Tuesday, October 13, 2015

सोंगे धरिता नाना परी रे। पूर्वी राजांकडून बहुरूपी या जमातींचा गुप्तहेर म्हणून वापर केला जायचा.

सोंगे धरिता नाना परी रे।

पूर्वी राजांकडून बहुरूपी या जमातींचा गुप्तहेर म्हणून वापर केला जायचा.

अ‍ॅड.पल्लवी रेणके | October 10, 2015 04:27 am
बहुरूपी समाज
पूर्वी राजांकडून बहुरूपी या जमातींचा गुप्तहेर म्हणून वापर केला जायचा. राजाश्रय संपल्यावर उपजीविकेसाठी गावोगाव फिरून लोकांचं मनोरंजन करणं हा एकमेव पर्याय उरला. ‘खेळतो एकला बहुरुपी रे। पहाता अत्यंत साक्षेपी रे। सोंगे धरिता नाना परी रे। बहुतचि कलाकुसरी रे॥’ समर्थ रामदासांनी ज्या समाजाचं असं वर्णन केलं त्या बहुरूपी समाजाविषयी..
‘‘काय सांगू ताई तुम्हाला आमच्या बहुरूपी समाजाची जिंदगी आणि आमचं हाल? जाईल तिथं कुणी आम्हाला विचारलं की, तुम्ही कोण्या गावाचं तर आम्ही सांगतो अमरावतीचं. आमच्या मनाला आम्ही विचारलं की, काय आहे तुमचं अमरावतीत तुमचं म्हणून सांगायला? तर उत्तर मिळतं, दुसऱ्याच्या जागेवर टाकलेल्या अनधिकृत पालात राहाणाऱ्या थकलेल्या वृद्ध कुटुंबीयांशिवाय काहीही नाही. रिकामी पडिक जागा बघून तिथं आम्ही पालं टाकतो. मालकाने उठ म्हटलं की उठतो. अशीच दुसरी जागा बघतो आणि तिथं पुन्हा पालं टाकतो. असं पिढय़ान् पिढय़ा चालू आहे. पालात जन्मायचं, तिथंच खेळायचं, मोठं व्हायचं. लगीनबी तिथंच, लेकरं तिथंच आणि मरणबी तिथंच. आमचे कर्तेधर्ते लोक मुलांबाळांसह आठ-नऊ महिने वेगवेगळ्या ठिकाणी फिरून दसरा-दिवाळी सणाच्या आधी इथं येतात. अडीच-तीन महिन्यांनंतर पुन्हा पोट भरण्यासाठी भटकंती सुरू करतात. अशी आमच्या बहुरूपी जमातीची सुमारे साठ कुटुंबं अमरावतीत आहेत. अमरावतीतच नव्हे तर संपूर्ण भारतात आमच्या मालकीची जागा नाही, घर नाही. वीज, पाणी, शौचालय या सोयी मिळण्याचा प्रश्नच नाही. त्यात भटकेपणा. त्यामुळे त्यांना त्यांची ओळखपत्रे मिळत नाहीत व शिक्षणही नाही.’’
‘‘रेशनकार्ड नाही म्हणून रेशन नाही. एखाद दुसऱ्याजवळ ते कार्ड असले तरी फिरतीवर त्याचा उपयोग होत नाही. त्यामुळे रेशन कार्ड मिळायलाच पाहिजे असं वाटत नाही. देशात कोठेही रेशन मिळू शकेल असे कार्ड मिळालं तर मात्र त्याचा त्यांना उपयोग होऊ शकेल. बँक तर आम्हाला दारातसुद्धा उभं राहू देत नाही. कायमच्या व मालकीच्या कच्च्या/पक्क्या घरात राहणाऱ्या गरिबांना धान्य स्वस्तात मिळतं. आमच्यापेक्षा जास्त पोरकं, निराधार, गरीब कोण असंल का? पण आम्हाला नाही मिळत काही.’’ आपलं दु:ख सांगत होत्या प्रमिला शमशेर औंधकर, उजाला चंदू औंधकर, मालू माणिक मिरजकर, वंदना बाबाराव औंधकर आणि बहुरूपी समाजाच्या त्यांच्या इतर नातेवाईक महिला.
