Friday, December 30, 2016

वेगळय़ा वाटा : करिअरचा ‘जपानी’ मार्ग

वेगळय़ा वाटा : करिअरचा ‘जपानी’ मार्ग

भारत-जपान व्यापार संबंध यामुळे तरुणांमध्ये या भाषेबद्दलची उत्सुकता वाढली आहे.

  

 

मातृभाषेसोबतच एखादी परकीय भाषा येणे हे खूप महत्त्वाचे असते. त्याचा तुमच्या बायोडेटावर खूप चांगला परिणाम होतो. जागतिकीकरण व अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांचे मुंबईमध्ये असलेले अस्तित्व आणि भारत-जपान व्यापार संबंध यामुळे तरुणांमध्ये या भाषेबद्दलची उत्सुकता वाढली आहे. पण केवळ हौस किंवा आवड म्हणून नव्हे, तर व्यावसायिक दृष्टिकोनातूनही या भाषेचा आपल्याला उत्तम प्रकारे उपयोग करून घेता येऊ शकतो. कारण यात करिअरच्या चांगल्या संधी आहेत.
इतर भाषांच्या तुलनेत जपानी भाषा थोडी अवघड वाटली तरी सराव आणि नियमित अभ्यास याच्या जोरावर तुम्ही त्यात प्रावीण्य मिळवू शकता. जपानी भाषेच्या एकूण पाच लेव्हल्स आहेत. एन-५ ते एन-१. यातील एन-५ ही प्राथमिक लेव्हल असून एन-१ ही अ‍ॅडव्हान्स लेव्हल आहे. जपानी भाषेमध्ये हिरागाना व काताकाना या दोन प्रमुख जॅपनीज लिपी आहेत तर कांजी ही चायनीज स्क्रीप्ट आहे. या दोन्ही लिपींचा वापर करून जपानी भाषा लिहिता येते. याचे एक विशिष्ट साहित्य संस्थेतर्फे पुरविले जाते. जसे की कांजी पुस्तक व मिनानो-निहोंगो हे संपूर्ण जपानी भाषेतील पुस्तक विद्यार्थ्यांना पुरविले जाते.
ज्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी जपानला जायचे आहे, त्यांच्याकरिताही इंडो जॅपनीज असोसिएशनमध्ये अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. हा अभ्यासक्रम एकूण ५० तासांचा आहे. त्याच बरोबर १०० तासांचा ८ महिने कालावधीचा अभ्यासक्रमही आहे. यामध्ये व्याकरण, जपानी लिपी, भाषांतर या विषयांची तयारी करून घेतली जाते.
*  अभ्यासक्रम
मुंबई विद्यापीठ, कलिना परिसर येथे जपानी भाषेचे वर्ग घेतले जातात. या ठिकाणी जपानी भाषेतील पदव्युत्तर शिक्षणाची सोयही उपलब्ध आहे.त्याचप्रमाणे जपानी भाषेचे धडे इंडो जॅपनीज असोसिएशन येथे दिले जातात. भारत आणि जपान यांच्यातील सांस्कृतिक व आíथक संबंध दृढ करण्यासाठी, १९५४ साली इंडो-जॅपनीज असोसिएशनची स्थापना करण्यात आली. या ठिकाणी जपानी भाषेचे प्रशिक्षण देण्यासाठी विविध कालावधीचे वर्ग भरवले जातात. जपानी सरकारतर्फे या भाषेतील अभ्यासासाठी शिष्यवृत्तीही देण्यात येते.
* इंडो जॅपनीज असोसिएशनमध्ये घेतले जाणारे अभ्यासक्रम
*  बेसिक १ (एन ५) – कालावधी –
८ महिने यामध्ये हिरागाना व काताकानाची ओळख करून दिली जाते व त्याचबरोबर १२०कांजी लिपी शिकविल्या जातात. तसेच रोजच्या व्यवहारात बोलले जाणारे शब्द, व्याकरण, वाक्यरचना, अनुवाद व निबंध हे शिकविले जाते. त्यानंतर इंडो-जॅपनीजतर्फे प्रमाणपत्र दिले जाते.
*  बेसिक २ (एन ४) – प्राथमिक टप्पा पार केल्यानंतर बेसिक २ हा कोर्स घेतला जातो. यामध्ये वाक्यरचना व ३६० कांजी लिपी शिकविल्या जातात. या कोर्सचा कालावधीदेखील ८ महिन्यांचा असतो.
*   इंटरमिडियेट १ (एन ३) – हा कोर्स करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. यात ७५०कांजी घेतल्या जातात. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला शिक्षक म्हणून नोकरी करता येते. याचा कालावधी ८ ते ९ महिन्यांचा आहे.
*   इंटरमिडियेट २ (एन २) – हा कोर्स साधारण ८ ते ९ महिन्यात पूर्ण होतो व त्याच्यामध्ये ११००पर्यंत कांजी लिपी घेतली जाते.
*   अ‍ॅडव्हान्सड जॅपनीज (एन १)- हा कोर्स पूर्ण केल्यानंतरच तुम्हाला जपानी भाषेवर प्रभुत्व मिळवता येते.
(इतर संस्थांमधील अभ्यासक्रमही थोडय़ा अधिक प्रमाणात याच प्रकारे असतात. केवळ कालावधीमध्ये फरक होऊ शकतो.)
*    जपानी भाषेच्या ज्ञानाचे फायदे
भारत व जपान यांच्यामधील व्यापारी संबंधामुळे अस्खलित जपानी बोलता येणा-या तरुणांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. भारत व जपान यांमध्ये झालेल्या करारानंतर अनेक इंजिनीअिरग, फार्मा , बायोटेक्नालॉजी आदी क्षेत्रातील उद्योग भारतात आले आणि भविष्यातही येणार आहेत. त्यामध्ये जपानी भाषेचे ज्ञान असणाऱ्या उमेदवारांना चांगला वाव असतो आणि असेल. जपान सरकार-जपान फाऊंडेशनतर्फे आयोजित केली जाणारी एलपीटी म्हणजे जॅपनीज लँग्वेज प्रोफिशिअंसी टेस्ट उत्तीर्ण केल्यास बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये संधी उपलब्ध होतात.
याशिवाय या भाषेचे शिक्षक म्हणून, भाषांतरकार म्हणूनही संधी आहेत. तसेच दुभाषा म्हणूनही करिअरच्या उत्तम संधी आहेत. मुंबईतील जपानी दूतवास, विमानकंपन्या यामध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. तसेच जपानी टुरिस्ट गाइड म्हणूनही काम करता येऊ शकते. जपानी बँकांमध्येही चांगल्या नोकरीची संधी आहे.

करिअरमंत्र

करिअरमंत्र

गेट परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर तुम्हाला शिष्यवृत्ती मिळेल.

  
मी पर्यावरण शास्त्राची विद्यार्थिनी आहे. गेट (GATE) परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर मला या क्षेत्रात नोकरी मिळेल काय?
– अश्विनी हनमंते
गेट परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर तुम्हाला शिष्यवृत्ती मिळेल. मात्र चांगल्या नोकरीसाठी तुम्हाला प्रतिष्ठित, नामवंत संस्थेमध्ये (आयआयटी/ इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स / एनआयटी इत्यादी) मध्ये प्रवेश मिळाला तर उत्तम.
’    मी बी.ए (एमजीजे) च्या दुसऱ्या वर्षांत शिकत आहे. मला आयएएस व्हायचे आहे. घरची परिस्थिती थोडी बिकट असल्याने मी ऊस तोडण्यासाठी गेलो होतो. त्यामुळे मी फार विचलित झालो आहे. मला गणित जमत नाही. मी काय करायला पाहिजे? कोणती पुस्तके वाचायला हवी?
– सिद्धेश्वर दराडे
आयएएस होण्यासाठी संघ लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी नागरी सेवा परीक्षा तुम्हाला द्यावी लागेल. त्यासाठी किमान अर्हता ही कोणत्याही विषयातील पदवी आहे. त्यामुळे आधी पदवी परीक्षा उत्तम रीतीने उत्तीर्ण व्हा. तुम्हाला गणित जमत नसेल तरी काही हरकत नाही. प्राथमिक परीक्षेत सी-सॅट या पेपरमध्ये दहावीपर्यंतच्या गणितावर आधारित वस्तुनिष्ठ पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. तेवढय़ापुरता गणिताचा पुन्हा अभ्यास करून त्या संकल्पना नीट समजावून घ्या. तुम्ही मराठी भाषा घेऊन ही परीक्षा देऊ शकता. अभ्यासासाठी एनएसीईआरटी १२वीपर्यंतची पुस्तके नीट अभ्यासावी. मुख्य परीक्षेसाठी जो विषय निवडणार आहात त्याची पदव्युत्तर पदवीपर्यंतची पुस्तके अभ्यासा. तुम्ही ज्या विद्यापीठातून सध्या शिक्षण घेत आहात त्या विद्यापीठाने सुचवलेल्या पुस्तकांचा परिपूर्ण अभ्यास तुम्हाला उपयुक्त ठरू शकतो. बार्टी पुणे किंवा यशदा पुणे या संस्थांमध्ये नागरी सेवा परीक्षेसाठी प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता.

