अनुभव हाच शिक्षक
संस्कार हा फार मोठी व्याप्ती असलेला विषय आहे. आपल्याला रोज येणारे अनुभव डोळसपणे पाहिले
शोभा भागवत |
October 10, 2015 05:03 am
जी माणसं समाज बदलण्याचं काम करतात, लढे उभारतात, माणसांना चांगल्या कामाची स्फूर्ती देतात, नि:स्वार्थीपणे काम करणाऱ्यांच्या फौजा उभ्या करतात, अशा माणसांवर कोण संस्कार करतं? त्यांच्या म्हणण्यानुसार, लहानपणी पालक, शिक्षक, आणखीही कोणी जवळची माणसं यांचं मार्गदर्शन होतं. पण ते काही काळच असतं. त्यातून एक गोष्ट घडते की माणसाच्या मनाचा टिपकागद बनतो. आजूबाजूच्या घटना त्याच्यावर परिणाम करतात. तो संवेदनशील बनतो आणि त्या संवेदनेला प्रामाणिक प्रतिसाद देत तो मोठा होत जातो. गांधीजी म्हणत, ‘माझं जीवन हाच माझा संदेश आहे.’ त्यांनी स्वत: सफाईपासून राजकीय लढा उभारण्यापर्यंत सर्व कामं केली. सर्व कामं ते जीव ओतून करत.
हातातलं काम जीव ओतून आणि चांगलंच करायचं हा संस्कार आपण मुलांवर करू शकतो का? तसं घरात वातावरण असलं तर मुलांनाही ती सवय लागते. आई तिचं काम नीटनेटकं करते, तिच्या मनात उद्याचं प्लॅनिंग असतं. ‘डबा करायला विसरलेच!’, असं ती म्हणत नाही, बाबा त्यांचं काम मनापासून, जबाबदारीने करतात हे घरात पाहणारं मूल तसाच विचार करणार. मनापासून, जबाबदारीने याबरोबर ‘वेळेवर’ हेही महत्त्वाचं असतं.
आमच्या घरात अनिल बाहेर जाताना ‘मी तीनच्या ठोक्याला परत येईन’, असं सांगून जायचा. मुलं ते ऐकत असायची. आणि मग खेळताना छोटा शोनिल मला सांगायचा, ‘मी तीनच्या ठोक्याला येतो.’ त्याला त्या शब्दाचा अर्थ माहीत नव्हता तो हळूहळू कळला आणि ‘वेळेवर’ या गोष्टीचं महत्त्वही कळलं.
आपल्या शब्दाची किंमत आपणच ठेवावी लागते. एखादं जबाबदारीचं काम मी करीन म्हटल्यावर ‘विसरलेच!’ असं म्हणायची वेळ येऊ नये आणि आली तर लाज वाटली पाहिजे हे लहानपणापासून मूल ऐकतं तेव्हा ते वक्तशीर होण्याची शक्यता असते. शक्यता असते एवढंच आपण म्हणू शकतो. या गोष्टीचा अतिरेक झाला, तर मुलं त्याला विरोधही करतात आणि ‘वेळेवर’ या शब्दाला थाराच देत नाहीत.
संस्कार सहजपणेच व्हायला हवेत. मारून, जबरदस्ती करून नाही होत संस्कार! पहाटे उठून दिवस सुरू करायचा तो प्रार्थनेने, अशी पद्धत अनेक निवासी शाळा, सुधारगृहं यांच्यात असते. पण ती झोपमोड करणारी घंटा किंवा भोंगा यांचा काही मुलांना इतका राग येतो की मोठेपणी ती कधीही सकाळी उठून प्रार्थना म्हणत नाहीत. असा मुलांच्या मनात विरोध निर्माण होईल अशी जबरदस्ती घरात असू नये. घरात आपल्याच मुलांशी संवाद साधायला वाव असतो. रात्री ती झोपत असताना असा वेळ मिळतो तेव्हा आपण त्यांना शांतपणे ‘वेळेवर’ शब्दाचं महत्त्व सांगू शकतो. वेळा पाळल्या तर आपल्या हातून दुप्पट कामं होतात. पण मुलांवर हा संस्कार कसा होणार? त्यांना तर सवय असते एक तास, दोन तास, चार तास ही उशिरा शाळेत येणाऱ्या राजकीय पाहुण्यांची. त्यासाठी मुलं ताटकळून उभी असतात, उन्हात बसलेली असतात. उशिरा गेलं तर आपलं महत्त्व वाढतं असं काही लोकांना वाटत असतं! राजकीय व्यक्तींचं जाऊ द्या पण आपण सामान्य माणसं एक गोष्ट करू शकतो की वेळ पाळायची तर उलटा हिशेब करायचा. मला तीन वाजता एका ठिकाणी पोचायला हवं तर अडीचलाच घरातून निघायला हवं याचा अर्थ दोनला माझं आवरून मी तयार असायला हवं म्हणजेच दीडला जेवणं आटोपलेली हवीत. म्हणजे एकला जेवायला बसावं लागेल, साडेबाराला स्वयंपाक तयार असायला हवा. अकरा साडेअकरालाच स्वयंपाकाला सुरुवात व्हायला हवी, पुढची घाई लक्षात घेता त्या दिवशी पालेभाजी निवडत बसायला वेळ नसेल, गवारीसारखी भाजी चालणार नाही, चटकन् होणारी भाजी करावी लागेल. असा उलटा हिशेब करता आला तर वेळेवर पोचणं हा प्रश्न उरत नाही.
