असा वाचवा डेटा
‘‘महिन्याला एक जीबी डेटा पुरत नाही म्हणून पुढच्या महिन्यात डेटा पॅक वाढविला.
नीरज पंडित |
October 13, 2015 06:12 am
रिस्ट्रिक्ट बॅकग्राऊंड डेटा
डेटा वाचविण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे अॅप्सचा बॅकग्राऊंड डेटा बंद करणे. यामुळे अनेकदा आपण काहीही काम करत नसताना इंटरनेट खर्च होत राहते. यामुळे अनेकदा आपले एमबी संपतात आणि आपल्याला प्रत्यक्षात ते समजतही नाहीत. बॅकग्राऊंड डेटामध्ये ई-मेल सिंकिंग, फीड्स अपडेटिंग, वेदर विडगेट्स अशा गोष्टींचा समावेश होतो. हे बंद करणे अगदी सोपे आहे. ते बंद करण्यासाठी सेटिंग्जमध्ये जा. तेथे डेटा युसेजचा पर्याय निवडा. यानंतर तुम्हाला खाली कोणते अॅप किती डेटा वापरतो याची माहिती येईल. तेथे प्रत्येक अॅपमध्ये जाऊन ते सुरू केल्यावर तेथे खालच्या बाजूस ‘रिस्ट्रिक्ट बॅकग्राऊंड डेटा’ असा पर्याय येतो, तो निवडावा. यामुळे अॅप बंद असताना खर्च होणारा डेटा खर्च होणार नाही. याचबरोबर तुम्ही गुगल सव्र्हिसेसच्या सेटिंग्जमध्ये जाऊन तुम्हाला ज्या सेवांचे सिंकिंग नको असेल त्या सेवांचे सिंक बंद करू शकता. यामुळेही तुमचा डेटा कमीत कमी खर्च होण्यास मदत होऊ शकेल.
ऑटो अपडेटिंग अॅप्स
तुमच्या फोनचा सर्वाधिक डेटा खर्च होण्याचा आणखी एक स्रोत म्हणजे गुगल प्लेमध्ये होणारे अॅप अपडेशन. जर तुम्ही प्ले स्टोअरमध्ये ‘सेट टू ऑटो अपडेट्स अॅप्स’ असा पर्याय निवडला असेल, तर तुमच्या मोबाइलमधील अॅप्सचे अपडेटेड व्हर्जन बाजारात दाखल झाले, की तातडीने तुमचे अॅप अपडेट होते आणि तुमचा डेटा खर्च होतो. जर हा डेटा खर्च वाचवायचा असेल, तर प्ले स्टोअरमध्ये जाऊन ऑटो अपडेट अॅप्सऐवजी ‘डू नॉट ऑटो अपडेट अॅप्स’ किंवा ‘ओन्ली ओव्हर वाय-फाय’ हा पर्याय निवडावा. म्हणजे अॅप आपोआप अपडेट होणार नाही. जर तुम्हाला काही ठरावीक अॅप्सबाबतीत ही सुविधा पाहिजे असेल, तर तुम्ही प्रत्येक अॅपच्या सेटिंग्जमध्ये जाऊन हा पर्याय बंद करू शकता.