मी इलेक्ट्रिक इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या वर्षांला आहे. पुढच्या वर्षी एमपीएससीच्या अभियांत्रिकीच्या परीक्षेसाठी पात्र ठरू
शकतो का?
– शुभम जोशी
होय शुभम. तुम्ही पुढील वर्षी एमपीएससीची अभियांत्रिकी परीक्षा देऊ  शकता.




 

वेगळय़ा वाटा : स्पॅनिश शिकताना..

वेगळय़ा वाटा : स्पॅनिश शिकताना..

जगभरात साधारण साडेसहा हजार भाषा बोलल्या जातात. त्यातील दोन हजार भाषा बोलणारे लोक अगदी

  
जगभरात साधारण साडेसहा हजार भाषा बोलल्या जातात. त्यातील दोन हजार भाषा बोलणारे लोक अगदी कमी आहेत. म्हणजे या भाषा केवळ हजारभर लोक बोलत असावेत. उर्वरित साडेचार हजार भाषांपैकी सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या अव्वल पाच भाषा म्हणजे मँडेरिन, स्पॅनिश, इंग्रजी, हिंदी आणि अरेबिक. मँडेरिनपाठोपाठ सर्वाधिक बोलली जाणारी भाषा म्हणजे स्पॅनिश. जगातल्या तब्बल २१ देशांमध्ये ही व्यवहाराची भाषा आहे. अमेरिकेतही साधारण पाचपैकी तीन माणसांना स्पॅनिशचे ज्ञान असते.
*   स्पॅनिश का शिकावी?
कुठलीही युरोपियन भाषा येणे हे एक कौशल्य मानले जाते. चांगल्या शिक्षणासोबतच एखादी परदेशी भाषा येत असेल तर नोकरीच्या बाजारात तुमची पत वाढते. त्यातही ती भाषा २१ देशांमध्ये बोलली जाणारी स्पॅनिश असेल तर मग उत्तमच. युरोपातील आर्थिक मंदीमुळे युरोपियन भाषांसाठी वाईट दिवस आहेत, अशी एक चर्चा ऐकू येते, पण स्पॅनिश ही दक्षिण अमेरिकेतही बोलली जाते. त्यामुळे त्याविषयी काळजी करू नये. विकसनशील देशांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या विकसित देशांमधील कंपन्यांना स्थानिक भाषा आणि इंग्रजी हे दोन्ही माहिती असणाऱ्यांची नेहमीच गरज असते. त्यामुळे ही भाषा येणे हे कधीही उत्तमच.
*   स्पॅनिश कुठे शिकाल?
स्पॅनिशची लिपी रोमन आहे तसेच ती फोनेटिक भाषा आहे. त्यामुळे शिकण्यासाठी सोपी आहे. लिपी रोमन असल्यामुळे मँडेरिनसारखी नवीन लिपी शिकण्याचे अवघड आव्हान नसते. जसे बोलू तसेच स्पेलिंग किंवा लिखाण असल्यामुळे तीही बाजू सोपी असते. अर्थात शब्दसंग्रह वाढवण्यासाठी नियमित अभ्यास आणि सराव गरजेचाच असतो. युरोपियन भाषा शिकण्यासाठी सहा लेव्हल्स असतात. जर्मन, फ्रेंचप्रमाणेच स्पॅनिशसाठीही ए-१, ए-२, बी-१, बी-२ आणि सी-१, सी-२ अशा सहा लेव्हल्स असतात. स्पॅनिशसाठी फिडेस्को डीआयई आणि डेले या दोन मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय परीक्षा आहेत. दोन्ही परीक्षांसाठी संवाद, ऑडिओ आणि लेखी परीक्षा असतात. स्पॅनिश शिकवणारी अधिकृत संस्था म्हणजे इन्स्टिटय़ूटो सेव्‍‌र्हाटेस. पण ही संस्था फक्त दिल्लीस्थित आहे. मुंबई किंवा महाराष्ट्रात त्याच्या शाखा नाहीत. त्यामुळे खासगी संस्था तसंच विद्यापीठ पातळीवर ही भाषा शिकता येऊ  शकते.
*    इन्स्टिटय़ूटो सेव्‍‌र्हाटेस
संपर्क – nuevadelhi.cervantes.es/en/
०११ ४३६८१९०७
*   सेन्ट्रो एस्पानॉल
संपर्क – centroespanol15@gmail.com
९८१९८२२०४९.
*    केंब्रिज इन्स्टिटय़ूट
मुंबईतील या संस्थेमध्ये परदेशी भाषांचे शिक्षण दिले जाते. इथे स्पॅनिशचेही धडे दिले जातात.  संपर्क -०२२ ६१२७३१००.
करिअरच्या संधी
स्पॅनिश भाषेचे ज्ञान असणाऱ्यांसाठी करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. मुळात २१ पेक्षा अधिक देशांमध्ये ही भाषा बोलली जात असल्याने परदेशी नोकरीच्या संधी उपलब्ध असतात. शिक्षण, तंत्रज्ञान, व्यापार, परराष्ट्र व्यवहार तसेच सांस्कृतिक क्षेत्रात काम करणे शक्य आहे. तुम्हाला शिकवण्याची आवड असेल तर शाळा, महाविद्यालये किंवा विद्यापीठस्तरावर तुम्ही शिक्षक म्हणून काम करू शकता. याशिवाय पर्यटन क्षेत्रातही स्पॅनिश भाषेचं ज्ञान असणाऱ्यांसाठी नोकरीधंद्याच्या संधी आहेत.
वेगळ्या वाटामध्ये पुढील आठवडय़ात वाचा सौंदर्यप्रसाधन क्षेत्रांतील संधींबद्दल.
विधी शहा

देशोदेशींच्या शिष्यवृत्ती : बिझनेस स्कूलमध्ये पीएचडीची संधी

देशोदेशींच्या शिष्यवृत्ती  : बिझनेस स्कूलमध्ये पीएचडीची संधी

इंग्लंडच्या वेस्ट यॉर्कशायरमधील लीड्स शहरात वसलेले लीड्स विद्यापीठ हे युरोपमधील एक प्रमुख विद्यापीठ आहे.

लीड्स विद्यापीठाच्या बिझनेस स्कूलकडून आंतरराष्ट्रीय व्यापार या विषयाशी संबंधित विषयांवर संशोधन करण्यासाठी शिष्यवृत्ती कार्यक्रम राबवला जातो. पीएच.डी.साठी प्रवेश व एकूण तीन वर्षांच्या कालावधीकरिता शिष्यवृत्ती असे या शिष्यवृत्ती कार्यक्रमाचे स्वरूप आहे. या शिष्यवृत्तीसाठी कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवीधर अर्जदार अर्ज करू शकतो. पात्र अर्जदारांकडून या शिष्यवृत्तीसाठी दि. १ जून २०१७ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत.


