Monday, July 13, 2015

नवनीत [Print] [Email] कुतूहल - विपिंजण यंत्र (कार्डिग यंत्र)

नवनीत

कुतूहल - विपिंजण यंत्र (कार्डिग यंत्र)

Carding Machine
Published: Tuesday, July 7, 2015
पिंजण विभागात कापसाचे लहान लहान सुटे पुंजके तयार होतात आणि कापसातील ६०% ते ८०% कचरा काढून टाकला गेलेला असतो. कापूस सूत बनविण्याच्या योग्यतेचा करण्यासाठी कापूस संपूर्णपणे मोकळा म्हणजे प्रत्येक तंतू एकमेकांपासून सुटा करणे आणि त्याचबरोबर कापसातील राहिलेला कचरा काढून टाकून कापूस १००% स्वच्छ करणे गरजेचे असते. हे कार्य विपिंजण यंत्रामध्ये केले जाते. विपिंजण यंत्राला पिंजण यंत्रणेकडून कापूस लॅपच्या रूपात किंवा नळ्याच्या साहाय्याने थेट पुरविला जातो.
या यंत्रात कापूस गेल्यानंतर करवती दाते असलेल्या विविध आघातक आणि पट्टय़ा यांच्या प्रक्रियेमुळे कापसाचे तंतू एकमेकांपासून पूर्णपणे सुटे केले जातात आणि कापसातील संपूर्ण कचरा काढून टाकला जातो. वििपजण यंत्रात कचऱ्याबरोबर काही आखूड तंतू आणि कापसातील गाठीदेखील काढून टाकल्या जातात. त्यामुळे सुताचा दर्जा उंचावण्यात मदत होते.
विपिंजण यंत्रातून शेवटी कापसाचा पेळू तयार केला जातो व तो एका पिंपामध्ये साठविला जातो. या यंत्रामध्ये प्रथमच कापसापासून सलग असा पेळू तयार केला जातो. सूत कातण्याच्या प्रक्रियेची ही पहिली पायरी आहे. कारण पेळू हा सुताप्रमाणे सलग व अखंड पेड असतो. फक्त याची जाडी सुतापेक्षा अनेक पटींनी जास्त असते. त्यामुळे पुढील प्रक्रियांमध्ये पेळूची जाडी कमी करत नेऊन शेवटी सूत कातता येते.
गेल्या १०० वर्षांमध्ये विपिंजण यंत्रामध्ये अनेक बदल झाले आहेत. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला वििपजण यंत्राचे उत्पादन हे ५ ते ७ किलो प्रति तास इतके होते तर आजच्या विपिंजण यंत्राचे उत्पादन हे १२० किलो प्रति तासपर्यंत पोहोचले आहे. पूर्वीच्या वििपजण यंत्राला कापूस हा लॅपच्या रूपात पुरविला जात असे तर आजच्या विपिंजण यंत्राला पिंजण यंत्रणेपासून थेट नळ्याच्या साहाय्याने सलगपणे कापूस पुरविला जातो. या यंत्रामध्ये पेळूची जाडी ही नियंत्रित करता येते. जर तलम सूत बनवायचे असेल तर पेळूची जाडी कमी ठेवावी लागते आणि सूत जाडे भरडे बनवायचे असेल तर पेळूची जाडी जास्त ठेवावी लागते.
चं. द. काणे  (इचलकरंजी) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

No comments:

Post a Comment