क्यूकम्बर
एखाद्या शब्दाच्या नेमक्या उच्चाराबाबत मनात अनेकदा गोंधळ होतो.
रश्मी वारंग |
October 8, 2015 22:38 pm
काकडी
काही शब्दांना पर्याय नसतात. म्हणजे ते शब्द इतके चपखल असतात की त्याऐवजी एखादा पर्यायी परदेशी शब्द वापरण्याची गरज आपल्याला भासतच नाही. काकडीला असा पर्याय शोधण्याची गरज कधी वाटली नाही. याचं सरळ कारण म्हणजे भाजीवाल्यापासून ते हॉटेलपर्यंत आणि ब्युटी ट्रीटमेंटपासून रेसीपींपर्यंत काकडी हा देशी उच्चार बऱ्यापैकी मान्य आहे. सँडवीचमधली मिरची ‘चिली’ झाली तरी काकडी ही काकडीच राहिली. तरी या शब्दाचा इंग्रजी उच्चार शोधावासा वाटला. याचं कारण काही वेळा विनाकारण इंग्रजी बोलण्याचा सोस बाळगणारी मंडळी उच्चार नेमका आहे वा नाही हे पाहण्यात मात्र तितकी तत्पर नसतात. मुलाला डब्यात ककुंबर, कुंकुंबर, कुकुंबेर स्लाइस दिल्या हे सांगणाऱ्या काकूंनी या काकडीचं नेमकं काय प्रकरण आहे हे पाहायला प्रेरित केलं आणि हाती गवसला नेमका उच्चार – क्यूकम्बर.
Cucumber या स्पेलिंगमधल्या cucu मुळे कुकु, ककू होणं अगदी स्वाभाविकच आहे. पण cute मधल्या cu प्रमाणे इथेही cu चा ‘क्यू’ झाला आहे. गंमत बघा cucumber मधला एक cu क्यू तर दुसरा cu क् हे गणित तसं फसवंच आणि त्यामुळे उच्चारही चुकला तर नवल नाही.
खरं पाहता काकडी हा शब्द अगदी रुळलेला आहे, पण वर्गात इंग्रजीच बोलायची सक्ती करणाऱ्या समस्त गुरुजनांच्या आदेशांना इमानेइतबारे पाळणारी नवी पिढी घरीदारी जेव्हा या पर्यायी इंग्रजी शब्दांची पेरणी करू लागते तेव्हा त्या त्या भाजी वा फळाला इंग्रजीत काय म्हणतात हे माहीत असणारे वा नसणारे पालक तत्परतेने आपला उच्चार मुलांसमोर चुकू नये यासाठी कमालीचे दक्ष होतात. अशा उच्चारदक्ष पालकांसाठी हा आजचा शब्द खास आहे – क्यूकम्बर.
वास्तविक ३००० वर्षांपासून काकडीचे विविध प्रकार भारतात अस्तित्वात आहे. काकडीचं मूळ भारतातलंच मानलं जातं. इथून मग ती युरोपात फिरायला गेली असावी. कारण फ्रान्स, इंग्लंड, अमेरिकेच्या पाककृतींमधले काकडीचे उल्लेख तुलनेने अलीकडचे म्हणजे ९ व्या १० व्या शतकातले आहेत.
दुपारच्या संथ, उदास वेळेत काहीही करण्याचा कंटाळा आलेल्या मंडळींना परंतु थोडावेळही power nap घेऊ न शकणाऱ्या मंडळींसाठी काकडी ही बुस्टर आहे. आजकाल आहाराचा विशेष विचार करणारा वर्ग आपल्या डब्यात काकडीला आवर्जून स्थान देतो. उन्हाळ्याच्या दिवसात मीठ लावून चाखलेल्या काकडीला तोड नाही आणि त्यामुळेच इंग्रजीत cool as cucumber ही उक्ती रूढ आहे. कुठल्याही परिस्थितीत डोकं थंड ठेवणाऱ्या माणसासाठी हा शब्दप्रयोग केला जातो.
काकडीची उपयुक्तता आपल्याला नवी नाही. कोशिंबिरीतून तर ती आपल्या अगदी रोजच्या पाहण्यातली झाली आहे. पण हीच काकडी क्युकम्बर म्हणून समोर येते तेव्हा थोडी अनोळखी वाटते. शब्दाशब्दाचं हे वेगळेपण जाणून घेणं आवश्यक ठरतं. कधी अपरिहार्य गरज म्हणून, कधी सहज म्हणून उद्या क्यूकम्बर हा उच्चार चुकला तर कोशिंबिरीची चव काही बदलणार नाही. पण नव्या पिढीसोबत पावलं टाकताना चालता चालता काही शब्दांची चव चाखणं चांगलंच की!
मुंबई -viva.loksatta@gmail.com
First Published on October 9, 2015 1:54 am
Web Title: teaching of pronunciation
No comments:
Post a Comment