*   शिष्यवृत्तीबद्दल
इंग्लंडच्या वेस्ट यॉर्कशायरमधील लीड्स शहरात वसलेले लीड्स विद्यापीठ हे युरोपमधील एक प्रमुख विद्यापीठ आहे. या विद्यापीठाचा बिझनेस स्कूल हा विभागही युरोप व जगातल्या प्रमुख बिझनेस स्कूल्सपैकी एक आहे. लीड्स बिझनेस स्कूलकडून पदवी, पदव्युत्तर व पीएच.डी. अभ्यासक्रम बहाल केले जातात. या विभागाचा एमबीएचा अभ्यासक्रम हा जगातल्या नामांकित १०० अभ्यासक्रमांपैकी एक आहे. १९९७ साली स्थापना झालेल्या या विभागामध्ये सर्व अभ्यासक्रमांचे मिळून जवळपास तीन हजार विद्यार्थी आहेत. तब्बल ऐंशीपेक्षाही जास्त वेगवेगळ्या देशांमधून आलेल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची संख्या यामध्ये जास्त आहे.
लीड्स बिझनेस स्कूलकडून दिली जाणारी ही शिष्यवृत्ती सर्व आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना खुली आहे. या शिष्यवृत्ती कार्यक्रमाचे वैशिष्टय़ म्हणजे शिष्यवृत्तीधारकास पीएच.डी. अभ्यासक्रम हा पूर्णवेळ किंवा अर्धवेळ पूर्ण करता येऊ  शकतो. पूर्णवेळ पीएच.डी. अभ्यासक्रमाचा कालावधी तीन वर्षांचा तर अर्धवेळ अभ्यासक्रमाचा पाच वर्षांचा आहे.  शिष्यवृत्तीधारकाच्या पहिल्या वर्षांतील संशोधन गुणवत्तेवर दुसऱ्या वर्षांची शिष्यवृत्ती अवलंबून असेल व हाच निकष पुढील सर्व वर्षांसाठी लागू असेल. शिष्यवृत्तीअंतर्गत शिष्यवृत्तीधारकाला विद्यापीठाचे शिक्षण शुल्क देण्यात येईल. याव्यतिरिक्त त्याला इतर कोणतीही आर्थिक मदत विद्यापीठाकडून दिली जाणार नाही.
*    आवश्यक अर्हता
लीड्स बिझनेस स्कूलच्या या शिष्यवृत्ती कार्यक्रमाअंतर्गत पीएच.डी.च्या प्रवेश व शिष्यवृत्तीसाठी कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवीधर अर्जदार अर्ज करू शकतो. अर्जदाराची पदवी व पदव्युत्तर पदवीच्या स्तरावर शैक्षणिक पाश्र्वभूमी उत्कृष्ट असावी. अर्जदाराने पदवी स्तरावर किमान द्वितीय श्रेणी व पदव्युत्तर स्तरावर प्रथम श्रेणी तरी मिळवलेली असावी. अर्जदार संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवीधर असावा व त्याने पीएच.डी.साठी इतर कुठेही अर्ज केलेला नसावा. त्याला इंग्रजी भाषेचे उत्कृष्ट ज्ञान असणे अत्यावश्यक आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या पातळीवर अर्जदाराचे तो पीएच.डी.साठी निवडणार असलेल्या विषयाशी निगडित संशोधन असावे. एखाद्या संशोधन संस्थेतील तशा संशोधनाच्या अनुभवाचे प्रशस्तीपत्र असलेले उत्तम. तसेच अर्जदाराने आयईएलटीएस किंवा टोफेलमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
*    अर्जप्रक्रिया
या शिष्यवृत्तीसाठी अर्जदाराने सर्वप्रथम लीड्स बिझनेस स्कूलच्या पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी अर्ज करावा; जेणेकरून अर्जदाराचा आयडी क्रमांक तयार होईल. आयडी क्रमांकाशिवाय पाठवलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
विद्यापीठाचा पीएच.डी. अभ्यासक्रमाच्या प्रवेश अर्ज व शिष्यवृत्ती असलेला अर्ज स्वतंत्र आहेत हे लक्षात घेऊन अर्जदाराने शिष्यवृत्तीचा अर्ज स्वतंत्रपणे भरावा.
अर्जाबरोबर अर्जदाराने त्याच्या शैक्षणिक पाश्र्वभूमीबद्दल विस्तृतपणे माहिती देणारे त्याचे एस.ओ.पी., सी.व्ही., त्याला करायच्या असलेल्या संशोधनाचा २००० शब्दांतील लघु संशोधन प्रबंध, तसेच त्याच्या शैक्षणिक पाश्र्वभूमीशी संबंधित असलेल्या दोन प्राध्यापक किंवा तज्ज्ञांची शिफारसपत्रे, आतापर्यंतच्या सर्व  शैक्षणिक ट्रान्सस्क्रिप्ट्सच्या अधिकृत प्रती, त्याचे जीआरई किंवा आयईएलटीएसचे गुणांकन, संशोधन अनुभवाचे प्रशस्तीपत्र इत्यादी गोष्टी जोडाव्यात.
*   निवडप्रक्रिया
अर्जदाराने निवड केलेल्या संशोधन विषयातील गुणवत्ता लक्षात घेऊन शिष्यवृत्तीसाठी त्याची निवड केली जाईल.
*    महत्त्वाचा  दुवा
http://business.leeds.ac.uk/
*    अंतिम मुदत
या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. १ जून २०१७  ही आहे.

Sunday, December 25, 2016

वेगळय़ा वाटा : करिअरचे चित्र रेखाटा

वेगळय़ा वाटा : करिअरचे चित्र रेखाटा

याशिवाय सध्या विविध कंपन्यांमध्ये डिझायनर्सना खूप मागणी आहे. कारण दृष्य सादरीकरणाचे महत्त्व खूप वाढले