वेळेवर पोचण्यासारखे इतरही अनेक किरकोळ वाटणारे पण अतिशय उपयोगी संस्कार असतात. संस्कार साधेपणाचे असतात, कामाबद्दलचे असतात, पर्यावरणाबद्दलचे असतात, साफसफाईचे असतात, पैसे योग्य प्रकारे वापरण्याचे असतात, माणसांशी वागण्याचे असतात, काटकसरीचे असतात, व्यायामाचे असतात, भाषेचेही संस्कार असतात. महत्त्वाची कागदपत्रं नीटनेटकी ठेवण्याचे असतात.
दिवाळीच्या सुट्टीपूर्वी आम्ही ‘बालभवन’मधल्या मुलांना फटाक्यांबद्दल सांगतो. फटाके का उडवायचे नाहीत त्याने हवा खराब होते, तीच आपल्या शरीरात जाते, मोठय़ा आवाजाने कान दुखावणं, ऐकू न येणं असं होऊ शकतं. वयस्कर आजी-आजोबांना आवाजाचा त्रास होतो. लहान बाळं दचकून उठतात, फटाके वाजवणं म्हणजे पैसे जाळून टाकणं आहे, अपघात होतात, मुलांना भाजू शकतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फटाकांच्या कारखान्यात लहान मुलं काम करतात, तिथली दारू पावडर त्यांच्याही शरीरात जाते त्यांचं आयुष्य कमी होतं. मग आपण फटाके उडवायचे का? मुलं निर्धार करतात आणि बरीच मुलं फटाके उडवत नाहीत. मात्र एखाद दुसरा सांगतो, ‘बाबा म्हणाले, असं काही नसतं, आपण मजा करायची असते.’ म्हणजे आपण सांगितलेलं गेलं का सगळं पाण्यात? समाजात अशी गंभीरपणाची अॅलर्जी असलेली, पार्टी मूडमध्ये सतत वावरणारी माणसं असतातच. त्यांना समाजाशी काही घेणंच नसतं.
शरीराच्या आरोग्यात आहार आणि व्यायाम या दोन गोष्टींचं फार महत्त्व आहे. शेळीच्या समोर एका ताटात पाला आणि एकात बर्फी ठेवली तर शेळी पालाच खाते. बर्फीकडे बघतही नाही. हेच जन्मत: आहाराचं ज्ञान मुलांना असतं. त्यांचा कल योग्य गोष्टी खाण्याकडेच असतो. गरजेपेक्षा जास्त ती खात नाहीत पण हळूहळू खाण्यासाठी जबरदस्ती, बिस्किट, चॉकलेट, पिझ्झा, बर्गर, कोल्ड्रिंक अशा गोष्टींची ओळख झाली की ती चांगलं खाणं विसरतात आणि चटकमटक खाऊ लागतात. मध्ये ग्रामीण भागात राहणारी, वाढणारी जागरूक आई-वडील असलेली एक छोटी सांगत होती, ‘माझ्या हातात हे काय आहे? काकडी! पण मी तिचं नाव चॉकलेट ठेवलंय् आणि ती मी खातेय.’ तिची युक्ती फारच छान! एरवीदेखील ही मुलगी भूक लागली की टोमॅटो, गाजर, काकडी, चिक्की अशा गोष्टी खाते. चॉकलेट, बिस्किट नाही. तिची आई आणि बाबा अशी खरेदीच करत नाहीत. काकडी, टोमॅटो, गाजर, मुळा मात्र घरात ठेवतात.
व्यायाम खरं तर नियमित करायला हवा पण लहान मुलांच्या आयांनी वेळ कुठून काढावा? एक तास केवळ स्वत:साठी ठेवून बघावा काय जादू होते ती! हवं तर सहाला उठायची सवय असेल तर पाचला उठायची सवय करावी आणि त्या वेळात व्यायाम करावा. घरी व्यायाम होत नसेल तर जवळपास जिमला जावं. किंवा चालून यावं तासभर, योगासनं, प्राणायाम करता येईल. एखाद्या मैत्रिणीसह व्यायाम करावा, पण व्यायाम केलाच पाहिजे. व्यायामात तोचतोचपणा नको. नवीन काही शिकत राहिलं तर आणखीनच छान वाटतं. आई-वडील घरात नियमित व्यायाम करतात हे पाहिलं की मुलांनाही ती आवड वाटू लागते.
खरं तर संस्कार हा फार मोठी व्याप्ती असलेला विषय आहे. पण तो सगळा हातात घेण्यापेक्षा आपल्याला रोज येणारे अनुभव डोळसपणे पाहिले, त्याबद्दल विचार केला तर अनेक कल्पना सुचत राहतात. आपले आपले प्रयोग करता येतात. आपल्या मुलाचं मन टिपकागदासारखं आहे का? त्याला अनुभवांमधलं सौंदर्य, आपुलकी, प्रेम, जिव्हाळा लक्षात येतं का? दुसऱ्याचा विचार करून त्याला काय हवं आहे ते कळलं का? संवेदनक्षम मुलाला संस्कार म्हणजे काय ते अनुभवांमधूनच शिक्षकांना शिकवावं लागते. प्रत्यक्ष अनुभव हाच मोठा शिक्षक असतो. तो कोणापेक्षाही अधिक चांगलं शिकवतो.
shobhabhagwat@gmail.com
First Published on October 10, 2015 5:03 am
Web Title: experience a great teacher
No comments:
Post a Comment