अमरावती शहराच्या महेंद्र कॉलनीबाहेर असलेल्या बहुरूपी जमातीच्या पालवस्तीत बबिता राजकपूर बहुरूपी या क्रियाशील कार्यकर्तीने त्यांच्या महिलांची बैठक आयोजित केली होती. ‘बहू’ हा संस्कृत शब्द आहे. बहू म्हणजे अनेक. रूप म्हणजे ठरावीक भूमिकेचं दृष्यस्वरूप. प्राचीन काळापासून बहुरूपी जमातीचं अस्तित्व आहे. बहुरूपी भटके, अस्थिर असले तरी ते प्राचीन काळी समाजकारणात- राजकारणात महत्त्वाच्या भूमिका बजावत होते, त्यांना त्यांचा इतिहास आहे. हजारो वर्षांची परंपरा आहे. श्रीपती भट्टाच्या ‘जोतिष रत्नमाला’ या प्रसिद्ध ग्रंथात यांचा उल्लेख आहे. शिवाय समर्थ रामदासांनीही आपल्या भारुडात यांचा खालीलप्रमाणे उल्लेख केलेला आहे. ‘खेळतो एकला बहुरुपी रे। पहाता अत्यंत साक्षेपी रे। सोंगे धरिता नाना परी रे। बहुतचि कलाकुसरी रे॥’. शिवाय जटाधारी तपस्वी, गोसावी, साधू इत्यादींची सोंगे घेणाऱ्या बहुरूपीसारख्या, वेगवेगळी कला-कौशल्ये जोपासणाऱ्या भटक्या जमातींच्या भिक्षुकांचा हेरगिरीसाठी गुप्तपणे कसा उपयोग करून घ्यावा यासंबंधीची चाणक्य नीती, ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकातल्या ‘कौटिलीयम अर्थशास्त्रम’ ग्रंथात लिहिलेली आहे.
प्राचीन काळी स्थिर लोकांची करमणूक ही निकडीची गरज होती. ती भागविण्यासाठी गावोगावी फिरून देवादिकांचे, पुराण-पात्रांचे सोंगे घेऊन संगीत, नृत्य, अभिनय या कलांद्वारे पुराणकथांचे कथन करणे, भजन-कीर्तन करणं, छोटे छोटे नाटय़प्रसंग अंगणात, चौकात, मंदिरासमोर सादर करणं अशा कार्यक्रमातून लोकांची आध्यात्मिक करमणूक करून सदाचार व नीतीचा प्रचार करणं आणि लोक देतील ती भिक्षा स्वीकारणं हा या जमातीचा मूळ परंपरागत व्यवसाय होय. कालांतराने लोकांच्या रुचीनुसार अध्यात्मिक करमणुकीबरोबर निखळ करमणूक करण्याची कलाही त्यांनी अवगत केली. हनुमानाच्या गुणवैशिष्टय़ाबरोबर मर्कट चेष्टाही सादर होऊ लागल्या. अस्वल-रेडा-यमराज पण सोंगात आले. साधू-संन्यासी-फकीर, चोर-पोलीस, साव-भ्रष्ट, व्यापारी-अधिकारी, लुळे-पांगळे, जर्जर म्हातारा इत्यादींची सोंगं सुरू झाली. एकाच कार्यक्रमात, लहान मुला-मुलींना, युवकांना, प्रौढांना आणि वृद्धांना खिळवून ठेवणारा हाच खरा ‘उत्कृष्ट बहुरूपी कलाकार’ अशी यांची जमातीअंतर्गत धारणा आहे. म्हणूनच यांच्या कला सादरीकरणात अचकट-विचकट, अश्लील किंवा उथळ विनोद किंवा संवाद नसतात. विश्वमित्राचा मेनकेकडून तपोभंग, मद्यधुंद इंद्राच्या दरबारातले अप्सरेचे नृत्य, सीता स्वंयवर, राधा-कृष्णाची रासक्रीडा, कृष्ण-रुक्मिणीची भेट अशा अनेक प्रसंगांत भरपूर शृंगार व्यक्त केला जातो. पण तो उत्कट या शब्दानेच वर्णणावं लागेल.