  
तुमच्याकडे उत्तम चित्रकला असेल तर तुम्हाला त्यात उत्तम करिअरही घडवता येऊ शकते. कुठल्याही शासकीय कला महाविद्यालयातून ‘बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स’चं (बीएफए) शिक्षण घेण्यासाठी ‘एम.एच. ए एसी सीईटी’ची प्रवेशपरीक्षा द्यावी लागते. साधारणपणे एप्रिल महिन्यात त्यावर्षीच्या प्रवेशप्रक्रियेला सुरुवात होते. भारतीय नागरिक असलेला आणि एचएससी (बारावी) मध्ये ४५ टक्कय़ांपेक्षा अधिक गुण मिळवलेली कोणतीही व्यक्ती ही प्रवेशपरीक्षा देऊ  शकते. सर्व विद्यार्थ्यांच्या बारावीच्या अभ्यासक्रमामध्ये इंग्रजी विषयाचा समावेश असणे अनिवार्य आहे.
अभ्यासक्रम कुठे कराल?
*  सर जे. जे. कला महाविद्यालय, मुंबई
*  सर जे. जे. स्कूल ऑफ अप्लाइड आर्टस्
*  शासकीय कला महाविद्यालय, औरंगाबाद
*  शासकीय कला महाविद्यालय, नागपूर
*  रचना संसद कॉलेज ऑफ अप्लाइड आर्टस् अ‍ॅण्ड क्राफ्ट्स, मुंबई
*  बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाइन आर्ट्स, सावंतवाडी
*  पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ  अप्लाइड आर्टस् अ‍ॅण्ड क्राफ्टस्, नवी मुंबई
*  भारती विद्यापीठाचे कॉलेज ऑफ फाइन आर्टस्  अ‍ॅण्ड क्राफ्टस्, पुणे
या सर्व शासकीय महाविद्यालयांमध्ये प्रत्येकी ६० किंवा त्यापेक्षा अधिक सीट्स असतात. त्याशिवाय 2  रहेजा स्कूल ऑफ आर्ट्स, मुंबई
*  अभिनव कला महाविद्यालय, पुणे,
*  देवरुख कॉलेज ऑफ आर्ट अ‍ॅण्ड डिझाइन
*  यशवंत महाविद्यालय, नांदेड
या ठिकाणीही हे अभ्यासक्रम चालतात.
(http://www.eduvidya.com/Entrance-Exam/MH-AAC-CET#dates) या वेबसाइटवर या प्रवेशपरीक्षेविषयी अधिक माहिती मिळू शकेल. हा बीएफए किंवा एमएफए अभ्यासक्रम पूर्ण करून तुम्ही पेंटर म्हणून फ्रीलािन्सग करू शकता. पूर्णवेळ आर्टिस्ट म्हणून काम सुरू केल्यानंतर बरेचजण ग्रुप एक्झिबिशनमध्ये आपली कलाकृती सादर करतात. ही अनेक कलाकारांच्या करिअरची नांदी ठरू शकते. कारण आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शने पाहायला येणारा रसिकवर्ग हा मुख्यत्वे चित्रकलेच्या क्षेत्राशी विविध मार्गानी जोडलेला असतो. त्यामुळे उत्तम कामाची नोंद घेतली जाते. त्यानंतर मग कालांतराने ही मंडळी स्वतंत्र कलाकृतींचं प्रदर्शन आयोजित करतात. तारांकित हॉटेल्स, विविध क्षेत्रांतील मोठमोठय़ा कंपन्या त्यांचे आवार सुशोभित करण्यासाठी पेंटिंगचा वापर करतात. तर काही व्यक्तींना पेंटिंग कलेक्शन करण्याची आवड असते. पेंटर्सना अशा ठिकाणी अ‍ॅप्रोच होता येईल. वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांमध्ये सहभागी होणे, सोशल मीडियाचा वापर करून आपल्या कामाची प्रसिद्धी करणे, या गोष्टी आपल्या पेंटिंग करिअरच्या कक्षा रुंदावण्यासाठी मदत करतात. याशिवाय ज्यांना पेंटिंगच करायचे आहे. परंतु सोबत नोकरीही करायची आहे, अशांसाठी आर्ट टीचर डिप्लोमा, डिप्लोमा इन आर्ट एज्युकेशन, आर्ट मास्टर सर्टिफिकेट असे अभ्यासक्रम पूर्ण करून कलाशिक्षक या पदावर शाळा-महाविद्यालयांत रुजू होता येते.
याशिवाय सध्या विविध कंपन्यांमध्ये डिझायनर्सना खूप मागणी आहे. कारण दृष्य सादरीकरणाचे महत्त्व खूप वाढले आहे. प्रथमदर्शनी एखादी गोष्ट आपल्यावर दृष्यात्मक प्रभाव पाडू शकली तर, आपण ती खरेदी करायचा विचार करतो. त्यामुळे आपल्या दैनंदिन व्यवहारातल्या प्रत्येक गोष्टीचे डिझाइन कसे आहे याला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. अ‍ॅनिमेटर, ग्राफिक डिझायनर, कार्टुनिस्ट, इल्युस्ट्रेटर, कॅलिग्राफर अशी मंडळी पूर्णवेळ एका कंपनीसाठी नोकरी किंवा फ्रीलान्सिंग या दोन्ही प्रकारांत काम करू शकतात.
अहमदाबादचे नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ डिझायनिंग हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. (http://www.nift.ac.in/index.html) या संकेतस्थळावर या संस्थेविषयी तसेच डिझायनिंग क्षेत्राविषयी परिपूर्ण माहिती घेता येईल. पुण्यात एमआयटी, सिम्बॉयसिस कॉलेज, डीएसके इंटरनॅशनल स्कूल ऑफ डिझायनिंग, सृष्टी इन्स्टिटय़ूट ऑफ आर्ट, डिझाइन अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी या ठिकाणी डिझायनिंगचे प्रशिक्षण मिळेल. या ठिकाणी अ‍ॅनिमेशन फिल्म डिझाइन, सिरॅमिक अ‍ॅण्ड ग्लास डिझाइन, एक्झिबिशन डिझाइन, फिल्म अ‍ॅण्ड व्हिडीयो कम्युनिकेशन, फर्निचर डिझायनिंग, ग्राफिक डिझायनिंग, प्रोडक्ट डिझायनिंग, टेक्सटाईल डिझायनिंग हे ४ वर्षांचे ‘बॅचलर’ कोर्स उपलब्ध आहेत. याशिवायही मार्स्टस डिग्रीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आयआयटी, पवई, मुंबई येथेसुद्धा डिझायनिंगचे प्रशिक्षण घेता येते. पीएच.डी. करता येते. वरीलपैकी काही महाविद्यालयांची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली असून बाकीच्या महाविद्यालयांची प्रवेशपरीक्षा जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्या त्या कॉलेजांच्या संकेतस्थळांवर त्याविषयी माहिती मिळेल. डिझायनर्सना जाहिरात एजन्सीज, डिझायनिंग कंपन्या, अ‍ॅनिमेशन स्टुडिओज, निर्मिती संस्था आदी ठिकाणी नोकरीची संधी मिळू शकते. अनेक कॉर्पोरेट कंपन्याही इनहाऊस डिझायनर नेमतात. डिझायनिंग कॉलेजमधून कॅम्पस प्लेसमेंटच्या आधारेसुद्धा नोकरी मिळू शकते. वर्षांला ३ लाखांपासून १० लाखांपर्यंतची पॅकेज मिळू शकतात. चित्रकलेच्या क्षेत्रात करिअर करायचे, असे म्हटल्यानंतर निर्माण होणाऱ्या प्रश्नचिन्हाला ‘डिझायनिंग’ हे खणखणीत उत्तर आहे.
चित्रकार आणि डिझायनर्स यांना कॉलेजपासूनच त्यांचा पोर्टफोलिओ सादर करावा लागतो. आकर्षक पोर्टफोलियो तयार करणे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण पोर्टफोलिओद्वारे आपले काम आपण कसे सादर करतो त्यावर ते काम आपल्याला मिळणार की नाही हे अवलंबून असते. पोर्टफोलिओ आपल्या कलेचे योग्य प्रतिनिधित्व करणारा असावा. तो विश्वासार्ह वाटायला हवा. अतिरंजीत नसावा. सतत तो अद्ययावत करत राहणे, गरजेचे आहे.

करिअरनीती : तल्लख

करिअरनीती : तल्लख

अजिंक्यने आधीची नोकरी सोडून देऊन एका मॅनेजमेन्ट कन्सल्टन्सी कंपनीत नोकरी धरली.