क्रोमवर नियंत्रण
अँड्रॉइड फोन वापरणाऱ्या बहुतांश वापरकर्त्यांकडे क्रोम हे इंटरनेट ब्राऊझर देण्यात आलेले असते. या ब्राऊझरचा वापर आपण अगदी बिनदिक्कतपणे करत असतो; पण प्रत्यक्षात हा ब्राऊझर खूप इंटरनेट खर्च करत असतो. जर या एकटय़ा ब्राऊझरवर आपण नियंत्रण मिळवले, तर आपला ३० ते ३५ टक्के डेटा वाचू शकतो. यासाठी तुम्ही मोबाइलमध्ये क्रोम ब्राऊझर सुरू करा. त्यात वरच्या बाजूस उभे तीन टिंबे दिसतील. त्यात सेटिंग्जमध्ये गेल्यावर डेटा सेव्हर म्हणून एक पर्याय येतो. हा पर्याय आपण सुरू केल्यावर क्रोम गुगल सव्र्हरचा वापर करून आपण ज्या वेबपानांना भेट देणार ती पाने आपण भेट देण्यापूर्वी कॉम्प्रेस करतात. याचबरोबर मानवेअर्सचा प्रभाव असलेली पाने उघडण्यापासून आपल्याला रोखतात. यामुळे बरेचदा संकेतस्थळ सुरू होताना आपल्या ठिकाणाचा विचार करून सुरू होतात. हा पर्याय सुरू केल्यानंतर ब्राऊझरमध्ये दिसणारे काही फोटो कमी दर्जाचे दिसू शकतील. कंपन्यांची अंतर्गत संकेतस्थळे या पर्यायाचा वापर केल्यानंतर ओपन होणार नाहीत. जर तुम्ही आयपॅड आणि आयफोन किंवा विंडोज फोनवरही क्रोम ब्राऊझर वापरत असाल तर त्यावरही हा पर्याय उपलब्ध आहे. यानंतर तुम्ही क्रोम ब्राऊझरच्या सेटिंग्जमध्ये गेल्यावर तुम्हाला तुम्ही किती डेटा सेव्ह केला आहे त्याची माहिती मिळू शकते. अगदीच क्रोम वापरण्याचा आग्रह नसेल, तर तुम्ही कमी डेटा खर्च करणारे ओपेरा मिनीसारखे ब्राऊझरही वापरू शकता.
फेसबुक अॅप
सर्वाधिक डेटा खर्च करणारे आणि लवकर बॅटरी संपवणारे अॅप म्हणून फेसबुक अॅपची ओळख आहे. अँड्रॉइड वापरकर्त्यांना तर या अॅपची चांगलीच भीती आहे. या अॅपमुळे तुमच्या फोनचा डेटाच नव्हे, तर रॅमही सतत खर्च होत असते. यामुळे तुम्ही याला पर्याय असणाऱ्या अॅपचा वापर करा. फेसबुकनेच फेसबुक लाइट नावाचे अॅप बाजारात आणले आहे. हे अॅप जर तुम्ही डाऊनलोड केले, तर फेसबुक अॅपवर खर्च होणाऱ्या डेटाच्या एकूण एमबीच्या तुलनेत निम्मे एमबीच खर्च होतील. याशिवाय काही त्रयस्थ अॅप्सही बाजारात आहेत. जे तुम्हाला कमी डेटा खर्च करून फेसबुक वापरण्यासाठी मदत करू शकतात. यामध्ये टिनफोइल अॅपचा समावेश आहे. या अॅपच्या माध्यमातून आपण फेसबुकच्या संकेतस्थळावर पोहोचतो आणि आपण फेसबुक ब्राऊजिंग करू शकतो.
इतर काही सूचना
* व्हॉट्स अॅपमध्ये येणारे फोटो आणि व्हिडीओ आपोआप डाऊनलोड होत असतात. यामुळे तुमचा डेटा प्रमाणापेक्षा जास्त खर्च होतो. यामुळे व्हॉट्सअॅपच्या सेटिंग्जमध्ये जाऊन तुम्ही सर्वप्रथम मीडिया ऑटो डाऊनलोड बंद करा, जेणेकरून तुमचा डेटा खर्च होणार नाही. जो फोटो किंवा व्हिडीओ तुम्हाला आवश्यक वाटेल तोच डाऊनलोड केल्यास खूप डेटा वाचू शकतो.
* गाणी किंवा व्हिडीओ युटय़ूबसारख्या अॅप्सवरून पाहणे किंवा ऐकणे कमी केले तरीही डेटा वाचू शकतो. अनेकदा हे व्हिडीओ पाहण्यासाठी खूप डेटा खर्च होतो.
* अॅपमध्ये येणाऱ्या जाहिरातींमुळेही आपला डेटा खर्च होत असतो. यामुळे एकदा का तुम्ही अॅप सुरू केले की फोनचा मोबाइल डेटा बंद करा आणि ते अॅप वापरा, जेणेकरून जाहिराती येणार नाहीत आणि तुमचा डेटा खर्च होण्याचे प्रमाण कमी होईल. याशिवाय तुम्ही अॅड ब्लॉकर अॅप्स डाऊनलोड करून अॅपमध्ये येणाऱ्या जाहिरातींच्या जाचापासून वाचू शकाल आणि डेटाही वाचवू शकाल.
नीरज पंडित
First Published on October 13, 2015 6:06 am
Web Title: simple tips to save data
No comments:
Post a Comment