ऐतिहासिक विकास प्रक्रिया पाहिली तर पूर्वी भारतात छोटे-मोठे अनेक राजे-महाराजे होते. प्रसंगानुसार त्यांच्यात मैत्री, स्पर्धा, वैर होतं. शत्रुच्या हालचाली, जनतेची सुख-दु:खं, भाव-भावना, निष्ठा-अनिष्ठा याबाबतीतली सत्य परिस्थिती समजून घेण्यासाठी राजांकडून या जमातींचा गुप्तहेर म्हणून वापर केला जायचा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बहुरूपी बहिर्जी नाइकांचं उदाहरण बोलकं आहे. ते हेर खात्याचे प्रमुख होते. त्यांना ‘खबऱ्या’च्या रूपात मदत करणाऱ्या शेकडो बहुरूप्यांची इतिहासात नोंद मिळत नसली तरी त्यांना राजाश्रय मिळत होता. त्यामुळे त्यांना जगण्यासाठीची ऊर्मी, साधने, मोठय़ांची जवळीक, प्रतिष्ठा मिळत होती. सर्व राजांच्या क्षेत्रात हे लागू होतं. राजेशाही, बादशाही संपली. त्याबरोबर यांचा राजाश्रय संपला. मिळणाऱ्या सोयी-सुविधा संपल्या. उपजीविकेसाठी पूर्वीप्रमाणे गावोगाव फिरून लोकांचं मनोरंजन करणं हा एकमेव पर्याय उरला.
औंधकर, सातारकर, मिरजकर, खेडकर, काशीकर, पल्लाणीकर (पैठणकर), वैद्य, काळे अशी यांची आडनावं आहेत. ही आडनावं पूर्वीच्या काळातील राजांच्या राजधान्यांची किंवा राजधानीजवळच्या क्षेत्राची आठवण करून देतात. परंपरागत ज्ञान व अनुभवाच्या आधारे वैद्य घराण्याचं काम आरोग्यसेवा पुरवण्याचं होतं जे आज पण केलं जातं. जमातीत धर्माबद्दल दोन वेगळे विचारप्रवाह आहेत. पहिला, आम्ही मूळ हिंदूच. मराठी प्रांताच्या चारी बाजूला मुस्लीम राजांची राज्यं होती. त्यांच्या हालचालीबाबत हेरगिरी करताना त्यांना संशय येऊ नये म्हणून मुस्लीम नावं व रीतिरिवाज जाणीवपूर्वक स्वीकारलेले आहेत. काही पिढय़ानंतर ती रूढीच बनली. दुसरा विचार, मुस्लीम राजवटीत धर्मप्रसाराच्या मोहिमेत सापडतो. जबरदस्तीनं मुस्लीम करण्यात आलं. भयापोटी मुस्लीम धर्म अमलात आणला, पण हिंदू धर्म सोडला नाही.
हा समाज संपूर्ण भारतभर विखुरलेला असला तरी राज्यवार आणि विभागवार यांचे वेगळे गट निर्माण झाले आहेत. त्यांच्यात आपसात बेटी व्यवहार होत नाही. या सर्व गटांसह महाराष्ट्रात विखुरलेल्या बहुरूपी जमातीची लोकसंख्या सुमारे ३० हजार असावी.
लग्नाच्या जेवणात चिखलाची कडी आणि खडकाची वडी खाण्याचे आग्रहाचं निमंत्रण मोडक्या बजाईला व आंधळ्या कोंडाईला देताना गाण्यातून ‘चला चला चला, बिगी बिगी चला, लग्नाला चला, आता लग्नाला चला.’ अशी लगीनघाई करणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातल्या बहुरूप्यांचं गाणं हसत हसत पुन:पुन्हा ऐकावंसं वाटतं. हे बहुरूपी पूर्णत: हिंदू आहेत. मराठवाडय़ात या बहुरूपींना राईरंग म्हणतात, तर भंडारा जिल्ह्य़ात यांना भिंगी म्हणतात. पात्राला (भूमिकेला) अनुसरून आपला वेश जलदपणे बदलण्यात हे पटाईत आहेत. देशाच्या उत्तर-पूर्वेतले काही बहुरूपी पूर्णत: मुस्लीम आहेत. काही गट हिंदू व मुस्लीम या दोन्ही धर्माचे आचरण गुण्यागोविंदानं करतात. अमरावतीचे बहुरूपी यांच्यापैकीच आहेत. जाईल तिथं पालात राहावं लागणाऱ्या या जमातीच्या बहुतेक महिला ठिगळांच्या साडय़ा नेसलेल्या दिसतात. पुरुषांच्या वेशाचं धोतर व बंगाली टोपी हे वैशिष्टय़ आहे.