  
अजिंक्यने आधीची नोकरी सोडून देऊन एका मॅनेजमेन्ट कन्सल्टन्सी कंपनीत नोकरी धरली. ही कंपनीही खूप प्रतिष्ठित होती. जगभर त्यांच्या शाखा. त्यांचं मुख्य काम म्हणजे ‘बी.पी.आर – बिझनेस प्रोसेस रीइंजिनीअरिंग’. म्हणजे थोडक्यात, कंपन्यांना त्यांच्या धंद्यात काही मूलभूत बदल सुचवायचे, ज्यामुळे त्यांच्या अडचणी किंवा उद्दिष्ट असतील ती साध्य होतील. या अडचणी किंवा उद्दिष्ट म्हणजे उत्पादन वाढवायचंय, नुकसान कमी करायचंय, नफा वाढवायचाय, जास्त ग्राहकांपर्यंत पोहचायचंय, पुढच्या पाच वर्षांचा प्लॅन बनवायचाय ..
अजिंक्यचा इथे नोकरीला लागतानाचा इंटरव्ह्य़ू झकास झाला होता. त्याला एक काल्पनिक परिस्थिती दिली होती. एक कंपनी दहा वर्ष उत्तम धंदा करत होती. पण तेव्हा त्यांना फार स्पर्धा नव्हती. नंतर अनेक कंपन्या या क्षेत्रात शिरल्या आणि गेले पाच वर्ष धंद्याची अधोगती झाली आहे, नफा कमी कमी होत चालला आहे. काय करता येईल? अजिंक्यने पटापट ३-४ पर्याय सांगितले. उत्पादनातल्या बदलांपासून ते मार्केट पेन्रिटेशन स्ट्रॅटेजीजपासून ते अगदी मर्जर- अ‍ॅक्विझिशनपर्यंत. त्याने सगळ्यांवर बऱ्यापैकी छाप पाडली. पण मग पॅनलवरची काही मंडळी खोलात शिरली. उत्पादनातले बदल नेमके कसल्या प्रकारचे, विक्रीच्या पद्धतींमधले बदल नेमके कुठले, दुसऱ्या कंपन्या विकत घ्यायच्या तर त्यासंबंधी कुठल्या गोष्टींचा विचार झाला पाहिजे.. आणि अजिंक्यकडे अनेक प्रश्नांची उत्तरं होती. प्रत्येक पर्यायाचा बारकाईनं केलेल्या विचारामुळे त्याचा गाढा अभ्यास, वाचन आणि त्याची हुशारी दिसत होती. अजिंक्यला नोकरी देण्यात कुणालाही कसलाच संदेह राहिला नव्हता.
अजिंक्यनं सुरुवात केली शास्त्री नावाच्या प्रोजेक्ट मॅनेजरबरोबर. शास्त्री अजिंक्यला सिलेक्ट केलेल्या मुलाखत मंडळावर होते. त्यांना अनेक प्रोजेक्ट यशस्वीपणे हाताळण्याचा अनेक वर्षांचा अनुभव होता. त्यानं आणि त्यांच्या टीमनं अनेक कंपन्यांना मदत केली होती. शास्त्रीनी एका फार्मा कंपनीचा कायापालट करण्याच्या प्रोजेक्टवर अजिंक्यला लावून दिलं. काही आठवडे गेले. एके दिवशी शास्त्रींना या फार्मा कंपनीच्या एका अधिका-याचा फोन आला.
“शास्त्री, तुमच्या या अजिंक्य माणसाला इथे पाठवू नका!”
“काय झालं सर?”
“भेटल्यावर बोलू या”.
‘माझ्या साईट लीडला बायपास करून क्लायंटनं मला फोन केला?’ शास्त्रीनी साईट लीडला फोन लावला.
“या अजिंक्यचा काही प्रॉब्लेम झाला का? क्लायंटचा मला फोन आला. काय झालं?”
“सर मी येऊन सांगतो सगळं. पण सध्या त्याला मी ऑफिसला पाठवलं तर चालेल का?”
“ओ.के. पण तू मला तत्काळ भेट”.
दुस-या दिवशी सकाळी अजिंक्य ऑफिसात दाखल झाला. शास्त्रींनी त्याला बघून आश्चर्य वाटल्यासारखं दाखवलं. विचारलं तू इथे कसा? त्यानं सांगितलं, माहीत नाही. साईट लीडनं आज इथे यायला सांगितलं आहे. त्याच्या एकंदर आविर्भावात काही प्रॉब्लेम झाल्याचं त्याला तरी कळलेलं नव्हतं. दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी साईट लीड शास्त्रींना भेटायला आला. “सर काय सांगू तुम्हाला, आम्ही वेगवेगळ्या पर्यायांची चर्चा करत होतो क्लायंटबरोबर. एका पर्यायावर क्लायंटच्या बाजूच्या एका वरिष्ठांनी काहीतरी सुचवलं तेव्हा अजिंक्य त्याना म्हणाला “मग तुम्ही हा सगळा खटाटोप करताच आहात कशाला. तुम्ही म्हणताय तसं करायचं झालं तर काहीच फरक पडणार नाही. जे करताय तेच करत राहा.”
शास्त्री हसले. “खरं होतं का त्याचं म्हणणं?”
“सर अगदी खरं होतं, पण ही काय बोलायची पद्धत झाली का?”
“ते खरं आहे. ठीक आहे. तुला मी दुसरा माणूस देतो”.
“सर आणि अजिंक्यचं काय?”
“त्याला दुसरं काहीतरी देऊ. मला आता तो जरा अधिक कळलाय असं वाटतंय.”
शास्त्रीनी ‘प्रपोझल्स अँड सपोर्ट’ डिपार्टमेन्टचा इनचार्ज टीजेना फोन लावला.
“टीजे, शास्त्री. तुला एक हीरा देतोय”.
“खूप हीरे आहेत माझ्याकडे. आणखीन काय देतो आहेस?”
“नाही. सिरियसली. असा हुशार माणूस शोधून मिळणार नाही”.
“काय खासियत”.
“अरे प्रचंड ब्राईट आहे. तुला आयडियाज हव्या असतात ना. छप्परफाड मिळतील”.
“बरं तू म्हणतो आहेस तर पाठवून दे”.
टीजेच्या डिपार्टमेन्टमध्ये नवी प्रपोझल्स आणि चालू प्रोजेक्ट्सना सपोर्ट असं काम होतं. टीजेनी अजिंक्यला सुरुवातीला काही सरधोपट प्रपोझल्सवर काम करायला सांगितलं, ‘काय चीज आहे ते तर पाहू’ असा विचार करत. पहिल्या ३-४ प्रपोझल्समध्ये टीजेंची स्वत:चीच विकेट गेली. फालतू म्हणवणाऱ्या प्रपोझल्समध्येही अजिंक्यच्या काही भन्नाट आणि ओरिजिनल कल्पना पाहून ते उडालेच. अजिंक्यला पहिला डोक्यावर घेतला तो सेल्सवाल्यानी. त्यांना त्याच्या कामातून कस्टमर्सवर छाप पाडण्यासाठी अनेक आयुधंच मिळाली जणू. पण त्याच्या या कल्पना केवळ काल्पनिक नव्हत्या. त्या अमलात कशा आणायच्या याचंही खोलवरचं विश्लेषण तो देत गेला होता. यानंतर पाळी होती ती चालत्या प्रोजेक्ट्समधल्या अडचणींची. त्यांचे मॅनेजर्सही अजिंक्यकडे आयडियाज आणि नवे मार्ग शोधण्यासाठी भेटू लागले. अनेकांना अजिंक्यनं रॅडिकली काहीतरी नवी दिशा दिली आणि ते खूश होऊन गेले. दोन वर्षांत अजिंक्यनं इथे आपले पाय पूर्ण रोवले. त्याला अक्षरश: मजा येत होती!
खूप म्हणजे खूपच काळानं शास्त्री त्याला वॉशरूममध्ये भेटले. म्हणाले, चल कॉफी घेऊ
“कसं चाललं आहे?”
“चांगलं चाललं आहे सर”.
“ग्रेट. प्रोजेक्टवर परत काम करायचंय?”
“तशी काही मला गरज वाटत नाही. मागं काहीतरी प्रॉब्लेम झाला होता ना माझ्यामुळं?”
“तुझी हुशारी झेपली नाही क्लायंटला”.
“म्हणजे?”
“जाऊ दे! तू इथे खूश आहेस ना? आणि इतर अनेक जणही तुझ्यावर खूश आहेत ना? बस्स झालं, म्हणत शास्त्री हलकासा डोळा मारून तिथून निघून गेले.
करिअर हा प्रचंड मोठा आवाका असणारा विषय. वर्षभर करिअरनीती या सदरातून त्याबाबत थोडय़ा वेगळ्या अंगानं लिहायचा हा प्रयत्न होता. जी कोणती करिअर निवडू त्यात यशस्वी होण्याकरिता आपल्यातल्या अनेक प्रकट आणि सुप्त गुणांचा त्यात समावेश असतो. हे गुण म्हणून आपल्याला ठाऊकही असतात, पण करिअरच्या संदर्भात काही टप्प्यांवर ते कसे कामी येतात, याची फार चर्चा होताना दिसत नाही. बहुविध क्षेत्रं, त्यात अनेक टप्प्यांवर लागणारी असंख्य माणसं. त्यामुळे प्रत्येक स्वभाव प्रकृतीच्या माणसांना करिअरमध्ये काही ना काही स्थान असतं आणि यशस्वी होण्याची संधी असते. लिहिताना हा पैलू मुख्यत: मनात होता. या विषयाचा आवाका खूप मोठा आहे. वर्षभरात त्यातल्या काही पैलूंवर लिहिणं झालं, अनेक पैलूंवर लिहायला हवं, असं ही मनात आहे. तुम्हा सर्वाचा विशेषत: तरुण वर्गाचा या सत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, माझा लिहिण्याचा हुरूप त्यातून आणखी वाढला, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार.

Friday, December 23, 2016

वेगळय़ा वाटा : नृत्यातील संधी

वेगळय़ा वाटा : नृत्यातील संधी

झेलम परांजपे यांच्या ‘स्मितालय’ या संस्थेत ओडिसी नृत्यप्रकार शिकवला जातो.

