व सातवी शिष्यवृत्तीची गाइड्स, आठवी, नववी, दहावीची प्रज्ञा शोध परीक्षेची गाइड्स तसेच स्पर्धा परीक्षा अंकगणित या आणि अशा वरील घटकांचा समावेश असणाऱ्या पुस्तकांचा वापर करावा.  कोणत्याही स्पर्धा परीक्षेत हा घटक वेगवेगळ्या उपघटकांच्या आधारे समाविष्ट केलेला असतो. फरक असतो तो काठीण्य पातळी आणि अनोळखी प्रश्न विचारण्याच्या प्रमाणाचा. सराव आणि केवळ सराव हाच या घटकासाठी एकमेव अभ्यास आहे हे नेहमी लक्षात ठेवावे.
First Published on March 1, 2019 1:50 am
Web Title: secondary service pre examination intelligence test

No comments:

Post a Comment