Friday, December 9, 2016

वेगळय़ा वाटा : क्रीडा समालोचनाची कला

वेगळय़ा वाटा : क्रीडा समालोचनाची कला

दूरचित्रवाणी किंवा आकाशवाणीसाठी समालोचनाबरोबरच टेक्स्ट कॉमेंट्री हा नवा प्रकार रूढ होतो आहे.

  

समालोचन ही वर्णन कला आहे. मैदानावर किंवा बंदिस्त वातावरणात होणाऱ्या खेळाचे बारकावे फक्त आवाजाच्या वा मजकुराच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहचवणे हे कौशल्याचे काम आहे.  हे काम सोपे वाटू शकते पण प्रत्यक्षात ते अत्यंत कठीण आहे. खेळवाहिन्या किंवा खेळविषयक संकेतस्थळांना मोठा जनाधार आहे. मैदानावर घडणाऱ्या घडामोडींचे वर्णन आणि त्या विश्लेषण अशी दुहेरी जबाबदारी समालोचकावर असते. दूरचित्रवाणी किंवा आकाशवाणीसाठी समालोचनाबरोबरच टेक्स्ट कॉमेंट्री हा नवा प्रकार रूढ होतो आहे.
खेळाडू कारकीर्दीत यशोशिखर गाठतात. त्याचप्रमाणे त्यांच्या या कामगिरीच्या यथोचित वर्णनाची जबाबदारी समालोचकाची असते. त्यामुळे खेळाडू लोकप्रिय होण्यात समालोचकाचा सिंहाचा वाटा असतो. घरी टीव्हीवर पाहणाऱ्या किंवा कामात व्यस्त असणाऱ्या, प्रवासात असणाऱ्या चाहत्यांसाठी समालोचक हा दूत असतो. स्टेडियममध्ये बसून आपणच खेळ पाहतोय अशी अनुभूती चाहत्याला देणे समालोचकाचे आद्य कर्तव्य आहे.
खेळाडूंप्रमाणे समालोचकाची वर्णनाची, शब्दभांडाराची स्वत:ची शैली असते. आवाजाचे चढउतार आणि ओघवते हुबेहूब प्रवाही वर्णन यासाठी क्रिकेट समालोचक टोनी ग्रेग यांची ख्याती होती. प्रत्येक खेळात असे दर्दी समालोचक आहेत. भारतालाही दर्जेदार क्रीडा समालोचकांचा वारसा लाभला आहे.
*   कौशल्ये
*  समालोचन करण्यासाठी विशिष्ट खेळाची प्रचंड आवड असावी लागते. ती मारून मुटकून नव्हे तर मुळातून असावी लागते. खेळाप्रति निस्सीम भावना व्हावी. खेळातल्या घडामोडींशी तादात्म्य पावणे अत्यंत आवश्यक आहे. अशी एकाग्रता खेळाच्या प्रचंड आवडीतून निर्माण होऊ शकते.
*  सातत्याने प्रवाही बोलणे हे अवघड काम आहे. खेळताना समोर घडणाऱ्या गोष्टींचे आकलन होऊन त्याचे विविधांगी आकलन होणे आणि त्याचे कंगोरे चाहत्यांपर्यंत नेणे हे आव्हानात्मक आहे. अखंडित बोलायचे असल्याने पाठ करून बोलू, काहीतरी समोर ठेवून बोलू असे होऊ शकत नाही. समालोचकाला प्रसंगावधानी असावे लागते.
*  घटना एकच असली तरी खेळाचे नियम, आकडेवारी, खेळाडूंची कारकीर्द आणि वैैयक्तिक आयुष्य, आवडीनिवडी, मैदाने आणि शहराविषयी माहिती, समोर घडणाऱ्या घटनेच्या इतिहासाचे संदर्भ हे सगळे समालोचकाला ओघवत्या शैलीत मांडायचे असते. या मांडणीत जिवंतपणा हवा. ते यांत्रिक न वाटता उत्स्फूर्त हवे. यासाठी खेळ आणि त्याच्याशी संलग्न गोष्टींचा दांडगा अभ्यास हवा. तो अभ्यास योग्य वेळी मांडता येण्यासाठी स्मरणशक्ती चोख हवी.
*  दिवसेंदिवस खेळातले नियम जटिल होत आहेत. प्रत्येक खेळात अनेकविध नवीन गोष्टी येत आहेत. तंत्रज्ञानाचा उपयोग वाढतो आहे. या बदलांची अद्ययावत माहिती समालोचकाला करून घेणे अत्यावश्यक असते.
*  स्थळकाळाचे भान ठेवून बोलणे नितांत गरजेचे असते. प्रत्येक ठिकाणाची सामाजिक परिस्थिती भिन्न असते. शहराचे, राज्याचे, देशाचे कायदेकानून आणि अलिखित संकेत पाळूनच समालोचकाने बोलावे. यासाठी सभोवातालची जाण हवी आणि कॉमन सेन्स आवश्यक.
*  समालोचकाला तटस्थ राहणे गरजेचे असते. कारण तरच तो चाहत्यांसमोर सम्यक वर्णन करू शकतो. समालोचकाला वैयक्तिक आवडनिवड बाजूला सारून काम करणे आवश्यक असते. आवडीनिवडी, पूर्वग्रह यांचा कामात अडसर येता कामा नये.
*  लोकांपर्यंत पोहचण्यासाठी वाणी स्वच्छ हवी. खेळाडूंच्या नावांचे उच्चार समजून घेणे अत्यावश्यक असते. कारण प्रसारण लाखो घरांपर्यंत जात असते. एक चूक लाखो ठिकाणी जाऊ शकते. यासाठी बोलतोय त्या विषयाबाबत अचूकता बाळगणे अनिवार्य आहे. समालोचकासाठी आवाज हेच प्रमुख अस्त्र असते. तो जपण्यासाठी आपल्या शरीरप्रकृतीनुसार योग्य ती काळजी घेणे अनिवार्य आहे. टेक्स्ट कॉमेंट्रीसाठी संगणकाचं अद्ययावत ज्ञान आणि टायपिंगचा स्पीड उत्तम असणे अनिवार्य आहे.
*  पात्रता
समालोचक होण्यासाठी विशिष्ट शाखेचा पदवीधर असावा अशी अट नाही. परंतु पत्रकारिता किंवा मास कम्युनिकेशन अभ्यासक्रम पूर्ण केलेला असल्यास उपयुक्त ठरू शकतो. फक्त समालोचन शिकवणारे अभ्यासक्रम अत्यंत मर्यादित आहेत. बहुसंख्य क्रीडा वाहिन्यांवर माजी खेळाडूंचीच समालोचक म्हणून निवड होते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय किंवा प्रथम श्रेणी पातळीवर प्रतिनिधित्व केलेले असणे समालोचक होण्यासाठी जमेची बाजू असते.
*  अभ्यासक्रम
शहीद भगतसिंग कॉलेज ऑफ मॅनेजमेंट, फरीदाबाद. एमआयटी जनसंवाद, लातूर. एमआयटी इंटरनॅशनल, पुणे.
*   मानधन
समालोचनासाठी ठोस असे मानधन नसते. मात्र क्रीडावाहिन्यांवर समालोचक म्हणून कार्यरत माजी खेळाडूंना प्रतिदिवस २५,००० ते ५०,००० मानधन मिळते. नवीन उमेदवारांना प्रतिदिवस ५,००० रुपये मानधन मिळू शकते.

No comments:

Post a Comment