नृत्याचे अनेक प्रकार आहेत आणि त्यात करिअरच्या अनेक संधीही. कथ्थक, भरतनाटय़म, कुचिपुडी, ओडिसी, मणिपुरी असे शास्त्रीय तर रुंबा, बॅले,  टँगो, साल्सा असे काही पाश्चात्त्य नृत्यप्रकार आहेत. सोबतच सध्या चलती आहे, बॉलिवूड किंवा कंटेम्पररी नृत्यप्रकाराची.
*   शिक्षणाच्या संधी
शास्त्रीय नृत्यप्रकारांचे शिक्षण घेण्यासाठी तुम्ही अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाशी (http://abgmvm.org/courses-and-examination/) संलग्न अशा कुठल्याही संस्थेतून तुम्ही नृत्याचे शिक्षण घेऊ  शकता आणि अशा केंद्रावर परीक्षाही देऊ  शकता. महाराष्ट्रात या संस्थेची अनेक केंद्रे आहेत. कनक रेळे यांच्या ‘नालंदा डान्स रिसर्च सेंटर’ या मुंबईतील संस्थेत नृत्य या विषयात बॅचलर, मास्टर्स आणि पीएचडीपर्यंतचे शिक्षण घेता येते. डॉ. संध्या पुरेचा यांची मुंबईतील ‘भरत कॉलेज ऑफ फाइन आर्ट्स अँड कल्चर’ या संस्थेत भरतनाटय़म, कथ्थक या नृत्यप्रकारांचे वर्ग घेतले जातात. झेलम परांजपे यांच्या ‘स्मितालय’ या संस्थेत ओडिसी नृत्यप्रकार शिकवला जातो. भारती विद्यापीठ, पुणे, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे यांचे नियमित आणि दूरस्थ नृत्य अभ्यासक्रम आहेत. पुण्यातील ललित कला केंद्रातही गुरुकुल पद्धतीने नृत्याचे शिक्षण दिले जाते. खैरागडमधील इंदिरा कला संगीत विश्वविद्यालय, दिल्लीचे कथ्थक केंद्र, चेन्नईचे कलाक्षेत्र, इंदोर येथील देवी अहिल्या विश्वविद्यालय या वेगवेगळे नृत्यप्रकार शिकवणाऱ्या नामांकित संस्था आहेत. पंडित बिरजू महाराज यांची कथ्थकचे शिक्षण देणारी ‘कलाश्रम’ ही संस्थाही दिल्ली आणि महाराष्ट्रातील काही भागांत नृत्यप्रशिक्षण देत आहे.
मुंबई विद्यापीठामध्ये लोकनृत्याचेही प्रशिक्षण दिले जाते. संदीप सोपारकर, सरोज खान यांच्या अकॅडमीमध्ये पाश्चात्त्य आणि कंटेम्पररी नृत्याचं शिक्षण दिलं जातं. त्याशिवाय संपूर्ण महाराष्ट्रात अनेक गुरू वैयक्तिक मार्गदर्शन करत असतात.  हिंदी सिनेमांच्या गाण्यांवर कंटेम्पररी डान्स शिकवणारी अनेक मंडळी आपल्या आजूबाजूला असतात. त्यामुळे हा नृत्यप्रकार शिकायचा असल्यास प्रवेश घेण्यापूर्वी नीट चौकशी करावी.  आता बऱ्याच ठिकाणी ‘ऑनलाइन डान्स क्लास’सुद्धा घेतले जातात, मात्र गुरुकडून प्रत्यक्ष शिकणे, कधीही उत्तमच.
*   शिष्यवृत्ती
भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयातर्फे दोन वर्षांच्या कालावधीसाठी १८ ते २५ या वयोगटांतील विद्यार्थ्यांना दरमहा रुपये ५,०००/- इतकी शिष्यवृत्ती दिली जाते. विद्यार्थ्यांचे कमीत कमी पाच वर्षे नृत्याचे शिक्षण झालेले असावे. मुलाखत किंवा प्रत्यक्ष सादरीकरण या स्वरूपात विद्यार्थ्यांची चाचणी घेतली जाते. भरतनाटय़म, कथ्थक, कुचिपुडी, कथकली, मोहिनीअट्टम, ओडिसी तसेच मणिपुरी नृत्य / संगीत, थंग ता, गौडीया नृत्य, छाऊ  नृत्य / संगीत, सत्तरीय नृत्य या नृत्यप्रकारांसाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते.
*   संधी कोणत्या?
नृत्यसंबंधी इतर विषयात करिअर करायचे असल्यास काही पर्याय उपलब्ध आहेत. ‘ट्रिनिटी कॉलेज ऑफ लंडन’ (http://www. trinitycollege.com/site/?id=1585) यांच्यातर्फे ‘डिप्लोमा इन डान्स टीचिंग अँड लर्निग’ व ‘एटीसीएल (कंटेम्पररी डान्स)’ हे दोन अभ्यासक्रम घेतले जातात. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक या चार केंद्रांवर या परीक्षा देता येतात. त्याच प्रमाणे नर्तकांना ‘आर्ट बेस थेरपी’साठीही विविध संस्थांमध्ये काम करता येऊ शकतं. तुम्हाला जर विविध नृत्यशैली येत असतील तर करिअरच्या संधी नक्कीच वाढतात. (http://www.narthaki. com/ index. html ) या संकेतस्थळावर महाराष्ट्रातल्या भरतनाटय़म, कथ्थक, कंटेम्पररी, मणिपुरी, ओडिसी या नृत्यप्रकार शिकवणाऱ्या संस्था, गुरू आणि नृत्य महोत्सव यांची माहिती मिळू शकेल.  शास्त्रीय नृत्याचे शिक्षण घेणारे विद्यार्थी विविध महोत्सवांमध्ये, मनोरंजनाच्या कार्यक्रमात, पुरस्कार सोहळ्यांत आपली कला सादर करू शकतात. सिनेमा, नाटक यासाठी नृत्यदिग्दर्शन करण्याची संधीही मिळू शकते. हल्ली लग्नामध्ये संगीताचा कार्यक्रम करण्याची लाट आलेली आहे. त्यासाठी तसेच अनेक शाळांतील स्नेहसंमेलनासाठीही नृत्यदिग्दर्शक नेमले जातात. तिथेही करिअर करता येते.
यासोबतच डान्स थेरपीस्ट म्हणूनही करिअरच्या उत्तम संधी आहेत. परंतु यासाठी मानसशास्त्र विषयातील शिक्षणाची जोड हवी. लिखाणाची आवड असेल तर माध्यमांमध्ये नृत्याविषयी
लिखाण किंवा नृत्य समीक्षक म्हणूनही काम करता येते. नृत्य निर्मिती संस्था हासुद्धा एक चांगला पर्याय आहे. या संस्था नर्तकांचे कपडे, त्यांच्यासाठी माध्यमांशी संपर्क साधणे, प्रसिद्धीप्रमुख, नृत्याच्या कार्यक्रमांसाठी कल्पना लढवणे, त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी लागेल त्या सर्व गोष्टी करणे या आणि अशा अनेक गोष्टी करत असतात. या संस्थात काम करता येते किंवा स्वतची संस्थाही काढता येऊ शकते.

Wednesday, December 21, 2016

वेगळय़ा वाटा : संगीतमय संधी

वेगळय़ा वाटा : संगीतमय संधी

हजारो वर्षांपासून भारतात रुजलेल्या 'संगीत' या कलेचा कालपरत्वे विस्तार होत गेला.

  

 

हजारो वर्षांपासून भारतात रुजलेल्या ‘संगीत’ या कलेचा कालपरत्वे विस्तार होत गेला. नवनवीन संगीतप्रकार उदयाला आले, सादरीकरणाच्या पद्धतीत अनेक बदल होत गेले. जिथे संगीताचा वापर होतो अशी वेगवेगळी माध्यमे, व्यासपीठे निर्माण झाली आणि अनुषंगाने संगीतात करिअर करण्याची विविध दालने खुली झाली.


