Tuesday, September 29, 2015

चिंतामणरावांची कारकीर्द चिंतामणराव पटवर्धन प्रथम यांनी सांगली येथे स्वतंत्र राज्य स्थापन केले.

चिंतामणरावांची कारकीर्द

चिंतामणराव पटवर्धन प्रथम यांनी सांगली येथे स्वतंत्र राज्य स्थापन केले.

मुंबई | September 24, 2015 00:49 am
चिंतामणराव पटवर्धन प्रथम यांनी सांगली येथे स्वतंत्र राज्य स्थापन केले. त्यांची राजकीय कारकीर्द इ.स. १८०१ ते १८५१ अशी झाली. सुरुवातीला पेशव्यांच्या आदेशाने परशुराम पटवर्धनांसोबत करवीरच्या छत्रपतींविरुद्ध मोहिमेत आणि कंपनी सरकारच्या जनरल वेलस्ली आणि सरदार धोंडोपंत गोखले यांच्याबरोबर धोंडाजी वाघ या दरोडेखोराविरुद्ध कर्नाटकातील मोहिमेत चिंतामणरावांनी मोठी कामगिरी बजावली. त्यामुळे वेलस्लीशी त्यांचे चांगले संबंध तयार झाले. गणेशभक्त असलेल्या चिंतामणरावांनी १८११ साली गणपती मंदिराच्या बांधकामाला सुरुवात केली. सांगलीचे भूषण असलेल्या या गणपती मंदिराचे काम पूर्ण होण्यास तब्बल ३० वष्रे लागली. या मंदिराचे नाव पुढे ‘गणपती पंचायतन’ असे झाले.
चिंतामणराव प्रथम हे प्रजाहितदक्ष राजे होते. त्यांनी व्यापारउदीम वाढवून निरनिराळ्या बाजारपेठा वसविल्या, सांगलीत मोठय़ा प्रमाणात येणाऱ्या हळदीच्या शेतीला प्रोत्साहन देऊन त्याची बाजारपेठ निर्माण केली. सरळ, रुंद रस्ते बांधून त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड सुरू केली. त्यांनी १८२१ साली प्रथम शिळाप्रेस छापखाना स्थापन केला. व्यापाऱ्यांना अनेक सवलती देऊन त्यांनी सांगलीत रेशीम उद्योगाचा पाया घालून, मॉरिशसहून उच्च दर्जाचा ऊस आणून त्याची लागवड सुरू केली. स्वतची नाणी पाडण्यासाठी त्यांनी सांगलीत टांकसाळही सुरू केली. गुणग्राहक, कल्पक, बहुआयामी चिंतामणराव यांनी ठिकठिकाणचे विद्वान, कलाकार, कारागिरांना राजाश्रय देऊन सांगली हे दक्षिण महाराष्ट्रातील महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र बनविले. विष्णुदास भावे यांच्याकडून ‘सीतास्वयंवर’ हे नाटक लिहून घेऊन राजांनी मराठी रंगभूमीवरचा पहिला नाटय़प्रयोग केला. १८१९ साली सांगलीचा ईस्ट इंडिया कंपनी सरकारशी संरक्षणाचा करार होऊन ते एक संस्थान बनून राहिले. १८५१ साली या महान राज्यकर्त्यांचे निधन झाले.
सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com

No comments:

Post a Comment