कृषी तंत्र वस्त्रे – २
सौर किरणोत्सर्जन रोधकता : कृषी क्षेत्रामध्ये उपयोगात आणली जाणारी अनेक वस्त्रे उघडय़ावर सूर्यप्रकाशामध्ये ठेवण्यात
- चं. द. काणे (इचलकरंजी) |
October 16, 2015 00:58 am
कृषी तंत्र वस्त्रामध्ये खालील गुणधर्म असणे अत्यावश्यक असते.
सौर किरणोत्सर्जन रोधकता : कृषी क्षेत्रामध्ये उपयोगात आणली जाणारी अनेक वस्त्रे उघडय़ावर सूर्यप्रकाशामध्ये ठेवण्यात येतात. त्यामुळे अशा वस्त्रांमध्ये तीव्र सूर्यप्रकाश किरणांमध्ये तसेच बदलत्या तापमानामध्ये टिकून राहण्याची क्षमता असावी लागते.
अतिनील किरणोत्सर्जन रोधकता : पॉलिप्रॉपिलीनसारखी काही वस्त्रे दृश्य कक्षेतील प्रकाश किरणांमध्ये टिकाव धरू शकतात; परंतु अतिनील प्रकाशासारख्या अदृश्य किरण लहरींमध्ये ती टिकू शकत नाहीत. यासाठी अशा वस्त्रांवर अतिनील प्रकाशामध्ये टिकून राहण्यासाठी स्थिरीकरण प्रक्रिया करावी लागते. यामध्ये काही खास प्रकारच्या कार्बन द्रव्यांचा उपयोग केला जातो, ज्यामुळे अतिनील किरणोत्सर्जनाचे उष्णता लहरींमध्ये रूपांतर केले जाते आणि अशा प्रकारच्या, खासकरून विना-वीण पद्धतीने बनविलेल्या कापडाचा उपयोग करून, पिकाचे / झाडांचे अतिनील किरणोत्सर्जनापासून संरक्षण केले जाते.
जैविक विघटन : कृषी तंत्र वस्त्रे ही बहुधा जमिनीच्या संपर्कात येत असल्यामुळे त्यांचे जैविक विघटन महत्त्वाचे ठरते. नसíगक धाग्यांपासून तयार केलेल्या वस्त्रांचे जैविक विघटन गतीने होते, तर संश्लेषित तंतूपासून तयार केलेल्या वस्त्रांचे जैविक विघटन लवकर होत नाही आणि म्हणून त्यांचे आयुष्य दीर्घकाळ असते. ती अनेक वेळा वापरता येतात आणि म्हणूनच ती दीर्घकालीन, हिशेबाने कमी खर्चाची ठरतात.
पाणी संधारण करण्याची उच्च क्षमता : रोपांना आच्छादित करण्यासाठी तसेच डोंगराच्या उतारावरची घसरण थांबविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कापडांमध्ये पाणी धारण करण्याची उच्च प्रतीची क्षमता असावी लागते. योग्य प्रकारचे शोषक गुणधर्म असणारे तंतू वापरून तसेच अशा वस्त्रांमध्ये उच्च शोषक पदार्थ संघटित करून हे साध्य करता येते. अशा रीतीने बनविलेल्या कापडांमध्ये प्रति चौरस मी. १०० ते ५०० ग्रॅम इतके पाणी धारण करण्याची क्षमता असते.
संरक्षक गुणधर्म : काही कृषी तंत्र वस्त्रांचा उपयोग रोपांचे वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी तसेच पिकाभोवती कृत्रिम वातावरण निर्माण करून तापमान आणि आद्र्रता यांचे संतुलन साध्य करण्यासाठी केला जातो. योग्य ती तन्यता, आकार स्थिरता व स्थितिस्थापकत्व असलेल्या तंतूंची व कापडांची निवड करावी लागते.
– चं. द. काणे (इचलकरंजी)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
No comments:
Post a Comment