Monday, September 10, 2018

शब्दबोध मराठीत बेदम हा शब्द मारण्याची तीव्रता दर्शवण्यासाठी वापरतात. कारण बेदम मारणे म्हणजे खूप मारणे.

शब्दबोध

मराठीत बेदम हा शब्द मारण्याची तीव्रता दर्शवण्यासाठी वापरतात. कारण बेदम मारणे म्हणजे खूप मारणे.

डॉ. अमृता इंदुरकर
बेदम
‘लोकांनी चोराला पकडून बेदम मारले’ किंवा ‘आता ऐकले नाही तर बेदम मार खाशील’ अशी वाक्ये आपल्याला अगदी माहितीची असतात. ती आपण सहज वापरतो. मराठीत बेदम हा शब्द मारण्याची तीव्रता दर्शवण्यासाठी वापरतात. कारण बेदम मारणे म्हणजे खूप मारणे. काही अंशी हा अर्थ योग्यही आहे. फारसीमध्ये ‘दम’ म्हणजे श्वास, जोर, ताकद. या ‘दम’ला ‘बे’ हा पूर्वप्रत्यय लागून तयार झाला ‘बेदम’. फारसीमध्ये या बेदमचा अर्थ मुळात निपचित पडेस्तोवर दिलेला मार असा आहे. म्हणजे दम, श्वास निघेपर्यंत दिला जाणारा मार म्हणजे बेदम. मराठीत याचा अर्थविस्तार झाला आणि केवळ अती मार या क्रियेसाठी बेदम मारणे हा शब्दप्रयोग रूढ झाला.
गप्पिष्ट
‘ती अमुक ना भलती गप्पिष्ट आहे.’ असे आपण अगदी सहज म्हणतो किंवा ओठांवर तीळ असलेल्या व्यक्ती गप्पिष्ट असतात, असाही एक रूढ समज बोलून दाखवला जातो. या शब्दाच्या व्युत्पत्तीचा शोध घेतल्यावर मात्र गप्प बसायची वेळ आली, इतके अनेक अर्थाचे पदर सापडले.
प्राथमिक अभ्यासाअंती या शब्दाचे मूळ दोन भाषांमध्ये सापडते. फारसीमधे स्त्रीलिंगी मूळ शब्द आहे ‘गप्/ गप्पा’ ज्याचे अर्थ आहेत आवई, खोटी, बनावट, उडती बातमी, अफवा, वार्ता, खोटी हकीकत, कथा, स्तब्ध, चूप. मराठीमध्ये मात्र गप म्हणजे चूप, न बोलणे हाच अर्थ गृहीत आहे. फारसीत याच गप् वरून ‘गपसप’ शब्द तयार झाला. गपसप/ गपशप म्हणजे रिकामटेकडय़ा अथवा शिळोप्याच्या गप्पा. तर दुसऱ्या व्युत्पत्तीनुसार ‘गप/गप्प’ हा मूळ कानडी शब्द आहे. याचा अर्थ शांत, निश्चल, मुकाटय़ाने, न बोलता, पत्ता नसलेले.
फारसीतील गप/ गप्पवरूनच पुढे गप्पागोष्टी, गप्पीदास, गप्पाष्टक आणि गप्पिष्ट ही सर्व विशेषणे तयार झालीत. या दोन्ही व्युत्पत्तींचा विचार करता एक गोष्ट स्पष्ट होते की शब्दकोशात गप्पिष्ट म्हणजे बाता मारणारा, अतिबडबड करणारा असा अर्थ असला तरी मराठीत मात्र गप्पिष्ट हा शब्द सकारात्मक अर्थाने, कौतुकाने वापरला जातो. गप+इष्ट  अशी फोड करून ‘गप्पिष्ट’ तयार झाला, असा कयास लावण्यासही पुष्टी मिळते. कारण इष्ट म्हणजे इच्छिलेले, आवडते, कल्याणकारक, योग्य, पसंत असलेले, शुभ, हितप्रद इत्यादी अर्थाने वापरतो. म्हणजे जे पसंत आहे ते भरभरून बोलणारा म्हणजे गप्पिष्ट असे गृहीत धरले तरी चूक ठरणार नाही. तेव्हा प्रत्येक गप्पिष्ट व्यक्तीचे बोलणे ऐकून आता अनुमान लावावे की हा गप्पिष्टपणा फारसी की कानडी?
First Published on September 8, 2018 4:55 am
Web Title: article about vocabulary words

No comments:

Post a Comment