Tuesday, January 3, 2017

वेगळय़ा वाटा : सौंदर्य क्षेत्रातील संधी

वेगळय़ा वाटा : सौंदर्य क्षेत्रातील संधी

अगदी लहान मूलही आरशात बघून खुदकन हसते. कारण आपल्या सर्वानाच स्वप्रतिमा आवडते.

  
अगदी लहान मूलही आरशात बघून खुदकन हसते. कारण आपल्या सर्वानाच स्वप्रतिमा आवडते. स्वत:ला पाहायला, स्वत:चे रूप न्याहाळायला ते आणखी सुंदर बनवायला प्रत्येकालाच आवडते. त्यामुळेच ब्युटी इंडस्ट्रीत एक मोठे करिअर निर्माण झाले आहे. राजे-रजवाडय़ांकडे त्यांना सुंदर बनवण्यासाठी खास सेवक होते. काळाच्या ओघात आज तेच कौशल्य सेवा क्षेत्रातून विकसित होते आहे. तसे तर आपल्या सर्वानाच ब्युटी पार्लरची माहिती असते. तिथे कोणत्या सेवा मिळतात, हेसुद्धा कळते. परंतु यात करिअर करायचे तर अभ्यासक्रम आणि प्रमाणपत्रांची फारशी माहिती नसते.
सौंदर्यशास्त्र म्हणजे ब्युटीथेरपी. हा अभ्यासक्रम तीन प्रमुख टप्प्यांत विभागला जातो.
*   ब्युटीथेरपी
*   जनरल अ‍ॅस्थेटिक्स
*    बॉडीथेरपी
*  ब्युटीथेरपी/ ब्युटी कल्चर
ब्युटिशिअन म्हणजे सुंदर बनवणारी व्यक्ती. त्यामुळे या अभ्यासक्रमात सौंदर्य खुलवणारे विषय असतात. जसे थ्रेडिंग, व्ॉक्सिंग, फेशिअल, ब्लीचिंग, मॅनिक्युअर, पेडिक्युअर, बेसिक मेकअप इ. याचबरोबर त्वचेचाही प्राथमिक अभ्यास जसे त्वचेचे प्रकार, शारीरशास्त्र आणि त्वचेची काळजी, आहार त्याचबरोबर प्रथमोपचार, स्वच्छता आणि आरोग्य या सगळ्याचा अभ्यास होतो.
संधी – असिस्टंट ब्युटिशिअन, ऑपरेटर, घरच्या घरी स्वत:चा व्यवसाय करणे.
*  जनरल अ‍ॅस्थेटिशिअन
ब्युटी कल्चरच्या अभ्यासक्रमाची पुढली पायरी म्हणजे जनरल अ‍ॅस्थेटिशिअनचा अभ्यासक्रम. हा अभ्यासक्रम चेहरा, मान, नखे यावर जास्त लक्ष देतो. ब्लड सक्र्युलेशन, मसल्स, बोन्स यांच्या अभ्यासाबरोबर त्वचेचे विकार, दोष जसे िरगवर्म, अ‍ॅक्ने, पांढरे डाग इ.चा अभ्यास असतो. यामध्ये मशीन ट्रीटमेंटस्सुद्धा शिकाव्या लागतात. ज्याच्या त्वचेला फायदा होतो.
संधी- अ‍ॅस्थेटिशिअन किंवा ब्युटीथेरपिस्ट म्हणून तुम्ही स्वत:चा व्यवसाय सुरू करू शकता. फेशिअल किंवा स्किन केअर उत्पादने बनवणाऱ्या आणि विकणाऱ्या कंपनीमध्ये टेक्निकल ट्रेनर किंवा शोरूम ब्युटी अ‍ॅडव्हायझर म्हणून काम करू शकता. याचसोबत ब्युटी स्कूल अथवा अ‍ॅकॅडमीमध्ये ज्युनिअर ट्रेनर म्हणूनही काम करता येते.
*  बॉडीथेरपी
संपूर्ण शरीरशास्त्र, उपचारपद्धतींचा यात समावेश होतो. यात फक्त मसाज किंवा रॅप्स नव्हेत तर पॅसिव्ह स्लिमिंगही शिकवले जाते. इलेक्ट्रिकल मशीनच्या आधारे इंचलॉस करणे, त्याला योग्य आहाराची सांगड घालणे तसेच वेट पोस्ट्रअल फॉल्ट्स यावरही उपचार करणे किंवा प्राथमिक व्यायाम हे विषय शिकवले जातात.