आधुनिक काळात विज्ञानाच्या वाढीबरोबर करमणुकीची साधनं वाढली. शिवाय ती घराघरात उपलब्ध झाली. काळाची मानसिकताही बदलली. त्यामुळे बहुरूपींचा हा परंपरागत व्यवसाय उपजीविकेसाठी कमकुवत ठरत आहे. बहुरूपी समाजाकडे पूर्वीसारखं आज प्रेमानं, उपयोगी दृष्टीनं पाहिलं जात नाही. बेघर, भूमिहीन व भटकी प्रवृत्ती यामुळे शिक्षण-प्रशिक्षण नाही. त्यामुळे परंपरागत व्यवसायात गुरफटून गरीब व पालात राहाण्यापलीकडे पर्याय मिळत नाही. शिक्षणासंदर्भात चौकशी करता असं कळलं की, अमरावतीतील त्यांच्या सुमारे तीनशे लोकसंख्येत आजपर्यंत रतन नसरुद्दीन औंधकर हे एकच पदवीधर व निवृत्त बीडीओ आहेत. कागदोपत्री त्यांचा धर्म हिंदू व जात बहुरूपी आहे. या व्यवसायात त्यांच्या महिला प्रेक्षकांसमोर येत नाहीत. स्त्रीपात्रसुद्धा पुरुषांनीच करायचं असतं हा त्या जमातीचा दंडक आहे. इथे पडदा नसला तरी पडद्यामागच्या साऱ्या कलाकारांची कामं महिलांना करावी लागतात. कलाकारांना सजविण्यासाठी आवश्यक नैसर्गिक रंगाची उपलब्धता, त्याची रंगप्रक्रिया, पोषाख व त्यांची स्वच्छता, इतर साधनांची जुळवाजुळव व देखभाल दुरुस्ती आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्यक्ष वेशभूषा व रंगरंगोटी करण्यासाठी पुरुषांना मदत करावी लागते. शिवाय सरपणापासून स्वयंपाकपाण्याची तयारी करून, कुटुंबातल्या लहान मुलाबाळांची काळजी घेणं ही रोजची कामं तर न चुकता महिलानांच करावी लागतात. यातूनही वेळ मिळाला तर महिला रोजंदारीवर मजुरीची कामं करायला जातात.
बहुरूपी जमातीत महिलांचं स्थान दुय्यम आहे. जात पंचायतीत महिलांना बसता येतं पण चर्चेत भाग घेता येत नाही. महिलांना घटस्फोट मिळतच नाही. कोणत्याही परिस्थितीत महिलांना पुनर्विवाह करण्यास बंदी आहे. आंतरजातीय विवाहास परवानगी नाही. जातीतल्या एका तरुणाचे जातीतल्या मुलीशी लग्न झाले होते. तरी त्याचे जातीबाह्य़ मुलीशी असलेलं प्रेमप्रकरण उघडकीस आलं. जातपंचायतीने मुलाला दोष दिला. जातीतल्या मुलीचं लग्न मोडून जातीतल्या दुसऱ्या मुलाशी लावून दिलं. हा अपवादात्मक निर्णय जातपंचायतीनं घेतला आणि त्याच्या जातीबाह्य़ प्रेमिकेशी नोंदणीकृत लग्न करण्यास भाग पाडलं.
एके काळी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात महत्त्वाची भूमिका पार पाडून प्रतिष्ठेचे व गौरवशाली जीवन जगणारा हा समाज विज्ञान तंत्रज्ञानाच्या आजच्या आधुनिक काळात मात्र पोरके, हलाखीचे आणि विकासापासून बहिष्कृत जीवन जगतो आहे. यांच्याकडील कलेचे संगोपन संवर्धन कसे होईल? यांची कला उपजीविकेसाठी भीक मागण्याचे साधन न बनता त्यांना प्रतिष्ठा मिळवून देणारे साधन कसे बनेल? यांना घर व टिकाऊ जीवनधारासह त्यांच्या आवडीप्रमाणे विकासाची संधी कशी मिळेल? त्यासाठी त्यांच्या मुला-मुलींना जीवनोपयोगी व दर्जेदार
शिक्षण कसे मिळेल? एकूण विकास प्रक्रियेत त्यांना प्राधान्य कसे मिळेल हे प्रश्न सतावणारे असले तरी महत्त्वाचे आहेत.
pallavi.renke@gmail.com
First Published on October 10, 2015 4:27 am
Web Title: polymorphism among the tribal groups

No comments:

Post a Comment