Sunday, December 25, 2016

करिअरनीती : तल्लख

करिअरनीती : तल्लख

अजिंक्यने आधीची नोकरी सोडून देऊन एका मॅनेजमेन्ट कन्सल्टन्सी कंपनीत नोकरी धरली.

  
अजिंक्यने आधीची नोकरी सोडून देऊन एका मॅनेजमेन्ट कन्सल्टन्सी कंपनीत नोकरी धरली. ही कंपनीही खूप प्रतिष्ठित होती. जगभर त्यांच्या शाखा. त्यांचं मुख्य काम म्हणजे ‘बी.पी.आर – बिझनेस प्रोसेस रीइंजिनीअरिंग’. म्हणजे थोडक्यात, कंपन्यांना त्यांच्या धंद्यात काही मूलभूत बदल सुचवायचे, ज्यामुळे त्यांच्या अडचणी किंवा उद्दिष्ट असतील ती साध्य होतील. या अडचणी किंवा उद्दिष्ट म्हणजे उत्पादन वाढवायचंय, नुकसान कमी करायचंय, नफा वाढवायचाय, जास्त ग्राहकांपर्यंत पोहचायचंय, पुढच्या पाच वर्षांचा प्लॅन बनवायचाय ..
अजिंक्यचा इथे नोकरीला लागतानाचा इंटरव्ह्य़ू झकास झाला होता. त्याला एक काल्पनिक परिस्थिती दिली होती. एक कंपनी दहा वर्ष उत्तम धंदा करत होती. पण तेव्हा त्यांना फार स्पर्धा नव्हती. नंतर अनेक कंपन्या या क्षेत्रात शिरल्या आणि गेले पाच वर्ष धंद्याची अधोगती झाली आहे, नफा कमी कमी होत चालला आहे. काय करता येईल? अजिंक्यने पटापट ३-४ पर्याय सांगितले. उत्पादनातल्या बदलांपासून ते मार्केट पेन्रिटेशन स्ट्रॅटेजीजपासून ते अगदी मर्जर- अ‍ॅक्विझिशनपर्यंत. त्याने सगळ्यांवर बऱ्यापैकी छाप पाडली. पण मग पॅनलवरची काही मंडळी खोलात शिरली. उत्पादनातले बदल नेमके कसल्या प्रकारचे, विक्रीच्या पद्धतींमधले बदल नेमके कुठले, दुसऱ्या कंपन्या विकत घ्यायच्या तर त्यासंबंधी कुठल्या गोष्टींचा विचार झाला पाहिजे.. आणि अजिंक्यकडे अनेक प्रश्नांची उत्तरं होती. प्रत्येक पर्यायाचा बारकाईनं केलेल्या विचारामुळे त्याचा गाढा अभ्यास, वाचन आणि त्याची हुशारी दिसत होती. अजिंक्यला नोकरी देण्यात कुणालाही कसलाच संदेह राहिला नव्हता.
अजिंक्यनं सुरुवात केली शास्त्री नावाच्या प्रोजेक्ट मॅनेजरबरोबर. शास्त्री अजिंक्यला सिलेक्ट केलेल्या मुलाखत मंडळावर होते. त्यांना अनेक प्रोजेक्ट यशस्वीपणे हाताळण्याचा अनेक वर्षांचा अनुभव होता. त्यानं आणि त्यांच्या टीमनं अनेक कंपन्यांना मदत केली होती. शास्त्रीनी एका फार्मा कंपनीचा कायापालट करण्याच्या प्रोजेक्टवर अजिंक्यला लावून दिलं. काही आठवडे गेले. एके दिवशी शास्त्रींना या फार्मा कंपनीच्या एका अधिका-याचा फोन आला.
“शास्त्री, तुमच्या या अजिंक्य माणसाला इथे पाठवू नका!”
“काय झालं सर?”
“भेटल्यावर बोलू या”.
‘माझ्या साईट लीडला बायपास करून क्लायंटनं मला फोन केला?’ शास्त्रीनी साईट लीडला फोन लावला.
“या अजिंक्यचा काही प्रॉब्लेम झाला का? क्लायंटचा मला फोन आला. काय झालं?”
“सर मी येऊन सांगतो सगळं. पण सध्या त्याला मी ऑफिसला पाठवलं तर चालेल का?”
“ओ.के. पण तू मला तत्काळ भेट”.
दुस-या दिवशी सकाळी अजिंक्य ऑफिसात दाखल झाला. शास्त्रींनी त्याला बघून आश्चर्य वाटल्यासारखं दाखवलं. विचारलं तू इथे कसा? त्यानं सांगितलं, माहीत नाही. साईट लीडनं आज इथे यायला सांगितलं आहे. त्याच्या एकंदर आविर्भावात काही प्रॉब्लेम झाल्याचं त्याला तरी कळलेलं नव्हतं. दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी साईट लीड शास्त्रींना भेटायला आला. “सर काय सांगू तुम्हाला, आम्ही वेगवेगळ्या पर्यायांची चर्चा करत होतो क्लायंटबरोबर. एका पर्यायावर क्लायंटच्या बाजूच्या एका वरिष्ठांनी काहीतरी सुचवलं तेव्हा अजिंक्य त्याना म्हणाला “मग तुम्ही हा सगळा खटाटोप करताच आहात कशाला. तुम्ही म्हणताय तसं करायचं झालं तर काहीच फरक पडणार नाही. जे करताय तेच करत राहा.”
