Thursday, August 7, 2014

नवनीत कुतूहल: कार्बन नॅनो टय़ूब्जची उपयुक्तता

नवनीत


कुतूहल: कार्बन नॅनो टय़ूब्जची उपयुक्तता

Published: Friday, August 8, 2014
कार्बन नॅनो टय़ूब्ज अतिशय सूक्ष्म असतात. नॅनो टय़ूब्जला फक्त लांबी असते; रुंदी नाही. जर नॅनो टय़ूबची मानवी केसाच्या जाडीची मोळी बनवायची असेल तर सुमारे ऐंशी हजार नॅनो टय़ूब्ज एकत्र कराव्या लागतील. कार्बन नॅनो टय़ूब्जवर सध्या जगभरात संशोधन सुरू आहे. त्यासाठी अब्जावधी रुपयांची गुंतवणूकही केली गेली आहे.
नॅनो टय़ूब्ज पोलादापेक्षा बळकट पण लवचीक असतात. पोलादाच्या तुलनेत त्या शंभर पट मजबूत आणि पाच पट कठीण असतात. या टय़ूब्ज उष्णतेच्या अतिउत्तम वाहक आहेत. जर नॅनो टय़ूब्जपासून स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारी भांडी तयार केली तर गॅसवर भांडं ठेवेपर्यंत हाताला चटका बसेल.
नॅनो टय़ूब्जचे बरेच प्रकार आहेत. काही नॅनो टय़ूब्ज फक्त एकाच गुंडाळीच्या असतात, तर काही एकात एक असलेल्या अनेक गुंडाळींच्या असतात. ही गुंडाळी कोणत्या कोनातून होते यावर नॅनो टय़ूब्जचे गुणधर्म अवलंबून असतात. विशिष्ट कोनातून गुंडाळी झाली तर नॅनो टय़ूब्ज धातूचे गुणधर्म दाखवतात; तर वेगळ्या कोनातून गुंडाळले गेल्यास त्या अर्धवाहकाचे गुणधर्म दाखवतात.
भविष्यात संगणकामध्ये वापरण्यात येणाऱ्या चिप्स ह्या सिलिकॉनपासून नव्हे तर कार्बनच्या नॅनोटय़ूब्जपासून बनलेल्या असतील. कार्बनची एक नॅनोटय़ूब माणसाच्या केसापेक्षा लाखो पटींनी लहान असते. त्यामुळे या टय़ूब्जपासून अतिसूक्ष्म संगणक तयार करणं सहज शक्य होईल. हे अतिसूक्ष्म आकाराचे नॅनो संगणक उद्या आपलं घर, रस्ते, वाहनं, इतकंच काय पण आपण घातलेल्या कपडय़ांमध्ये आणि आपल्या शरीरातसुद्धा असू शकतील!
मोबाइल हँडसेट, कार बंपर्स, बुलेटप्रूफ जाकिटं, तसंच संरक्षण क्षेत्रात शस्त्रास्त्रांमध्येसुद्धा कार्बन टय़ूब्जचा उपयोग केला जाऊ शकतो.
सध्या भेडसावणाऱ्या इंधनसमस्येवरही कार्बन नॅनो टय़ूब्जमुळे काही प्रमाणात मात करणं शक्य होऊ शकेल. कारण कार्बन नॅनोटय़ूब्जमध्ये हायड्रोजन वायू साठवून ठेवता येतो. हायड्रोजन साठवण्याची कार्बन नॅनो टय़ूब्जची सध्याची क्षमता सुमारे ११ टक्के आहे. हे प्रमाण जर ३० टक्क्यांपर्यंत वाढले तर हायड्रोजन गॅसवर चालणारी वाहने वापरात येऊ शकतील. यासाठी जगभरातले संशोधक प्रयत्नशील आहेत.

No comments:

Post a Comment