*   सादरकर्ते –
गायक, वादक, संगीतकार, संगीत संयोजक म्हणून काम करणे हे ‘परफॉर्मिग आर्ट्स’ या प्रकारात मोडणारे करिअरचे पर्याय आहेत. मनुष्याच्या गळ्यातला ‘स्वर’ ही नैसर्गिक देणगी आहे. सांगीतिक भाषेत सांगायचे झाले तर कदाचित एखादा माणूस रूढार्थाने ‘सुरेल’ नसेल परंतु ‘त्याच्या परीने’ गाणे त्याला सहज शक्य असते आणि म्हणूनच ‘आपणही गाण्यात करिअर करू शकतो’ असे वाटणाऱ्यांची संख्या बरीच असते. त्यामुळे या क्षेत्रात करिअर करण्यासाठी आपली क्षमता अतिशय तटस्थ राहून ओळखायला हवी. त्यानंतर हे पॅशन कायम असेच टिकेल का, याचा विचार झाला पाहिजे.
शास्त्रीय संगीत शिकवणारी आणि परीक्षा घेणारी गांधर्व महाविद्यालयाची ३८४ केंद्रे महाराष्ट्रात कार्यरत आहेत. दरवर्षी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या मुख्य केंद्रांवर विद्यार्थी परीक्षा देऊ  शकतात आणि महाराष्ट्रात इतर ठिकाणी वेगवेगळ्या गुरूंकडून शिक्षण घेऊन या संस्थेच्या तेथील केंद्रांवर परीक्षा देऊ  शकतात. मुंबई विद्यापीठ, ललित कला केंद्र, पुणे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांसारख्या विद्यापीठांमध्ये शास्त्रीय संगीत शिकवले जाते. ट्रिनिटी कॉलेज, लंडन यांच्या १०० शाखा भारतात आहेत. त्यापैकी मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक महाराष्ट्रातील ४ केंद्रांवर पाश्चात्त्य संगीत शिकता येईल. तसेच शास्त्रीय संगीत, सुगम संगीत आणि पाश्चात्त्य संगीताच्या क्षेत्रातील ज्येष्ठ गायक इच्छुकांना वैयक्तिक मार्गदर्शन करतात. त्याचप्रमाणे ऑनलाइन प्रशिक्षण घेण्याचाही पर्याय आता उपलब्ध आहे. गायन किंवा वादन शिकण्यासाठी योग्य गुरूची निवड करणे अतिशय महत्त्वाचे आहे.
‘संगीतकार’ आणि ‘संगीत संयोजक’ यांच्यातला फरक सांगताना ज्येष्ठ संगीत संयोजक आप्पा वढावकर म्हणाले होते की, ‘संगीतकार’ हा जणू घर बांधतो आणि ‘संगीत संयोजक’ हा इंटेरियर डेकोरेटर असतो. त्याप्रमाणे संगीतकार गाण्याची चाल बांधतो आणि संगीत संयोजक गाण्याला साज चढवतो. त्यामुळे याबाबत आपली समज, कल आणि आपली क्षमता ओळखून त्याबद्दल अधिक शिक्षण घ्यावे. संगीतकार आणि संगीत संयोजक यांना हार्मोनियम वाजवता येत असल्यास उत्तम. मुंबई विद्यापीठ, ट्र स्कूल ऑफ म्यूझिक या ठिकाणी संगीत रचनेचे लहान अभ्यासक्रम घेतले जातात. वेगवेगळ्या प्रकारचे संगीत  ऐकणे, वेगवेगळे साउंड्स तयार करणे याबरोबरच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठल्या गीताला कुठल्या प्रकारची चाल लावली पाहिजे याची समज संगीतकाराला असणे आवश्यक आहे.
भारत सरकार संस्कृती मंत्रालय, ITC SRA, CCRT,, नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिग आर्ट्स (एनसीपीए) अशा संस्थांतर्फे संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. मुंबईतील ‘एनसीपीए’तर्फे दर महिन्याला ‘उमंग’ या कार्यक्रमाअंतर्गत शास्त्रीय संगीत क्षेत्रातील दोन नवोदित गायक आणि वादकांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. रसिकांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य असतो. तसेच विविध संस्थांतर्फे सादर केले जाणारे कार्यक्रम किंवा चित्रपट, नाटक, जाहिराती यांसाठी गायक, वादक, संगीतकार, संगीत संयोजक यांना फ्रीलान्सिंग करता येते. संगीताविषयीचे रिअ‍ॅलिटी शो गायकांना घरोघरी पोहोचवतात. शाळा, महाविद्यालये, संस्था या ठिकाणी ‘संगीत शिक्षक’ या पदावरही काम करता येते.
*  आयोजक, व्यवस्थापक –
संगीताच्या क्षेत्रात ‘प्रोग्रॅम ऑर्गनायझर्स’ म्हणूनही काम करता येऊ शकते. नवनवीन संकल्पनांवर आधारित कार्यक्रम सादर करणे, आयोजक हा स्वत: प्रायोजक नसेल तर कार्यक्रमासाठी प्रायोजक शोधणे, गायक आणि वादकांचा चमू तयार करणे, कार्यक्रम स्थळी आवश्यक अशा परवानग्या घेणे अशी अनेक कामे आयोजकाच्या भूमिकेशी जोडलेली आहेत. त्याचप्रमाणे बरेच गायक, संगीतकार आपल्या कामांचे व्यवस्थापन करण्यासाठी व्यवस्थापक नेमतात. कलाकारांच्या मीटिंग्स, कॉल्स, मेल्स याचे व्यवस्थापन करणे आणि आयोजक व तो कलाकार यांच्यातला दुवा होणे ही दोन मुख्य कामे व्यवस्थापकांना पार पाडावी लागतात. वक्तशीरपणा, उत्तम नियोजनक्षमता आणि स्मार्टनेस अशा काही वैयक्तिक क्षमतांच्या जोरावर ‘आयोजक’ किंवा ‘व्यवस्थापक’ म्हणून करिअर करता येते. त्याला ‘इव्हेंट मॅनेजमेंट’च्या शिक्षणाची जोड मिळाल्यास अधिक मदत होईल. कलाकारांना सोशल मीडिया, संकेतस्थळे यांचा योग्य तो उपयोग करून आपली कला लोकांपर्यंत पोहोचवता येते. या स्पर्धेच्या युगात ‘फ्री-लान्सर’ म्हणून काम करताना सर्वानाच पी.आर. – मार्केटिंग करणे, संपर्क प्रस्थापित करणे, नवे बदल स्वीकारणे त्याप्रमाणे स्वतला बदलणे या गोष्टी अनिवार्य आहेत. पण हे करत असताना ज्याच्या जिवावर कलाकार मान आणि धन कमावतो त्या ‘रियाजा’कडे दुर्लक्ष होता कामा नये. कारण सिर सलामत तो पगडी पचास!

यूपीएससीची तयारी : आंतरराष्ट्रीय संघटना

यूपीएससीची तयारी : आंतरराष्ट्रीय संघटना

मुख्य परीक्षेच्या सामान्य अध्ययन पेपर-२ मधील आंतरराष्ट्रीय संघटना या अभ्यासघटकाविषयी जाणून घेऊयात.

