यूपीएससीची तयारी : भारतीय वारसा आणि संस्कृती व इतिहास – १
सर्वसाधारणपणे आपणाला उपरोक्त पद्धतीने या घटकाची विभागणी करून अभ्यासाचे नियोजन करता येऊ शकते.
श्रीकांत जाधव | Updated:
July 11, 2017 5:30 AM
(संग्रहित छायाचित्र)
अभ्यासाच्या दृष्टीने या घटकाची विभागणी आपणाला भारतीय वारसा आणि संस्कृती, आधुनिक भारताचा इतिहास, स्वातंत्र्योत्तर भारत आणि आधुनिक जगाचा इतिहास अशा पद्धतीने करता येऊ शकते. या घटकावर २०१३ ते २०१६ मध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांची संख्या खालीलप्रमाणे होती.
आता आपण उपरोक्त घटकाचा थोडक्यात आढावा घेऊ या –
भारतीय वारसा आणि संस्कृती या घटकांतर्गत प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंतचे कलाप्रकार, साहित्य आणि स्थापत्यकला यांच्या मुख्य वैशिष्टय़ांचा अभ्यास करावा लागतो. या घटकामध्ये आपणाला भारतीय चित्रकला, भारतीय स्थापत्यकला, भारतीय शिल्पकला, भारतीय संगीत, नृत्य आणि नाटय़, भारतीय साहित्य, भारतीय उत्सव, भारतीय हस्तकला इत्यादीचा अभ्यास करणे गरजेचे आहे. या घटकाची तयारी आपणाला प्राचीन काळापासून ते आधुनिक कालखंडापर्यंत करावी लागते त्यामुळे हे उपरोक्त कलाप्रकार, साहित्य, उत्सव यांची उत्पत्ती तसेच प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक कालखंडनिहाय यामध्ये नेमके कोणते बदल झाले व याची वैशिष्टय़े काय आहेत इत्यादीसंबंधित बाबींची सखोल माहिती असणे गरजेचे आहे.
आधुनिक भारताचा इतिहास या घटकांतर्गत आपणाला १८व्या शतकापासून ते १९४७पर्यंतच्या महत्त्वपूर्ण घटना, व्यक्ती, मुद्दे, भारतीय स्वातंत्र्य चळवळ व या चळवळीचे विविध टप्पे याचबरोबर देशाच्या विविध प्रदेशांतील योगदान किंवा महत्त्वाचे योगदानकत्रे इत्यादीशी संबंधित अभ्यास करावा लागणार आहे. या घटकावर सर्वाधिक प्रश्न विचारले जातात. त्यामुळे ह्या घटकाची सखोल आणि सर्वागीण तयारी करणे अधिक गरजेचे आहे.
स्वातंत्र्योत्तर भारत या घटकामध्ये भारताची फाळणी व फाळणीचे परिणाम, संस्थानाचे विलीनीकरण, भाषावार प्रांतरचना, विकासासाठी आखली गेलेली धोरणे व नियोजन, नेहरूंचे परराष्ट्र धोरण व भारताची आंतरराष्ट्रीय भूमिका, कृषी, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांमधील भारताची प्रगती, चीन आणि पाकिस्तान या देशांनी भारतासोबत केलेली युद्धे व त्याच्याशी निगडित करार व त्याचे परिणाम, इंदिरा गांधी यांचा कालखंड-बांगलादेश मुक्ती, आणीबाणी व जयप्रकाश नारायण, जमीन सुधारणा धोरण व जमीन सुधारणा, नक्षलवाद व माओवाद, नवीन सामाजिक चळवळी-वांशिक चळवळी, पर्यावरण चळवळ व महिला चळवळ इत्यादी, पंजाब व आसाममधील दहशतवाद व पूर्वोत्तर राज्यातील घुसखोरी, राजकीय क्षेत्रातील बदल व प्रादेशिक वादाचे राजकारण तसेच या सर्व घटकांशी संबंधित घटना, व्यक्ती आणि मुद्दे या अनुषंगाने याची तयारी करावी लागते.
आधुनिक जगाचा इतिहास या घटकांतर्गत आपणाला १८व्या शतकातील महत्त्वाच्या घटना जसे राजकीय क्रांती-अमेरिकन, फ्रेंच औद्योगिक क्रांती, साम्राज्यवाद आणि वसाहतवाद, आशिया, आफ्रिका आणि अमेरिकन खंडामधील युरोपियन साम्राज्यवाद, जपानचा आशिया खंडातील साम्राज्यवाद, राजकीय विचारप्रवाह किंवा तत्त्वज्ञान-भांडवलवाद, समाजवाद आणि साम्यवाद इत्यादी, तसेच १९व्या शतकातील युरोपातील राज्यक्रांती व राष्ट्रवादाचा उदय आणि जर्मनीचे एकत्रीकरण आणि इटलीचे एकत्रीकरण, २०व्या शतकातील घडामोडी दोन जागतिक महायुद्धे, रशियन क्रांती, लीग ऑफ नेशन, अरब राष्ट्रवाद, फॅसिझम आणि नाझीझम, आíथक महामंदी, तसेच दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतरचे जग- संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना, निर्वसाहतीकरण, चीनची क्रांती, अलिप्ततावाद चळवळ, शीतयुद्ध व संबंधित घटना, युरोपियन संघ, इत्यादी घटकांशी संबंधित अभ्यास करावा लागतो.
सर्वसाधारणपणे आपणाला उपरोक्त पद्धतीने या घटकाची विभागणी करून अभ्यासाचे नियोजन करता येऊ शकते. यातील नेमका कोणता भाग परीक्षेच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचा आहे याचे आकलन आपणाला गतवर्षीय परीक्षेमध्ये या घटकावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांवरून लक्षात येते. या घटकाची व्याप्ती खूप मोठी आहे, तसेच याचे स्वरूप पारंपरिक पद्धतीचे आहे. त्यामुळे हा घटक सर्वप्रथम सखोल पद्धतीने अभ्यासणे गरजेचे आहे. या घटकाची तयारी आपणाला सर्वागीण पद्धतीने करावी लागते व या घटकावर बाजारामध्ये अनेक संदर्भ पुस्तके तसेच नोट्स पद्धतीने लिहिलेली गाइड्स उपलब्ध आहेत आणि यातील नेमकी कोणती संदर्भ पुस्तके वाचावीत याची निवड करणे कठीण जाते. या घटकासाठी उपरोक्त वर्गीकरणानुसार लागणारी एनसीईआरटीची पुस्तके तसेच या घटकाची सखोल तयारी करण्यासाठी लागणारी महत्त्वाची संदर्भ पुस्तके यांच्याविषयी यापुढील प्रत्येक लेखामध्ये या घटकांच्या अभ्यासाचे नियोजन आणि तयारी याच्यासोबत ही माहिती घेणार आहोत.
यापुढील लेखामध्ये आपण भारतीय वारसा आणि संस्कृती या घटकाचा परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारा सर्वागीण आढावा घेणार आहोत.
First Published on July 11, 2017 5:30 am
Web Title: upsc preparation ias preparation tips preparation for upsc 2017 exam
No comments:
Post a Comment