विद्यापीठ विश्व : संशोधन आणि संधी
विद्यापीठामार्फत चालणाऱ्या या सर्व अभ्यासक्रमांना सुरुवातीपासून मान्यता मिळालेली आहे.
(संग्रहित छायाचित्र)
प्रथमेश आडविलकर itsprathamesh@gmail.com
विद्यापीठाची ओळख – कॉन्रेल युनिव्हर्सिटी हे अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील एक प्रमुख खासगी संशोधन विद्यापीठ आहे. कॉन्रेल विद्यापीठ क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगनुसार जगातले चौदाव्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे. या विद्यापीठाची स्थापना एझरा कॉन्रेल आणि अँड्रय़ू डिक्सन व्हाईट या अमेरिकन उद्योगपतींनी १८६५ साली केली. एझरा कॉन्रेल यांनी म्हटल्याप्रमाणे ‘आय वूड फाउंड अॅन इन्स्टिटय़ुशन व्हेअर एनी पर्सन कॅन फाइंड इन्स्ट्रक्शन इन एनी स्टडी’ हा या विद्यापीठाचा तात्त्विक सिद्धांत आहे.
कॉन्रेल विद्यापीठ एकूण चार हजार आठशे एकरच्या कॅम्पसमध्ये पसरलेले आहे. कॉन्रेलचा मुख्य कॅम्पस न्यूयॉर्कमधील इथाका येथे आहे तर इतर दोन ‘वेल कॉन्रेल’ आणि ‘कॉन्रेल टेक’ हे कॅम्पस न्यूयॉर्क शहरामध्ये आहेत. सप्टेंबर २००४ मध्ये विद्यापीठाने कतार, दोहा येथे आपला अजून एक कॅम्पस सुरू केला आहे. या सर्व कॅम्पसमध्ये मिळून कॉन्रेलमध्ये जवळपास तीन हजारपेक्षाही अधिक प्राध्यापक-संशोधक आपले अध्यापन-संशोधनाचे कार्य करत आहेत. तसेच जवळपास पंचवीस हजारांहून अधिक पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी येथे त्यांचे शिक्षण पूर्ण करत आहेत.
अभ्यासक्रम – कॉन्रेल विद्यापीठातील पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचे असून पदव्युत्तर अभ्यासक्रम वेगवेगळ्या कालावधींचे आहेत. कॉन्रेलमधील शैक्षणिक विभाग हे वेगवेगळ्या ‘कॉलेजेस’च्या माध्यमातून विभागलेले आहेत. विद्यापीठातील कॉलेज ऑफ इंजिनीअिरग, कॉलेज ऑफ कॉम्प्युटिंग अॅण्ड इन्फॉम्रेशन सायन्स, कॉलेज ऑफ अॅग्रिकल्चर अॅण्ड लाइफ सायन्सेस, कॉलेज ऑफ आर्ट्स अॅण्ड सायन्सेस, कॉलेज ऑफ आर्किटेक्चर या प्रमुख विभागांमार्फत संस्थेतील सर्व पदवी व पदव्युत्तर विभाग चालतात. या सर्व विभागांमधून विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडी वा संशोधन पातळीवरील शेकडो अभ्यासक्रमांचे सर्टििफकेट, ऑनलाइन व ऑफलाइन पर्याय विद्यापीठाने उपलब्ध करून दिले आहेत. विद्यापीठामार्फत चालणाऱ्या या सर्व अभ्यासक्रमांना सुरुवातीपासून मान्यता मिळालेली आहे. विद्यापीठातील ऑफलाइन अभ्यासक्रम हे ऑटम, फॉल आणि स्प्रिंग या तीन सत्रांमध्ये चालतात तर ऑनलाइन अभ्यासक्रम वर्षभर उपलब्ध असतात. विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविण्यासाठी त्या त्या पदवी वा पदव्युत्तर स्तरासाठी आवश्यक असलेली प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे विद्यार्थ्यांसाठी गरजेचे आहे.
सुविधा – कॉन्रेल विद्यापीठातील शिक्षण जरी अतिशय महाग असले तरी विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्क, शैक्षणिक कर्ज, निवास व भोजन आदी सुविधा पात्रतेच्या निकषांनुसार दिलेल्या आहेत. प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून शिष्यवृत्ती दिली जाते. तसेच, विद्यार्थ्यांच्या आवश्यकतेनुसार विद्यापीठाच्या आवारात विवाहित व अविवाहित विद्यार्थ्यांना निवासाची सुविधा बहाल करण्यात येते. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर यासाठी असलेली अर्जप्रक्रिया व इतर बाबींबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. कॉन्रेल एक महत्त्वाची संस्था असल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणेतर प्रगतीची संधी प्रदान करते.
वैशिष्टय़
कॉन्रेलच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये अनेक दिग्गजांचा समावेश आहे. यामध्ये, रतन टाटा, सिटीग्रूप, गोल्डमॅन सॅक समूह इत्यादी अनेक उद्योग समूहांचे प्रमुख यांचा समावेश आहे. ऑक्टोबर २०१८ पर्यंतच्या सांख्यिकीनुसार, आतापर्यंतचे एकूण ५८ नोबेल पारितोषिक विजेते आणि चार टय़ुरिंग पुरस्कार विजेते या विद्यापीठाचे विद्यार्थी वा प्राध्यापक होते/आहेत.
संकेतस्थळ – https://www.cornell.edu/
First Published on April 2, 2019 2:27 am
Web Title: reviews of cornell university usa ranking
No comments:
Post a Comment