  
प्रस्तुत लेखामध्ये यूपीएससी मुख्य परीक्षेच्या सामान्य अध्ययन पेपर-२ मधील आंतरराष्ट्रीय संघटना या अभ्यासघटकाविषयी जाणून घेऊयात. सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय संघटना म्हणजे काय? त्याचे स्वरूप, उद्दिष्टे याविषयी चर्चा करणे इष्ट ठरेल. आपल्या गरजा, सामूहिक हितसंबंध व उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी लोकांचा गट एकत्र येऊन संघटना बनवतो. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले हितसंबंध व उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संघटनेच्या रूपामध्ये राष्ट्रे संघटित होतात. आंतरराष्ट्रीय स्तरावरील बहुतांश संघटना १९व्या शतकामध्ये उदयास आल्या व २० शतकामध्ये त्यांचा विकास झालेला दिसून येतो. २१व्या शतकाच्या प्रारंभी राष्ट्र राज्ये व अशासकीय घटकांबरोबरच आंतरराष्ट्रीय संघटना आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा अत्यावश्यक भाग बनल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय संघटना राष्ट्रांमधील सामाजिक, आíथक, राजकीय व सुरक्षाविषयक सहकार्य सुकर करण्याचे कार्य पार पाडतात. युद्धे टाळून शांतता व सुव्यवस्था राखण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील संघटनांमध्ये खासगी व सार्वजनिक, वैश्विक व प्रादेशिक, बहुउद्देशीय व विशेषिकृत अशा सविस्तर संरचना दिसून येतात. सामान्य अध्ययन पेपर-२ साठी संयुक्त राष्ट्रसंघ व त्याच्याशी संबंधित इतर संस्था यामध्ये युनिसेफ, युनेस्को, यूएनईपी, जागतिक आरोग्य संघटना या व या प्रकारची इतर अभिकरणे, जागतिक व्यापार संघटना, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक, एशियन डेव्हलपमेंट बँक, आसियान, युरोपीयन संघ, ओईसीडी, ओपेक, अ‍ॅपेक, अरब लीग इ. संघटनांचे अध्ययन महत्त्वपूर्ण ठरतात. त्यांचे अध्ययन करताना त्यांची संरचना, अधिदेश (Mandate) या बाबी लक्षात घेणे महत्त्वपूर्ण ठरेल. तसेच आंतरराष्ट्रीय संघटनांचा अभ्यास चालू घडामोडींच्या अनुषंगाने करणे सयुक्तिकठरेल. बऱ्याचदा परीक्षेमध्ये संघटनेशी संबंधित एखादी बाब चच्रेत असल्यास त्यावर प्रश्न विचारला जातो. उदा. २०१६च्या मुख्य परीक्षेमध्ये युनेस्कोशी संबंधित मॅकब्राइड (McBride) आयोगावर तसेच जागतिक व्यापार संघटनेची दोहा फेरी विकसित व विकसनशील राष्ट्रांच्या मतभेदांच्या पाश्र्वभूमीवर फोल ठरत असल्याचे दिसत आहे, यावर भारताच्या दृष्टिकोनातून चर्चा करा असे प्रश्न विचारले आहेत. याबरोबरच, संयुक्त राष्ट्र संघ सुधारणा, ब्रेक्झिट इ. समकालीन मुद्दय़ांच्या पाश्र्वभूमीवर संबंधित संघटनेचे अध्ययन करणे महत्त्वपूर्ण ठरते.
यूपीएससीने मुख्य परीक्षेमध्ये आंतरराष्ट्रीय संघटना या घटकावर विचारलेल्या प्रश्नांपकी काही प्रश्नांचा आपण ऊहापोह करूयात.
२०१३च्या मुख्य परीक्षेमध्ये ‘जागतिक बँक व आंतरराष्ट्रीय नाणेनिधी एकत्रितपणे ब्रेटनवुडस संस्था म्हणून ओळखल्या जातात; जे जागतिक आíथक व वित्तीय सुव्यवस्थेच्या संरचनेला साहाय्यभूत ठरणारे दोन आंतरसरकारी स्तंभ आहेत. वरकरणी जागतिक बँक आणि नाणेनिधी कित्येक समान वैशिष्टय़े दर्शवितात. तरीही त्यांची भूमिका व अधिदेश (Mandate)) स्पष्टपणे वेगळे आहेत, विशद करा.’ जागतिक बँक व आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मूलभूत संरचना, ते पार पाडत असलेल्या भूमिका कशा प्रकारे वेगळ्या आहेत असे या प्रश्नाचे स्वरूप आहे. या दोन्ही संस्था करारांतर्गत स्थापन करण्यात आल्या असल्या तरी उद्दिष्टे, रचना, काय्रे याबाबतीत त्यांच्यामध्ये फरक दिसून येतो. आंतरराष्ट्रीय चलन आणि विनिमय दरात स्थिरता प्रस्थापित करणे हे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रमुख उद्दिष्ट आहे, तर राष्ट्रांना आíथक विकासाकरिता निधी उपलब्ध करून देणे हे विश्व बँकेचे उद्दिष्ट आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व विश्व बँक यांची काही उद्दिष्टे समान असली तरी त्यांची रचना भिन्न आहे. IMF एकल संस्था असून विश्व बँक ही काही संस्था व अभिकरणाची मिळून बनली आहे असे मुद्दे आपल्या उत्तरामध्ये असणे आवश्यक आहे. २०१४ मध्ये जागतिक व्यापार संघटनेवर प्रश्न विचारला गेला – ‘WTO ही महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय संघटना आहे जिथे घेतलेल्या निर्णयाचा सदस्य देशावर दूरगामी परिणाम होतो. हळडचा अधिदेश ((Mandate) काय आहे व WTO चे निर्णय बंधनकारक असतात का? अलीकडच्या अन्नसुरक्षेवरील चच्रेच्या फेरीमध्ये भारताने घेतलेल्या भूमिकेचे टीकात्मक विश्लेषण करा.’ असा WTO चा अधिदेश, कार्यपद्धती व WTO शी संबंधित समकालीन घडामोडीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. WTO  चा उद्देश आंतरराष्ट्रीय व्यापारातील अडथळे दूर करणे व मुक्त आणि उदार व्यापारासाठी आवश्यक परिस्थिती निर्माण करणे हा आहे. WTO चे निर्णय निरपेक्ष असतात, त्यामुळे निर्णय मान्य न करणाऱ्या देशावर र्निबध लावले जाऊ शकतात. भारताने अन्नसुरक्षेवरील चच्रेमध्ये व्यापार सुलभीकरण कराराला (TFA) मान्यता देण्यास नकार दिला. भारताने गरीब जनतेला अन्नधान्याची उपलब्धता व्हावी याकरिता अन्नधान्याच्या सार्वजनिक साठय़ाच्या समस्येवर तोडगा काढावा व पीस क्लॉजला मुदतवाढ देण्याची मागणी केली. भारतातील अन्नसुरक्षा हा कळीचा मुद्दा असल्याने भारताला अन्नधान्याच्या साठय़ामध्ये कपात करण्यास बाध्य करण्यामुळे लोकांच्या अन्नसुरक्षेविषयक अधिकाराशी तडजोड आहे तसेच ही बाब संयुक्त राष्ट्रसंघाच्या सहस्रक विकास लक्ष्यामधील गरिबी व भूक नष्ट करणे या तत्त्वाच्या विरोधी असल्याने भारताची मागणी रास्त ठरते. आंतरराष्ट्रीय संघटनांविषयीची माहिती संबंधित संघटनेच्या संकेतस्थळावरून मिळते. याबरोबरच या संघटनाशी संबंधित समकालीन घडामोडींचा मागोवा घेत राहिल्याने या घटकाची तयारी परिपूर्ण होईल.

करिअरमंत्र

करिअरमंत्र

मुंबई कॅम्पस्मधून एम.ए. इन डिझास्टर मॅनेजमेंट करीत आहे.

  
  • मी टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सच्या मुंबई कॅम्पस्मधून एम.ए. इन डिझास्टर मॅनेजमेंट करीत आहे. मला या क्षेत्रातील करिअर संधीची माहिती द्यावी. – विश्वजित पाथरकर, मुंबई
टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्ससारख्या दर्जेदार शिक्षण देणाऱ्या संस्थेमधून तुम्ही शिक्षण घेत असल्याने तुम्हाला कॅम्पस प्लेसमेंटमध्ये चांगली संधी मिळू शकेल. हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना डेटाबेस अ‍ॅनालिस्ट, अ‍ॅडमिनिस्ट्रेशन सिक्युरिटी, अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ऑपरेशन्स, नेटवर्क अ‍ॅडमिनिस्ट्रेशन अशा प्रकारच्या संधी मिळू शकतात. या संधी निरनिराळ्या एनजीओ, वर्ल्ड बँक, एशियन डेव्हलपमेंट बँक, युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन, युनेस्को, विमा कंपन्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट, केंद्रीय गृह मंत्रालय, सार्क डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ पब्लिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन नवी दिल्ली, मिटिऑरॉजिकल डिपार्टमेंट नवी दिल्ली, सेंटर ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट, जयपूर हरयाणा इन्स्टिटय़ूट ऑफ पब्लिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन- गुरगाव, आंबेडकर इन्स्टिटय़ूट ऑफ पब्लिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन रांची, जी. बी. पंत इन्स्टिटय़ूट ऑफ हिमालयन एनव्हिरॉन्मेन्ट अँड डेव्हलपमेंट-नैनिताल, उत्तराखंड डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर, भोपाल डिझास्टर मिटिगेशन इन्स्टिटय़ूट, इंडियन अ‍ॅग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिटय़ूट, नवी दिल्ली, इंडियन रेड क्रॉस सोसायटी, नवी दिल्ली या संस्थांमध्ये मिळू शकते.
  • मी डिप्लोमा केला आहे. मी एसएससीची परीक्षा देऊ शकतो का?  – तुकाराम घेराडे
तुम्ही दहावी न करताच कोणता डिप्लोमा केला आहे, हे काही तुमच्या प्रश्नावरून स्पष्ट होत नाही. शासनमान्य डिप्लोमासाठी किमान दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. आपण केलेल्या डिप्लोमास शासनाची मान्यता आहे का, हे कृपया तपासून बघावे.
  • फॅशन मॉडेल होण्याचे काय फायदे आहेत? भारतात यासाठी किती संधी आहे? या क्षेत्रात किती काळ कार्यरत राहता येते?  – सारंग दापके
फॅशन मॉडेलिंग हे अतिशय स्पर्धात्मक क्षेत्र आहे. त्यामुळे या क्षेत्रात लगेच संधी मिळेल असे संभवत नाही. त्याशिवाय या क्षेत्रासाठी तुमची शरीरयष्टी, तुमचा दृष्टिकोन, आत्यंतिक परिश्रम, संयम आदी गुणांची आवश्यकता असते. या क्षेत्रात संधीही भरपूर आहे. त्या तुम्ही कशा हस्तगत करता आणि गुणवत्तेच्या बळावर आपला ठसा कसा उमटवता यावर करिअरचे यश अवलंबून आहे. फॅशन मॉडेलिंग हे केवळ तरुणांसाठीच असते असे नाही.  प्रत्येक वयोगटातील स्त्री-पुरुषांना ध्यानात ठेऊन फॅशन डिझायनर्स आपली वस्त्रप्रावरणे, दागदागिने, अ‍ॅक्सेसरीज, पादत्राणे आदी बाबी तयार करतच असतात. त्यासाठी प्रत्येक वयोगटातील मॉडेलची गरज भासते.