Monday, July 13, 2015

नवनीत

सयाजीरावांची चतुराई

Maharaja Sayajirao gaekwad
Published: Monday, June 29, 2015
बडोदा नरेश सयाजीराव जटिल समस्यांमधून सहजतेने मार्ग काढण्यात माहीर होते. शहरातला 'रावपुरा रोड' हा वाहतुकीचा रस्ता अत्यंत अरुंद आहे आणि त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या रस्त्याच्या रुंदीकरणाची योजना त्यांनी नक्की केली. हे काम सुरू करण्याआधी एक मोठा गुंतागुंतीचा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. एका ठिकाणी रस्त्यामध्येच मौलानाबाबाची कबर होती. कबर रस्त्यातून काढून परस्पर दुसरीकडे हलविली तर समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात. हा संवेदनशील प्रश्न महाराजांनी मोठय़ा चतुराईने सोडविला. त्यांनी आपल्या ज्येष्ठ मुस्लीम अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडूनच ती कबर रस्त्याच्या कामाच्या जागेपासून १०० फुटांवरील मोकळ्या जागेवर रात्रीतूनच हलवून घेतली. त्या अधिकाऱ्यांनीच दुसऱ्या दिवशी सकाळी अफवा पसरविली की, रात्रीतून मौलानाबाबाची कबर आपोआप दुसरीकडे गेली, चमत्कार झाला!  दुसऱ्या दिवशी मोहोल्ल्यातल्या सर्व मुस्लीम बांधवांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक महाराजांनी कबरीवर चादर चढवून तिथल्या व्यवस्थेसाठी देणगी दिली!
महाराजांच्या चातुर्याचा एक किस्सा बादशाह पंचम जॉर्जच्या बडोदा भेटीप्रसंगी घडलेला मनोरंजक आहे. पंचम जॉर्ज आणि महाराणी राजवाडा पाहत असताना दरबार हॉलच्या प्रवेशद्वाराच्या आतील सोन्याचे दोन सिंह पाहून थबकले! महाराणी मेरीची त्यावेळची लोभी नजर पाहून महाराज काय ते बरोबर उमजले. पंचम जॉर्जची बडोदाभेट संपल्यावर महाराजांनी त्वरित ते सोन्याचे सिंह वितळवून त्याचे सोने संस्थानाच्या खजिन्यात जमा केले. आठ दहा दिवसांनी महाराजांना व्हाइसरॉयचे पत्र आले की, 'आपल्या दरबारातील सोन्याचे सिंह राणीसाहेबांना आवडले. त्यांच्या बकिंगहॅम पॅलेसमध्ये ठेवण्यासाठी ते आमच्याकडे त्वरित पाठवावे म्हणजे मग आम्ही ते लंडनला पाठवू.' चतुर महाराजांनी कळविले की, 'आíथक टंचाईमुळे आम्ही ते वितळवून टाकले आहे. राणीसाहेबांनी सिंहांबद्दल आधी कळविले असते तर आम्ही आनंदाने पाठविले असते!'
सुनीत पोतनीस - sunitpotnis@rediffmail.com

No comments:

Post a Comment