संधी – कॉस्मेटॉलॉजिस्ट, थेरपिस्ट म्हणून स्वत:चा व्यवसाय करणे.
इनोव्हेशन मॅनेजअंतर्गत सलोनसाठी उत्तम उत्पादने निवडून त्याच्या उपचारपद्धती डिझाइन करणे.
सलोन ट्रेनर, ब्युटी कंपन्यांसाठी ट्रेनर म्हणून काम पाहणे. अ‍ॅकॅडमी ट्रेनर, अ‍ॅकॅडमी मॅनेजर.
अभ्यासक्रम आणि संस्था
सर्टिफिकेशनसाठी असोसिएट ऑफ ब्युटीथेरपी अ‍ॅण्ड कॉस्मेटॉलॉजी (इंडिया) हे जनरल अ‍ॅस्थेटिक्ससाठी मान्यताप्राप्त अभ्यासक्रम उपलब्ध करून देतात. सिडेस्को (cidesco) सर्टिफिकेशन फ्रॉम झुरीच ही संस्था आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करण्यासाठी संधी उपलब्ध होतात. त्यासोबत नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कौन्सिल ही सरकारची संस्था आहे. यातील सौंदर्य आणि प्रसाधन क्षेत्राशी निगडित असलेली संस्था म्हणजे ब्युटी अ‍ॅण्ड वेलनेस सेक्टर स्किल कौन्सिल. या दोन्ही संस्था स्वायत्त आहेत. या दोन्ही संस्था सरकारमान्य अभ्यासक्रम चालवतात.
*    एनरिच अकॅडमी मुंबई  (http://www.enrichsalon.com/)
*    एलटीए स्कूल ऑफ ब्यूटी  (http://www.ltaschoolofbeauty.com/)
*   मिरर अकॅडमी, नाशिक  (http://mirrorsalon.co.in/)
*  ब्युटिक जस्टिस
*   उदय टक्केज, यू टक्केज इन्स्टिटय़ूट ऑफ हेअर अ‍ॅण्ड स्कीन मुंबई
ब्युटिशियन होणे, वाटते तितके सोपे नाही. शिवाय या व्यवसायाला फारशी प्रतिष्ठा अजूनही नाही. फेशिअल, मॅनिक्युअर, पेडिक्युअर अशा साध्या गोष्टी करता येणे सोपे असते. ते आल्यावर लगेचच पार्लर सुरू केले असे होत नाही. पार्लरसोबतच त्याची गुणवत्ता आणि दर्जाही राखायला हवा. कोणत्याही वयोगटातील मुलींना आणि महिलांना आर्थिक स्थैर्य देण्याची ताकद या क्षेत्रामध्ये आहे. कमी गुणवत्तेचे दिखाऊ काम फार काळ चालत नाही. त्याच वेळी नोकरीचा पर्याय स्वीकारल्यास कामाचे स्वरूप समजून घेणे फार महत्त्वाचे आहे. अनेकदा गरजू मुलींना ब्युटी पार्लरमध्ये हेल्पर किंवा असिस्टंट या नावाखाली साफसफाईची कामे दिली जाता. तू हे कामही कर आणि शिकही असे आश्वासन दिले जाते. पण शिकत असल्याने पगार मिळत नाही आणि कामाच्या रेटय़ाखाली शिकायला मिळत नाही, अशी दुहेरी कोंडी होते. ब्युटिशियन म्हणून परदेशात जाताना तर विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
(लेखिका सौंदर्यप्रसाधन क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत.)
 

No comments:

Post a Comment