शास्त्री हसले. “खरं होतं का त्याचं म्हणणं?”
“सर अगदी खरं होतं, पण ही काय बोलायची पद्धत झाली का?”
“ते खरं आहे. ठीक आहे. तुला मी दुसरा माणूस देतो”.
“सर आणि अजिंक्यचं काय?”
“त्याला दुसरं काहीतरी देऊ. मला आता तो जरा अधिक कळलाय असं वाटतंय.”
शास्त्रीनी ‘प्रपोझल्स अँड सपोर्ट’ डिपार्टमेन्टचा इनचार्ज टीजेना फोन लावला.
“टीजे, शास्त्री. तुला एक हीरा देतोय”.
“खूप हीरे आहेत माझ्याकडे. आणखीन काय देतो आहेस?”
“नाही. सिरियसली. असा हुशार माणूस शोधून मिळणार नाही”.
“काय खासियत”.
“अरे प्रचंड ब्राईट आहे. तुला आयडियाज हव्या असतात ना. छप्परफाड मिळतील”.
“बरं तू म्हणतो आहेस तर पाठवून दे”.
टीजेच्या डिपार्टमेन्टमध्ये नवी प्रपोझल्स आणि चालू प्रोजेक्ट्सना सपोर्ट असं काम होतं. टीजेनी अजिंक्यला सुरुवातीला काही सरधोपट प्रपोझल्सवर काम करायला सांगितलं, ‘काय चीज आहे ते तर पाहू’ असा विचार करत. पहिल्या ३-४ प्रपोझल्समध्ये टीजेंची स्वत:चीच विकेट गेली. फालतू म्हणवणाऱ्या प्रपोझल्समध्येही अजिंक्यच्या काही भन्नाट आणि ओरिजिनल कल्पना पाहून ते उडालेच. अजिंक्यला पहिला डोक्यावर घेतला तो सेल्सवाल्यानी. त्यांना त्याच्या कामातून कस्टमर्सवर छाप पाडण्यासाठी अनेक आयुधंच मिळाली जणू. पण त्याच्या या कल्पना केवळ काल्पनिक नव्हत्या. त्या अमलात कशा आणायच्या याचंही खोलवरचं विश्लेषण तो देत गेला होता. यानंतर पाळी होती ती चालत्या प्रोजेक्ट्समधल्या अडचणींची. त्यांचे मॅनेजर्सही अजिंक्यकडे आयडियाज आणि नवे मार्ग शोधण्यासाठी भेटू लागले. अनेकांना अजिंक्यनं रॅडिकली काहीतरी नवी दिशा दिली आणि ते खूश होऊन गेले. दोन वर्षांत अजिंक्यनं इथे आपले पाय पूर्ण रोवले. त्याला अक्षरश: मजा येत होती!
खूप म्हणजे खूपच काळानं शास्त्री त्याला वॉशरूममध्ये भेटले. म्हणाले, चल कॉफी घेऊ
“कसं चाललं आहे?”
“चांगलं चाललं आहे सर”.
“ग्रेट. प्रोजेक्टवर परत काम करायचंय?”
“तशी काही मला गरज वाटत नाही. मागं काहीतरी प्रॉब्लेम झाला होता ना माझ्यामुळं?”
“तुझी हुशारी झेपली नाही क्लायंटला”.
“म्हणजे?”
“जाऊ दे! तू इथे खूश आहेस ना? आणि इतर अनेक जणही तुझ्यावर खूश आहेत ना? बस्स झालं, म्हणत शास्त्री हलकासा डोळा मारून तिथून निघून गेले.
करिअर हा प्रचंड मोठा आवाका असणारा विषय. वर्षभर करिअरनीती या सदरातून त्याबाबत थोडय़ा वेगळ्या अंगानं लिहायचा हा प्रयत्न होता. जी कोणती करिअर निवडू त्यात यशस्वी होण्याकरिता आपल्यातल्या अनेक प्रकट आणि सुप्त गुणांचा त्यात समावेश असतो. हे गुण म्हणून आपल्याला ठाऊकही असतात, पण करिअरच्या संदर्भात काही टप्प्यांवर ते कसे कामी येतात, याची फार चर्चा होताना दिसत नाही. बहुविध क्षेत्रं, त्यात अनेक टप्प्यांवर लागणारी असंख्य माणसं. त्यामुळे प्रत्येक स्वभाव प्रकृतीच्या माणसांना करिअरमध्ये काही ना काही स्थान असतं आणि यशस्वी होण्याची संधी असते. लिहिताना हा पैलू मुख्यत: मनात होता. या विषयाचा आवाका खूप मोठा आहे. वर्षभरात त्यातल्या काही पैलूंवर लिहिणं झालं, अनेक पैलूंवर लिहायला हवं, असं ही मनात आहे. तुम्हा सर्वाचा विशेषत: तरुण वर्गाचा या सत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, माझा लिहिण्याचा हुरूप त्यातून आणखी वाढला, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार.

No comments:

Post a Comment