Thursday, December 8, 2016

वेगळय़ा वाटा : क्रीडा मानसशास्त्रज्ञ होण्यासाठी..

वेगळय़ा वाटा : क्रीडा मानसशास्त्रज्ञ होण्यासाठी..

खेळाडूची कारकीर्द चढ-उतारांची असते, त्यांचा मार्ग हा सोपा नसतोच.

   जय-पराजय हा खेळातील अविभाज्य घटक आहे. कुणीतरी जिंकण्यासाठी कुणाला तरी हरावेच लागते, हा क्रीडा क्षेत्रातील अधोरेखित नियम. पण हा पराभव पचवणे सर्वानाच जमते असे नाही. त्यासाठी खिलाडूवृत्ती असणे महत्त्वाचे असते आणि अशी सकारात्मक वृत्ती निर्माण करण्याची जबाबदारी ‘मानसशास्त्रज्ञ’ पार पाडत असतात. खेळाडूची कारकीर्द चढ-उतारांची असते, त्यांचा मार्ग हा सोपा नसतोच. या अशा खाचखळग्यातून जाताना चित्त विचलित होऊ न देता लक्ष्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी खेळाडू झटत असतात. या प्रवासात मग कधी कधी मानसिक ताण, नकारात्मक भावना निर्माण होत जाते आणि प्रतिभावंत खेळाडूही तणावाखाली लुप्त होतो. ही नकारात्मक भावना दूर ठेवण्यासाठी व्यायाम, ध्यान हे जितके महत्त्वाचे; तितकाच क्रीडा मानसशास्त्रज्ञही.. क्रीडा क्षेत्रात कारकीर्द घडवण्यासाठी उत्सुक असणाऱ्यांसाठी हा एक पर्याय उपलब्ध आहे.
क्रीडा मानसशास्त्रज्ञाची गरज कशाला?
खेळाडूला कोणत्या गोष्टी प्रेरणा देतात आणि त्यांच्या कामगिरीत कशामुळे सुधारणा होईल, याचा अभ्यास क्रीडा मानसशास्त्रज्ञ करतो. व्यावसायिकदृष्टय़ा हे क्षेत्र खूप आव्हानात्मक असते. खेळाडूंना कोणत्या आव्हानाला सामोरे जावे लागते आणि त्याचा दबाव त्यांच्यावर किती असतो, याचा अभ्यास करून त्यांना मुख्य प्रवाहात ठेवण्याचे आव्हान मानसशास्त्रज्ञ पेलत असतो. त्यामुळे दिग्गज खेळाडूही मानसशास्त्रज्ञाकडून समुपदेशन घेत असतात. तुम्हाला जर क्रीडा मानसशास्त्रात कारकीर्द घडवायची असेल, तर  मानवी
भावनांचा आणि त्यांच्या वर्तवणुकीचा अर्थ लावण्याची मनापासून आवड असायला हवी. तारतम्य, निरीक्षण करण्याची आणि त्यातून निष्कर्षांपर्यंत पोहोचण्याची चिकाटी व संयम आवश्यक आहे. क्रीडा मानसशास्त्रज्ञ खेळाडूंच्या मनोवस्थेचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून त्यांची कामगिरी उंचावण्यासाठी योग्य ती उपाययोजना करतात.


शैक्षणिक पात्रता
बारावीत मानसशास्त्र या विषयासह उत्तीर्ण झालेल्यांना पुढे बीए किंवा बीएस्सीमधून मानसशास्त्राची पदवी घेता येते. पदव्युत्तर स्तरावर मानसशास्त्र, समाजसेवा किंवा समुपदेशन यामध्ये एमए किंवा एमएस्सी करता येते. डॉक्टरेट स्तरावर पीएच.डी. किंवा एमफिल करून क्रीडा मानसशास्त्रज्ञ बनता येऊ शकते. पदव्युत्तर आणि डॉक्टरेट अभ्यासक्रमात संशोधनावर जास्त भर दिला जातो.
अभ्यासक्रम
मुंबई विद्यापीठ, कालिना. (मानसशास्त्र विभाग)-पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम (क्लिनिकल सायकॉलॉजी, कौन्सेलिंग सायकॉलॉजी, इंडस्ट्रियल सायकॉलॉजी, ऑर्गनायझेशनल सायकॉलॉजी, सोशल सायकॉलॉजी). पीएच.डी. आणि अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा कोर्स इन कौन्सेलिंग सायकॉलॉजी, अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा कोर्स इन क्लिनिकल सायकॉलॉजी, अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा कोर्स इन इंडस्ट्रियल सायकॉलॉजी.
कालावधी- एक वर्ष.
अर्हता- मानसशास्त्र विषयातील पदव्युत्तर
पदवी. संबंधित विषयात स्पेशलायझेशन असल्यास प्राधान्य मिळू शकते.

No comments:

Post a Comment