Sunday, August 3, 2014

नवनीत कुतूहल: शुष्क बर्फ

नवनीत


कुतूहल: शुष्क बर्फ

Published: Friday, August 1, 2014
बर्फ कोरडा कसा असू शकतो? बर्फ पाण्यापासून तयार होतो हे आपल्याला माहीत आहे, पण हा शुष्क बर्फ म्हणजे घनरूपातील कार्बन डायऑक्साइड. कार्बन डायऑक्साइड वायू कमी तापमानाला म्हणजेच साधारणपणे -५७ अंश सेल्सिअसला घनरूपात रूपांतरित होतो. तोच हा शुष्क बर्फ. या रासायनिक गुणधर्माला निक्षेपण म्हणतात. तापमान कमी केल्यावर नेहमी वायू अवस्थेतील पदार्थाचे, द्रव अवस्थेत रूपांतर होते. निक्षेपण प्रक्रियेत तापमान कमी केल्यावर वायू अवस्थेतील पदार्थाचे द्रव अवस्थेत रूपांतर न होता घन अवस्थेत रूपांतर होते. कक्ष तापमानालाही शुष्क बर्फाचे रूपांतर वायुरूपात होते, इथे पुन्हा मधल्या अवस्थेत म्हणजे द्रव अवस्थेत रूपांतर होत नाही या रासायनिक गुणधर्माला संप्लवन म्हणतात.
कार्बन डायऑक्साइडचा वायुरूप, द्रवरूप व घनरूप या तिन्ही स्थितीत उपयोग केला जातो. वायुरूपातील कार्बन डायऑक्साइड शीतपेयांमध्ये वापरला जातो. नियंत्रित परिस्थितीत वनस्पतींचे संवर्धन करण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या काचगृहात अल्प प्रमाणात कार्बन डायऑक्साइड ठेवल्यास झाडांची वाढ होण्यास मदत होते. आग विझविण्यासाठी, काही कार्बनी रसायनांच्या निर्मितीत, साखर शुद्ध करण्यासाठी कार्बन डायऑक्साइड वायूचा उपयोग करतात.
द्रव अवस्थेतील कार्बन डायऑक्साइड पाण्याचा सामू (स्र्ऌ) नियमित राखण्यासाठी आणि कारखान्यांमध्ये शीतलक (कूलिंग एजंट) म्हणून वापरला जातो. द्रव अवस्थेत कार्बन डायऑक्साइड साठवून ठेवून नंतर घन किंवा वायू अवस्थेत जशी मागणी असेल तसा पुरवठा केला जातो.
शुष्क बर्फ आइस्क्रीम, जीवशास्त्राचे नमुने, मांस, अंडी, मासे, फळे, इ. खाद्यपदार्थ, तयार अन्नपदार्थ टिकवण्यासाठी वापरला जातो. जिथे यांत्रिक पद्धत म्हणजेच फ्रिज उपलब्ध नसतो अशा भागात, तसेच कमी तापमानात ठेवायला लागणारे अन्नपदार्थ ने-आण करताना शुष्क बर्फ वापरला जातो. चित्रपटगृहात, लग्न समारंभात किंवा एखाद्या कार्यक्रमात अचानक पांढरे ढग तयार होताना आपण बघतो. शुष्क बर्फ पाण्यात ठेवला असता संप्लवनाचा वेग वाढतो आणि आपल्याला पांढऱ्या शुभ्र वायूचे ढग दिसू लागतात. शुष्क बर्फाच्या सान्निध्यात जास्त काळ राहिलं तर त्वचेला ंअपाय होऊ शकतो.

No comments:

Post a Comment